एक दोन नव्हे, 22 राज्यांमध्ये पावसाचं महासंकट, महाराष्ट्रात परिस्थिती काय?
देशभरात अजूनही पावसाचे साम्राज्य असून, अनेक ठिकाणी नुकसानीची नोंद झाली आहे. दिल्लीत तीन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर आज दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीप आणि उत्तर भारतात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात मान्सून परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी, मुंबईत उकाडा वाढला आहे.

महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये अजूनही पावसाचेच राज्य आहे. परतीच्या पावसाची अजूनही काही चिन्हे नाहीत, अनेक ठिकाणी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारी दुपारी २ वाजल्यानंतर राजधानीच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे अनेक भागांत पाणी साचले. मात्र भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, आज, 8 ऑक्टोबर रोजी दिल्लीकरांना पावसापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आकाश ढगाळ राहील, परंतु पाऊस पडण्याची शक्यता नाही. या काळात किमान तापमान 21 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. हवामान विभागाने असेही म्हटले आहे की 13 ऑक्टोबरपर्यंत दिल्लीत पावसाची शक्यता नाही, ज्यामुळे येत्या काही दिवसांत हवामान सामान्य राहील.
हवामान खात्याच्या मते, 8 ते 12 ऑक्टोबर दरम्यान तामिळनाडूच्या अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे केरळमध्ये 8 ते 13 ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान लक्षद्वीप आणि कर्नाटकमध्ये वादळ येण्याची शक्यता आहे. 8 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशात 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेश-पंजाबमध्ये कसे असेल हवामान ?
उत्तर भारतातही हवामानात लक्षणीय बदल होऊ शकतात. 8 ऑक्टोबर रोजी उत्तराखंडच्या डोंगराळ भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे, तर सखल भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये काही ठिकाणी गडगडाटी वादळे आणि जोरदार वाऱ्यांसोबत (30 ते 50 किमी प्रतितास वेगाने) पाऊस पडू शकतो.
पूर्व आणि मध्य भारतातही पावसाळी वातावरण कायम राहील. पश्चिम मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी गडगडाटी वादळे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवसांत पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, झारखंड आणि बिहारमध्येही वादळ आणि विजांचा इशारा देण्यात आला आहे.
ईशान्य भारतातील हवामान स्थिती
ईशान्य भारतात, 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा येथे हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर 9 ते 10 ऑक्टोबर रोजी अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम भारतात, 8 ऑक्टोबर रोजी गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात स्थिती काय ?
राज्यात काही भागांतून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. काही दिवसांतच महाराष्ट्रातूनही मोसमी वारे माघारी परतण्यास सुरुवात होईल. दरम्यान, मुंबईत गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर मात्र पावसाने ओढ दिली. परिणामी मुंबईत उन्हाचा ताप आणि उकाड्यात वाढ झाली आहे. यादरम्यान काही भागात पावसाच्या तुरळक सरी वगळता हवामान कोरडे राहील, असा अंदाज आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह इतर भागात तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी 31.6 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात 31.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यंदा ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा ताप फारसा नसणार, असा अंदाज खासगी हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. दिवसाचे तापमान साधारण 32 -33 अंश सेल्सिअस दरम्यान राहील तर, किमान तापमान मात्र सरासरीइतके राहील, त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळू शकतो
