नाशिकमध्ये मिलिट्रीच्या 63 जागांची भरती; 25 ते 30 हजार तरुण दाखल

देवळाली कॅन्टोमेंटमध्ये लष्कराच्या 116 इन्फ्रा पॅरा बटालियनची भरती (infra para battalion recruitment 2019) सुरु आहे.

नाशिकमध्ये मिलिट्रीच्या 63 जागांची भरती; 25 ते 30 हजार तरुण दाखल

नाशिक : देवळाली कॅन्टोमेंटमध्ये लष्कराच्या 116 इन्फ्रा पॅरा बटालियनची भरती (infra para battalion recruitment 2019) सुरु आहे. यामध्ये अवघ्या 63 जागांसाठी तब्बल 25 ते 30 हजार विद्यार्थी नाशिकमध्ये दाखल (infra para battalion recruitment 2019) झाले आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या तरुणांना प्रशासनाची व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या कडेला झोपून रात्र काढावी लागत आहे. तसेच ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला.

लष्कराच्या अवघ्या 63 जागांसाठी हजारो तरुण नाशिकमध्ये दाखल झाल्याने प्रशासनाचीही तारांबळ उडालेली आहे. यावरुन किती मोठ्या प्रमाणात बेरोजगारी समाजात वाढलेली असल्याचे दिसून येत आहे.

हजारोंच्या संख्येने तरुणांची झालेली गर्दी, रस्त्यावर चपलांचा पडलेला खच, रस्त्याच्या कडेला झोपलेली मुलं, कोण बस स्टँडवर डोक्याखाली वळकुटी घेऊन झोपलेला, तर कुणी तुफान गर्दीत आपला नंबर येण्याची वाट बघत बसलेला, या धावपळीत तर काहीजण नाल्यातही पडले. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला.

एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी दाखल झाल्याने सर्वांचा गोंधळ उडालेला आहे. ना राहण्याची, ना जेवणाची व्यवस्था, ना कागदपत्र कुठे द्यायचे, कोणाला भेटायचं याची माहिती. ऐन सणासुदीच्या दिवसात शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन आलेल्या या परिक्षार्थींच्या नशिबी अक्षरशः हाल अपेष्टा आल्या आहेत. तसेच येथे व्यवस्थेचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांची तीन किलोमीटरपर्यंत रांग लागली होती, अशी खंत येथे आलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, पॅरा बटालियन ही लष्कराची अत्यंत मानाची आणि तेवढीच जबाबदारीची बटालियन मानली जाते. देशाच्या लष्करात जाण्याचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकाला या बटालियनमध्ये भरती होण्याची इच्छा असते, त्यामुळेच अवघ्या 63 जागांसाठी देशभरातून परीक्षार्थी याठिकाणी आले आहेत. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या परिक्षार्थींची व्यवस्था का करण्यात आली नाही याबाबत कोणीही बोलायला तयार नाहीत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *