माननीय चोर साहेब…माझे घर…वकिलाने लिहिले थेट चोरांना पत्र, केलेल्या विनंतीची तुफान चर्चा!
जालना शहरात चोरट्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका वकिलाने थेट चोरालाच पत्र लिहिलं आहे. ललित हट्टेकर असं या वकिलाचं नाव असून, मागील काही महिन्यांत त्यांच्या घरात चार वेळा चोरी झाली आहे.

Jalna Advocate Viral Letter : जालना शहरात चोरट्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका वकिलाने थेट चोरालाच पत्र लिहिलं आहे. ललित हट्टेकर असं या वकिलाचं नाव असून, मागील काही महिन्यांत त्यांच्या घरात चार वेळा चोरी झाली आहे. पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही काहीही परिणाम न झाल्यामुळे शेवटी त्यांनी हा अनोखा मार्ग निवडला. जालना शहरातल्या एसटी कॉलनीतील त्यांच्या घरावर त्यांनी बॅनर लावून चोरांना नम्र निवेदन केलं आहे. आता काहीच शिल्लक नाही, कृपया वेळ वाया घालवू नका,” असं आवाहनच त्यांनी चोरांना केलंय. सध्या त्यांच्या या पत्राची महाराष्ट्रभर चर्चा होत आहे.
हट्टेकर यांनी चोराला लिहिलेल्या पत्रात दरवाजांची, कपाटांची आणि सीसीटीव्हीच्या नुकसानाची माहितीही दिली आहे. इतकंच नव्हे तर चोरांना सावध करताना माझ्याकडे शस्त्र परवाना आहे, असंही त्यांनी नमूद केलंय. म्हणून त्यांचे हे पत्र संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरले आहे.
हट्टेकर यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?
माननीय चोर साहेब, सस्नेह नमस्कार ! मी आपली जोखीम, तंत्रज्ञान, समन्वय, जीवावर ऊदार होऊन चोरी करण्याच्या कलेला वंदन करतो. खूप अवघड काम आहे हे. आपली ओळख नसल्यामुळे हे निवेदन करतो की, गेल्या 6 महिन्यांत तुम्ही 5 वेळा माझ्यासारख्या मानसाकडे आले. 3 वेळा तुमच्या पदरी निराशाच पडली. मात्र एक वेळ माझ्याकडून खूप काही घेऊन गेले. मी माझ्या आयुष्यभर ते परत कमऊ शकत नाही. त्याच वेळी मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. परंतु तुम्हाला पोलीस पकड़ू शकले नाही. 3 वेळा तक्रारसुद्धा केली नाही, अशी खंत त्यांनी चोराला उद्देशून लिहिलेल्या पत्रात केली आहे.
तसेच “माझी वकिली फक्त माझा व कुटूंबाचा योगक्षेम चालावा इतकी आहे. मानाने आणि स्वाभिमानानी जगता यावे इतकेच पैसे मी कमावतो. मला सगळे रोग आहेत. त्याच्या गोळ्याचा, औषधाचा खर्च जवळपास दहा हजार रुपये होतो. तुमच्या मुळे जे तुम्ही दरवाजे, कोंडे तोडता व निघून जाता त्यामुळे मला विनाकारण खर्च होतो व पत्नी, मुलगा दहशतीत जगतात. मला तुमच्यामुळे दोन दरवाजे (15 हजार रुपये) , लोखंडी कपाट दुरुस्ती (4500 रुपये) सी.सी.टी.व्ही (27 हजार रुपये), लोखंडी ग्रील (35 हजार) एवढा खर्च झाला. कॅमेरे जे काढल्यानंतर काहीच उपयोग होत नाही ते सुद्धा तुम्ही 2 वेळेला नेले. त्याचा 6 हजार रुपये कर्च झाला. त्या सर्वांची उधारी मी आज सुद्धा देत आहे,” अशी खदखद वकील हट्टेकर यांनी पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली.
माझी लाळ पडेल इतकी रक्कम सांगितली तर
“माझे घर एका कोपऱ्यात आहे. आजूबाजूला मोठ्या-मोठ्या भिंती आहेत व समोर मोकळी जागा आहे. त्यामुळे तुम्हाला चोरीसाठी ही एक आदर्श जागा वाटते. तुम्ही जर माझी लाळ पडेल इतकी रक्कम सांगितली तर ही जागा मी 1 वर्षानंतर विकू शकतो (माझ्या आईचे वर्ष श्राद्ध झाल्यानंतर) इथे 6 हजार चौ.फूट परिसरात प्रकारचे अवैध धंदे करू शकता. कोणतीही रिस्क नाही. सेफ आहे. बघा विचार करुन,” असा सल्लाच त्यांनी चोरांना दिला आहे.
आता महत्त्वाचे माझ्याकडे शस्त्र परवाना…
“अजून एक राहिले समोरचा खंबा हा पूर्ण पाण्यात आहे. त्या रस्त्याने जाऊ नका. अर्थिंग करंट लागतो. मी लाईट लावायला गेलो होतो तेव्हा मला जोरात झटका बसला होता. आता महत्त्वाचे माझ्याकडे शस्त्र परवाना आहे. जर तुमच्या दुर्दैवाने तुम्ही सापडला तर मी मारता-मारता मरेण या तत्वाने माझ्याकडच्या शस्त्राचा उपयोग करेन. विनाकारण मला जीव हत्येचे पाप लागेल,” असा इशाराच त्यांनी चोरांना दिलाय.
तुमचा वेळ व माझा संयम दोन्हीही वाया घालवू नका
तसेच, आता माझ्याकडे सोने-चांदी-पैसे वगैरे काहीही नाही. घरात फक्त मी, बायको, मुलगा, भांडे-कुंडे, कपडे, फ्रीज, वॉशिंग मशिन, टी.व्ही. गाडी तिही टी.व्ही. आणि दोन मोबाईल आहेत. तरी तुमचा वेळ व माझा संयम दोन्हीही वाया घालवू नका अशी विनंतीही वकील हट्टेकर यांनी केली आहे.
