Sanjay Raut : अजित पवार यांनी मूळ राष्ट्रवादीत यावं… संजय राऊत बिनधास्त बोलले; काय काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांवर केलेल्या टीकेने महायुतीत खळबळ उडाली आहे. यावर संजय राऊत यांनी अजित पवारांना थेट सरकारमधून बाहेर पडून शरद पवारांसोबत परत येण्याचे आवाहन केले आहे. भाजपने भ्रष्टाचारी नेत्यांना पक्षात घेऊन 'वॉशिंग मशीन'सारखे काम केल्याचा आरोपही राऊतांनी केला. या राजकीय नाट्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.

महाराष्ट्रात सध्या महायुतीचं सरकार आहे. सत्तेत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या महायुतीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली दिसत आहे. पिंपरी-चिंचवडच्या भाजप नेत्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी टीका केली आहे. आणचीही दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता होती, पण सत्तेचा कधी उन्माद केला नाही. पण आता उमेमदवारी मागे घेण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत, असं म्हणत सत्तेचा माज आल्याची टीका अजित दादांनी भाजपवर टीका केली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. याच मुद्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी मात्र एक वेगळीच टिपण्णी करत अजित दादांना थेट आवाहन केलं आहे. कशा करता राहता सरकारमध्ये?. या शरद पवारांबरोबर परत असं संजय राऊत थेट म्हणालेत.
सरकारमध्ये राहताय कशाला ?
अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपावर टीका केली. त्यावर राऊत स्पष्ट बोलले. ‘अजित पवार यांचा काही तरी वेगळा मार्ग दिसत आहे. वेगळ्या मार्गाने जाण्याचा. त्यांचा इरादा स्पष्ट दिसतोय. भाजप खा खा खातोय. त्यांना खाणं सोईचं व्हावं म्हणून इतर पक्षातील खाणाऱ्यांना त्यांनी आपल्या पक्षात घेतलं आहे. भाजप खा खा खात असेल. आणि अजित पवार त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. ते असं विधान करत आहे. याचा अर्थ जनतेने काय घ्यायचा. एक तर भाजपने तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. आता तुम्ही त्यांच्यावर आरोप करत आहात. मग सरकारमध्ये राहताय कशाला? कशा करता राहता सरकारमध्ये? ‘ असा सवाल राऊत यांनी विचारला.
भाजपची साथ सोडा आणि मूळ राष्ट्रवादीत या…
‘या शरद पवारांबरोबर परत. नाही तरी तुम्ही शरद पवार यांच्यासोबत पिंपरी चिंचवड आणि पुण्यात युती केलेलीच आहे ना. अजित पवार यांनी भाजपची साथ सोडावी आणि मूळ राष्ट्रवादी पक्षात विलीन व्हावं.’ असं राऊत म्हणाले. अमित शाह यांनी दिलेला पक्ष मूळ राष्ट्रवादी नाही हे त्यांना माहीत आहे. मूळ राष्ट्रवादी हा शरद पवार यांचा आहे. बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे. पण अमित शाह यांच्या मस्तीपायी आणि माजोरडेपलंणामुळे हे दोन्ही पक्ष त्यांच्या हातात त्यांनी ठेवले आहेत असंही राऊतांनी परखडपणे सुनावलं.
भाजप ही वॉशिंग मशीन, अमित शाह हे वॉशिंग पावडर
भाजपचा चेहरा वेगळा मुखवटा वेगळा आहे. हे मुखवट्यावर चाललेलं सरकार आहे. अनेक भ्रष्टाचारी मोठमोठे भ्रष्टाचारी भाजपने आपल्या पक्षात घेतले आहेत अशी टीकाही राऊत यांनी केली. भाजप ही वॉशिंग मशीन आहे. अमित शाह हे वॉशिंग पावडर आहेत. भाजपच्या वाशिंग मशीनमध्ये घालायचं आणि वरून अमित शाह यांची वॉशिंग पावडर टाकायची , अजित पवार, अशोक चव्हाण तसेच झाले आहेत अशा शब्दांत राऊतांनी टीकास्त्र सोडलं.
अजित पवारांवर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. आम्ही केला नाही. भोपाळमध्ये भाजपच्या कार्यक्रमात त्यात देशाचे पंतप्रधान जबाबदारीने बोलले, अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावर. आणि पुढच्या आठ दिवसात ते मंत्रिमंडळात आले. अजित पवार यांचं म्हणणं योग्य आहे. सिंचन घोटाळ्याचं काय झालं. याचं उत्तर फडणवीस यांनी द्यावं आणि देशाच्या पंतप्रधानांनी द्यावं. काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचाराच्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता. देशातील सर्वात मोठा संरक्षण खात्यातील घोटाळा हा संदर्भ होता. त्यात अशोच चव्हाण यांचा उल्लेख होता. त्यानंतर चव्हाण वाजत गाजत भाजपमध्ये आले. त्यामुळे अशोक चव्हाण यांनाही प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. आदर्श घोटाळ्याची श्वेत पत्रिका काढली त्याचं काय झालं ? असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले.
