Sanjay Raut : निवडणूक आयोगाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयातून काय सूचना गेल्या?, महाराष्ट्रात खळबळ उडवणारा संजय राऊत यांचा गौप्यस्फोट काय?
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकीत ६६ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. पैशाचा पाऊस आणि राजकीय दबावामुळे उमेदवारांना माघार घ्यायला लावले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, आयोग सरकारचे 'पाळीव मांजर' असल्याची टीका त्यांनी केली.

मुंबईसह 29 महापालिकांची निवडणूक जाहीर झाली असून आणखी 12 दिवसांनी म्हणजेच 15 जानेवारीला मतदान होणार आहे. मात्र या निवडणुकीत एकही मत पडण्यापूर्वीच राज्यातील अनेक भागात भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेनेच उमेदवार निवडून आले आहेत. 15 जानेवारील मतदान आणि 16 जानेवारील मतमोजणी होण्यापूर्वीच भाजप-शिवसेनेचे 66 उमेदवार नगरसेवकपदी निवडून आल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र यामुळे मोठी खळबळ माजली असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी परखड शब्दांत टीका केली. याला यशस्वी वाटचाल कशी म्हणता येईल ? ६६ लोक बिनविरोध येतात ही काय निवडणूक आहे?. मतदारांनी करायचं काय? असा सवाल राऊत यांनी विचारला.
काय म्हणाले राऊत ?
देशाच्या इतिहासात , जगाच्या इतिहासात इतके बिनविरोध लोक कधी निवडून आले नव्हते. 60-65 लोकं बिनविधोध कसे निवडून येतात, कोणत्या आधारावर ते निवडून येतात ? त्यांचं असं काय कर्तृत्व आहे की लोकांनी त्यांना बिनविरोध निवडून द्यावं ? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. या देशातल्या मोठ-मोठ्या नेत्यांना लोकांनी बिनविरोध निवडून दिलेलं नाहीये. अटलबिहारी वाजपेयी, बॅ. नाथ पै कधी बिनविरोध निवडून आलेले नाहीत. वसंतदादा पाटील, राममनोहर लोहिया अगदी नरेंद्र मोदी कधी बिनविरोध निवडून आले नाहीत.
निवडणूक आयोगाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयातून सूचना , राऊतांचा गौप्यस्फोट
या महाराष्ट्रात नवीन ट्रेंड सुरू आहे बिनविरोध निवडून आणण्याचा.. जबरदस्तीने उमेदवारांना माघार घ्यायला लावली जात आहे. उमेदवारांवर पैशाचा पाऊस पाडला. पाच पाच कोटी, 10-10- कोटी रुपये दिले., माघार घेण्यासाठी. मनसेच्या मनोज घरत यांना दिलेला आकडा डोळ्याचे बुबूळ बाहेर येण्यासारखा आहे. पाच पाच कोटीच्या बॅगा जळगावातील उमेदवारांना दिले. निवडणूक आयोगाला स्पष्ट सूचना होत्या. तीन वाजताची उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होती. पण तीन नंतर कोणी आले तर अर्ज मागे घ्या आणि तीनची वेळ टाका अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून निवडणूक आयोगाला दिल्या होत्या असा आरोप संजय राऊत यांनी केला.
निवडणूक आयोग हे सरकारचे हरकामे
मी त्याबाबत ट्विटही केलं. मला माहीत आहे. काही अधिकाऱ्यांनी मला फोन करून सांगितलं. आरओ म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांचे फोन कॉल चेक करा. कुणाचे फोन आले. २४ तासात, कोणत्या पालकमंत्र्यांचे फोन आले हे चेक करा. मग बिनविरोधातील रहस्य कळेल. ६६ लोक बिनविरोध येतात ही काय निवडणूक आहे?. मतदारांनी करायचं काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोणी विकले गेले असतील किंवा दबावाने मागे घेतला असेल तर त्या भागातील मतदारांनी काय करायचं. निवडणूक आयोगाने याचा कधी विचार केलाय का ?. निवडणूक आयोग या भ्रष्टाचाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे. पाळीव मांजर आहे. निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि देशाचे. नोकर आहेत या भ्रष्टाचाऱ्यांचे आहे. राज्यातील दोन्ही निवडणूक आयोग हे सरकारचे हरकामे आहेत अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
