
मुंबई, दि. 10 फेब्रुवारी 2024 | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा आंदोलन करणार आहेत. विधिमंडळाचे अधिवेशन बोलवून कायदा करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आजपासून उपोषण करणार आहेत. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोलणार आहेत. राज्यातून थेट अयोध्येसाठी पहिली बस सुरु झाली आहे. ही बस धुळ्याहून थेट आयोध्याला जाणार आहे. यामुळे रामभक्तांची मोठी सोय झाली आहे. नागपूरसह विदर्भात पुढील तीन दिवस वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सामन्यातून पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात आली आहे. मिंधे फडणविसांचे गुंडराज हा अग्रलेख लिहून सरकारवर टीका केली आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथे प्रचंड गारपीट झाली आहे. शेतकऱ्यांवर पुन्हा आसमानी संकट आलं आहे. पावसामुळे गहू, तूर आणि हरबरा पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
निखिल वागळे याच्यावर अनेकदा हल्ले झाले आहेत. अनेकदा वागळे बोलण्याच्या अधिकाराचा दुरुपयोग करतात, त्यामुळे लोक पण दुरुपयोग करतात मग अशा घटना घडतात, अनेकदा हल्ले होतात. त्यामुळे दोन्ही कडून हे थांबल पाहिजे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
17 व्या लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आहे. सभागृहाच्या शेवटच्या दिवशी श्वेतपत्रिका आणि राम मंदिराबाबत आभारप्रस्ताव मांडण्यात आला.
हल्दवानी हिंसाचाराच्या घटनेवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, ज्याने कायदा मोडला असेल, त्याच्याशी कायदा कठोरपणे वागेल. दंगलखोरांना आम्ही सोडणार नाही.
पीएम मोदी लोकसभेत म्हणाले की, निवडणुका फार दूर नाहीत पण काही लोक घाबरले आहेत, पण ही परंपरा आहे जी लोकशाही मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे. आपल्या लोकशाहीची ताकद पाहून जग थक्क झाले आहे.
राज्यसभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, जेव्हा रामजन्मभूमी आणि प्राणप्रतिष्ठा यावर चर्चा होते, तेव्हा मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, अशा पवित्र विषयावर आम्हाला बोलायला मिळाले. आपल्या सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
मुंबई : घाटकोपर येथील वार्ड क्रमांक १२५ च्या माजी नगरसेविका रुपाली सुरेश आवळे आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सुरेश आवळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. आमदार प्रकाश सुर्वे या प्रसंगी उपस्थित होते.
नवी दिल्ली : लोकसभेचे हे अधिवेशन गेम चेंजर ठरले. या काळात विविध सुधारणा लागू करण्यात आल्या ज्याने २१व्या शतकातील भारताचा पाया रचला आहे. भारताने अभूतपूर्व वेगाने प्रगती केली हे अत्यंत समाधानाने सांगू शकतो. मागील पिढ्यांनी ज्या बदलांची दीर्घकाळ वाट पाहिली होती ते बदल 17 व्या लोकसभेत साकार झाले असे नरेंद्र मोदी म्हणाले.
नवी दिल्ली : तिहेरी तलाकबाबत मुस्लिम भगिनी यांच्या बाजूने न्यायालयांने निर्णय दिला. तरीही त्यांना तो अधिकार मिळत नव्हता. त्यांना मजबुरीतून जगावे लागत होते. परंतु, 17 व्या लोकसभेने तलाकपासून स्वातंत्र्य आणि महिला शक्तीचा आदर करण्याचे काम केले आहे. ज्या अनेक वर्ष वाट पहात होत्या त्या मुस्लिम भगिनींना तिहेरी तलाकपासून मुक्त केले असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
नवी दिल्ली : आम्ही दहशतवादाविरोधात कठोर कायदे केले आहेत. त्यामुळे दहशतवाद सारख्या समस्यांशी झगडणाऱ्या लोकांना एक बळ मिळाले आहे. भारताला दहशतवादापासून पूर्ण स्वातंत्र्याची अनुभूती मिळत आहे. ते स्वप्नही साकार होणार आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
नवी दिल्ली : 17 व्या लोकसभेच्या माध्यमातून अनेक कामे पूर्ण झाली. अनेक पिढ्यांनी राज्यघटनेचे स्वप्न पाहिले होते. परंतु, संविधानात प्रत्येक क्षणाला तडे गेले. या सभागृहाने कलम 370 हटवून संविधानाच्या पूर्ण स्वरुपात प्रगती केली. जम्मू-काश्मीरमधील लोक न्यायापासून वंचित होते, आज त्यांनाही न्याय मिळत आहे असे पीएम मोदी यांनी सांगितले.
नवी दिल्ली : सभागृहाची नवीन इमारत असावी, अशी सर्वांनी चर्चा केली आणि निर्णय घेतला. हा तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा परिणाम आहे की आज आपणाला नवीन घर मिळाले आहे.
नवी दिल्ली : गेली पाच वर्ष ही रिफॉर्म, परफॉर्म और ट्रांसफोर्मची होती. सुधारणा आणि कार्यप्रदर्शन दोन्ही आहे हे फार दुर्मिळ आहे. आपण आपल्या समोरील बदल पाहू शकतो. देश 17 व्या लोकसभेच्या माध्यमातून याचा अनुभव घेत आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
नवी दिल्ली : जी 20 चे अध्यक्ष पद भारताला मिळाले हा देशाचा सन्मान आहे. एक संकल्प घेऊन आम्ही पुढे जात आहोत. जाणार आहोत. पाच वर्षांत देशसेवेसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. लोकशाहीच्या महान परंपरेचा आजचा दिवस महत्त्वाचा आहे. 17 व्या लोकसभेने 5 वर्षांच्या देशसेवेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि अनेक आव्हानांचा सामना करूनही, प्रत्येकाने योग्य दिशा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असे, पंतप्रधान मोदी म्हणाले.
नवी दिल्ली : 5 वर्षातील काळात एकाच वेळी देशाने अनेक संकटे पाहिली. पण, देशाचे काम थांबले नाही. कोरोना काळात खासदारांनी मानधनातील 30 टक्के निधी सोडला. लोकसभा अध्यक्ष यांचे विशेष आभार मानतो. भारताचे सामर्थ्य वाढत आहे. जगात भारताचे नाव घेतले जात आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लीलावती रुग्णालयात जाऊन शिवसेना आमदार सदा सरवणकर आणि आमदार संजय शिरसाट यांच्या प्रकृतीची चौकशी केली. सदा सरवणकर यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी अचानक बिघडल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे प्लेटलेट्स काऊंट कमी होऊन त्यांना श्वासोच्छ्वास करायला त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तर आमदार संजय शिरसाट यांच्या मानेला गाठ झाल्याने त्यांना त्यावर उपचार करण्यासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अहमदनगर जिल्ह्यात 450 किलो गांजा पकडण्यात आला आहे. राहाता पोलीसांनी ही मोठी कारवाई केली आहे. आरोपी राहुल आरणे आणि सचिन पवार यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. विना नंबर प्लेटच्या गाडीचा संशय आल्याने पोलीसांनी झाडाझडती घेतली असता 450 किलो गांजा सापडला.
निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना पर्वती पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेसह अजित पवार गटाचे दत्ता सागरे आणि महायुतीचे कार्यकर्ते पर्वती पोलीस स्टेशनला हजर झाले आहेत. तोडफोडीनंतर 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, तर सभेच्या आयोजनाबद्दल एकूण 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल निखिल वागळेंच्या सभेला भाजपसह महायुतीने विरोध केला होता.
जलयुक्त शिवार योजनेमुळे मोठ्या प्रमाणात गावागावात पाणी उपलब्ध करू शकलो. मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेत जलयुक्तवर अनेक आरोप करण्यात आले. जलयुक्तमुळे जमिनीचा पोत खराब होतो, भूजल पातळीवर परिणाम होतो असा आरोप होता.पण उच्च न्यायालयाने तज्ञ समितीचा अहवाल स्वीकारला. भूजल पातळी वाढ झाली हे मान्य केलं आणि या योजनेवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पुढच्या वर्षापर्यंत 100 टक्के नळांना पाणी येईल. वेगवेगळे स्रोत आपण विकसित केले आहेत. पाऊस कमी पडला तर काय ? म्हणून जास्त स्रोत तयार करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जलयुक्त शिवरा मुळे मूलभूत संकट दूरं झाल्याचं त्यांनी सांगितले.
शरद पवारांनी कालच्या पुण्यातील घटनेची माहिती घेतली. निखील वागळे यांच्यासह इतरांवर हल्ला झाला होता. काल शरद पवार गटाच्या महिलांना पण मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलीस आयुक्तांना भेटून कारवाई करण्याची मागणी करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
जरांगे पाटील यांच्या उपोषणचा पहिला दिवस असून जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी जरांगे पाटील यांना उपोषण दरम्यान औषधोपचार घ्यावे असा निरोप दिला. परंतू जरांगे पाटील यांनी नकार दिला आहे.
आम्ही देखील साठीच्या पुढे गेल्याने आम्हाला कधी संधी मिळणार अशा भाषेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना पुन्हा डीवचलं आहे.
राम मंदिरासाठी आम्ही मोठा काळ वाट पाहिली आहे, असे अमित शहा यांनी म्हटले आहे.
वकील असीम सरोदे करणार याचिका दाखल. पुण्याच्या नवीन पोलीस आयुक्तांनी करावाई करावी अन्यथा थेट पोलीस आयुक्तांना दोषी करणार. काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम असीम सरोदेंच्या भेटीला.
मला आज कुणाच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचं नाही. 22 जानेवारी हा दिवस दहा हजार वर्षातील सर्वात महत्त्वाचा आणि एतिहासिक दिवस आहे. 22 जानेवारी हा दिवस राम भक्तांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा दिवस. अध्यात्मिक क्षेत्रातील चेतना देणारा दिवस, देशाला विश्वगुरूच्या दिशेने नेणारा दिवस,असे अमित शाह यांनी म्हटले.
एखादा जीव गेला तरी चालेल, पण करोडो मुलांच्या चेहऱ्यावर, करोडो गोरगरिबांच्या पदरात आरक्षण टाकायचे आहे. सरकारने दोन दिवसात सगे सोयरे कायदा पारित कारावा. हैद्राबाद गॅझेट घेण्यात यावा. जर सकाळी राष्ट्रपती राजवट उठवू शकते, सरकारने दोन दिवसात अधिवेशन घ्यावे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
निखील वागळे आणि मुंबईतील परवाची घटना म्हणजे राज्यात गुंडा राज सुरु झाले आहे. सत्ताधारीच कायदा हातात घेत आहे. या देशात व्यक्ती स्वातंत्र्य नाही का?. कोणी सभा घेऊन आपले मुद्दे मांडू शकत नाही का? निखील वागळे यांचे मुद्दे खोडून काढा, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी म्हटले आहे.
उद्या रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. दुरूस्ती आणि देखभालीच्या कामासाठी हा हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणेला काँग्रेसचे नेते आले नाहित कारण राम मंदिर बनू नये अशी काँग्रेसची इच्छा होती असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
काँग्रेसने धर्माच्या नावावर राजकारण केलं असा घणाघात श्रीकांत शिंदे यांनी सभागृहात केला. आजही काँग्रेसच्या नेत्यांना औरंगाबादचे नाव बदलू नये असं वाटते, अशी टीकाही त्यांनी केली.
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली आहे. ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वाचा सविस्तर
महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपयांचा निधी द्या… धनंजय मुंडे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी,, नुल मधील सुरगीश्र्वर संकुल भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्यात केली मागणी… सुरगीश्वर मठाच्या जमिनी सेंद्रिय शेतीखाली आणण्यासाठी सरकार मार्फत करू… कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा
स्वतःला पुरोगामी म्हणायचं आणि हिंदू देवतांबद्दल वाईट बोलायचं, हा निखिल वागळे यांना छंद लागला आहे. निखिल वागळे मोहम्मद पैगंबर , इस्लाम धर्मातील प्रथा यावर वागळे बोलणार का ? भाजप खासदार अनिल बोंडे यांचा सवाल
भारतीय न्यायाव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी योग्य वेळी न्यायालयात उत्तर देईन असे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे. वानखेडे यांच्याविरोधात ईडीकडून PMLA कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पाणी नियोजनावर पाणी फिरले आहे. पाणी टंचाई तोंडावर असताना अजून देखिल पाणी टंचाईचा आराखडा तयार नाही. डिसेंबरमध्ये पाणीटंचाई आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र पाणी टंचाईचा कृती आराखडा अजनूही कागदावरच आहे. गतीमान प्रशासन असणाऱ्या प्रशासनालाच वेळ मिळत नाही. दरवर्षी १०० हून अधिक गावातल्या १५० वाड्यांमध्ये भासते तीव्र पाणी टंचाई. दरवर्षी प्रशासनाला ३० ते ४० टँकरची गरज, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे जिल्ह्यात आणीबाणीची परिस्थिती आहे.
मुख्यमंत्र्यांचे गुंडांसोबत फोटो आहेत. राज्यात जागोजागी गुंडगिरी सुरू आहे. गुंडांच्या साथीने सरकार राज्य चालवत आहे, संजय राऊत यांची टीका.
पुण्यातील तोडफोड प्रकरणात १० पदाधिकाऱ्यांवर पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल निखिल वगळेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी पार्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील कारवाई करत आहेत.
2 दिवसांत सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं. सगेसोयऱ्यांचा कायदा पारित करून अंमलबजावणी तत्काळ करा – मनोज जरांगे पाटील
छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्मबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. काल भुजबळांना पुन्हा धमकीचं पत्र आलं आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीकडून पोलिसात तक्रार दाखल दाखल करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भुजबळांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं आंदोलन होत आहे. आंदोलनाला मोठा पोलीस बंदोबस्त लावला आहे. काल महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. निर्भया बनो सभेत गोंधळ झाला. त्यामुळे बालगंधर्व चौकात पोलीस तैनात आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यात वाहतुक करण्यास मनाई करण्यात आली आहे. मुरघास, आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी हे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज गडहिंग्लज आणि चंदगड दौऱ्यावर आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा शुभारंभ आणि शेतकरी मेळाव्याला उपस्थित ते उपस्थित असणार आहेत. गडहिंग्लजच्या नुलमधल्या सुरगिश्र्वर मठातील कार्यक्रमाने होणार अजितदादांच्या दौऱ्याची सुरवात होणार आहे. मठाच्या परिसरात अजितदादांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांच्या मतदार संघात आज अजितदादांचे विविध कार्यक्रम आहेत.
पुण्यातील निखिल वागळे गाडी तोडफोड प्रकरणात राष्ट्र सेवा दलाच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या 43 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर पण गुन्हा दाखल. पर्वती पोलीस ठाण्यात आंदोलन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल. काल भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आले होते आमनेसामने.
आंबा बोर्ड स्थापन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. येत्या आठ दिवसात त्यासाठीचा अध्यादेश काढला जाणार आहे. आंबा बोर्डासाठी राज्य सरकारकडून 200 कोटी रुपयांची तरतूद. रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र आंबा बोर्ड.
व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्यांचा पर्दाफाश. राजापूरात वनविभागाच्या टिमने थरारक पाठलाग करत 10 कोटींची व्हेल माशाची उलटी केली जप्त. राजापूर तालुक्यातील पाचल ताम्हाणे रस्त्यावरची घटना. व्हेल माशाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, राजापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल.
जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव येथे गोळीबार प्रकरणात गंभीर जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी तरुणांमध्ये सायबर जागृतीकरीता सायबर जागृती यात्रा आयोजित केली आहे. यामध्ये शहरातील वेगवेगळ्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांसोबत सायबर गुन्हे व त्यांना प्रतिबंध करण्याचे उपाय सांगितले जात आहे.
राज्यातील एनएमएमएस परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत १ लाख विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. २ लाख ६६ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षेअंतर्गत ८ वी मधील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेवून १२ वी पर्यंत १२ हजार शिष्यवृत्ती दिली जाते.
मिंधे फडणविसांचे गुंडराज हा अग्रलेख लिहून सामन्यातून पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. राज्याची अवस्था कमालीची बिकट झाली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने ही बिकट परिस्थिती किती टोकाला गेली ते दिसले. पोलीस पक्षपाती बनले आहेत, असा आरोप सामन्यात केला आहे.
श्रीरामाच्या दर्शनासाठी एसटी मंडळाचा उपक्रम सुरु झाला आहे. भगवान रामाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील पहिली एसटी बस अयोध्याला रवाना झाली. धुळ्यावरुन ही बस थेट अयोध्या सुरु करण्यात आली आहे. फुलांनी आणि फुग्यांनी सजवली बस अयोध्येसाठी रवाना झाली.