“पहलगाममध्ये धर्म विचारुन गोळ्या घातल्या अन् इथे भाषा विचारुन…”; आशिष शेलारांचा खळबळजनक आरोप
ठाकरे बंधूंनी हिंदी लादण्याच्या निर्णयाला विरोध केल्यानंतर झालेल्या विजय मेळाव्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली. शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या भाषणांना अपूर्ण आणि अप्रसंगिक म्हटले. त्यांनी मनसेची तुलना दहशतवाद्यांशी केली. मेळाव्यामुळे ठाकरे कुटुंबातील ऐक्य दिसून आले, पण राजकीय आघाडीवर तीव्र वाद निर्माण झाला.

राज्यात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या निर्णयाला ठाकरे बंधूंनी विरोध केला. यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आक्रमक होत हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढणार असल्याचे आवाहन केले. मात्र या मोर्चापूर्वी सरकारने दोन्हीही निर्णय रद्द केले. यानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र येत विजयी मेळावा साजरा केला. या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. हे दृश्य पाहून शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या मेळाव्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.
निष्पाप हिंदूंना भाषा विचारुन चोपतात
भाजप मंत्री आशिष शेलार यांनी मनसे कार्यकर्त्यांबद्दल मोठे विधान केले. आशिष शेलार यांनी मनसेची तुलना थेट पहलागममधील दहशतवाद्यांशी केली आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हिंदू धर्म विचारुन गोळ्या घातल्या. इथे हे लोक निष्पाप हिंदूंना भाषा विचारुन चोपतात, यांच्यात काय फरक आहे? असा सवाल आशिष शेलार यांनी केला. भाजप सत्तेत मोठा भाऊ आहे. त्यामुळे आम्ही संयमाने घेत आहोत, असे आशिष शेलार म्हणाले.
दोन कुटुंबं एकत्र आले याचा आम्हाला आनंद
दोन भाऊ एकत्र आले हे छान झालं, दोन कुटुंबं एकत्र आले याचा आम्हाला आनंद आहे. कुटुंब एकत्र येण्यासाठी आम्ही कायम असतो,” असे म्हणत आशिष शेलार यांनी कौटुंबिक ऐक्याचे स्वागत केले. मात्र, राजकीय आघाडीवर त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. कालच्या कार्यक्रमातील भाषणे “अपूर्ण, अप्रसंगिक आणि अवास्तव” असते. राज ठाकरे यांचे भाषण अपूर्ण होते, तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सत्ता गेल्याचं दुःख दिसून आलं. ते मूळ विषय सोडून अप्रसंगिक बोलले, असा आरोप आशिष शेलार यांनी केला. ज्यांच्याकडे बोलायला मुद्दे नसतात, ते विपर्यास करतात, असेही आशिष शेलार यांनी म्हटले.
तेव्हा या दोघांची तोंड बंद होती का?
त्रिभाषा कोणी आणली, याबाबत दिलेली माहिती चुकीची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निर्णय घेतला तेव्हा ठाकरे बंधू गप्प का होते. मराठी भाषेचा दर्जा हा निर्णय केला, तेव्हा या दोघांची तोंड बंद होती, अभिनंदन का केलं नाही? भाषेच्या विषयाशी यांना घेणं देणं नाही,” असेही आशिष शेलार म्हणाले.