राज्यात जिल्हा पातळीवर पुन्हा लॉकडाऊन!, कोणत्या जिल्ह्यात काय सुरु आणि काय बंद राहणार?

दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. अशावेळी आता जिल्हा पातळीवर लॉकडाऊन वाढवण्याचे निर्णय घेतले जात आहेत.

राज्यात जिल्हा पातळीवर पुन्हा लॉकडाऊन!, कोणत्या जिल्ह्यात काय सुरु आणि काय बंद राहणार?
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. अशावेळी आता जिल्हा पातळीवर लॉकडाऊन वाढवण्याचे निर्णय घेतले जात आहेत. आज नाशिक, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, वाशिम, सातारा, सोलापूर आणि वर्धा या जिल्ह्यात कडक लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या विचाराने हा निर्णय घेण्यात येत आहे. (Decision to lockdown at local level in some districts)

नाशिक  लॉकडाऊन –

नाशिक शहरात 12 मे म्हणजे बुधवारपासून पूर्ण टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 12 तारखेला दुपारी 12 ते 22 तारखेच्या दुपारी 12 असे 10 दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या काळात रुग्णालये आणि औषधी दुकाने सोडून सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. कुणालाही रस्त्यावर फिरता येणार नाही, अशी माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिलीय.

अमरावती लॉकडाऊन –

अमरावती जिल्ह्यात रविवारपासून 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी केलीय. या काळात फक्त रुग्णालये आणि औषधी दुकाने सुरु राहणार आहेत. त्यामुळे आता कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात दारुच्या दुकानांसमोर मोठी गर्दी होत असल्यामुळे आता दारुची दुकानंही बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

यवतमाळ लॉकडाऊन –

यवतमाळ जिल्ह्यातही रविवारपासून 15 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक बाबी सुरु राहणार आहेत. ठरवून दिलेल्या वेळेनंतर दुकाने सुरु ठेवल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय.

कोल्हापूर लॉकडाऊन –

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी काही गंभीर बाबी दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे 2 दिवसांत लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल. कोल्हापुरात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी वाढतेय. तसंच तरुण मुलांचं मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे 10 ते 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन करावा लागेल असे संकेत मुश्रीफ यांनि दिले आहेत.

वर्धा लॉकडाऊन –

वर्धा जिल्ह्यात 8 मे ते 13 मे दरम्यान कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लॉकडाऊन असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी पाहायला मिळत होती. त्याचा परिणाम जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा झपाट्याने वाढत होता. अशावेळी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी 5 दिवस कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. या काळात फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकानांना पार्सल सुविधेचीच परवानगी देण्यात आलीय. तसंच कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.

वाशिम लॉकडाऊन –

वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी रविवारपासून ते 15 मे पर्यंत 6 दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आज या लॉकडाऊनचा दुसरा दिवस आहे. वाशिम शहरातील मुख्य रस्त्यावर आणि चौकात शुकशुकाट दिसून आला. तसंच व्यापाऱ्यांनी आपली दुकानं पूर्णतः बंद ठेवली आहेत. या लॉकडाऊन दरम्यान कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी राहणार आहे. तसंच दवाखाने, मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना पूर्णतः बंद राहणार आहे. यात अत्यावश्यक सेवेतील किराणा, भाजीपाला, फळ आणि दूध घरपोच सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंत मुभा देण्यात आली आहे.

सातारा लॉकडाऊन –

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत सातारा जिल्हा सातव्या क्रमांकावर तर मृत्यूदराच्या बाबतीत चौथ्या स्थानावर आहे. सातारा जिल्ह्यात सध्या 20 हजार 448 कोरोना रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 2 हजार 828 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. रुग्णांसाठी बेड उपलब्ध करण्याचं मोठं आव्हान सध्या आरोग्य यंत्रणेसमोर उभं आहे. अशा स्थितीत सातारा जिल्ह्यात रविवारपासून लॉकडाऊन अजून 5 दिवस वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यातील लॉकडाऊन आता 15 मे पर्यंत करण्यात आलाय. तशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलीय.

सोलापूर लॉकडाऊन-

सोलापूर शहर जिल्ह्यात रविवारी रात्री आठ वाजल्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. हा लॉकडाऊन 15 मे पर्यंत असणार आहे. या काळात भाजीपाला, किराणा दुकाने, चिकन, मटण, अंड्याची दुकानं पूर्णत: बंद राहतील. त्याचबरोबर मार्केट हाऊस, रिसॉर्ट, लॉजही बंद राहणार आहेत. किराणा दुकाने आणि भाजीपाला विक्रेत्यांना सकाळी 7 ते 11 या वेळेत घरपोच सेवा देण्याच मुभा देण्यात आलीय. तसंच सकाळी 6 ते 9 या वेळेत दूध विक्रेत्यांना घरपोच दूध देता येणार आहे.

संबंधित बातम्या :

जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक झाला कोरोना योद्धा, रुग्णांसाठी स्वखर्चानं मोफत ॲम्ब्युलन्स सेवा सुरु

ग्रामीण भागात कोरोना वाढला, महाराष्ट्रासाठी मोदी सरकारने पाठवली मोठी आर्थिक रसद

Decision to lockdown at local level in some districts