भाजपचा प्लॅन बी, पुन्हा निवडणुकीची तयारी सुरु, महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका?

जर मुदतीत सरकार स्थापन झालं नाही, तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल. त्यानंतर पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील. त्याची तयारी भाजपने आतापासून सुरु केल्याची चर्चा आहे.

  • विशाल ठाकूर, टीव्ही 9 मराठी, धुळे
  • Published On - 10:59 AM, 4 Nov 2019

धुळे : भाजप- शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नाही. त्यामुळे भाजपने आता ‘प्लॅन बी’ची तयारी सुरु केली आहे.  भाजपने पुन्हा निवडणूक (Maharashtra midterm election) लढवण्याची चाचपणी सुरु केली आहे.  भाजप नेते आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी भाजपच्या धुळे अध्यक्षांची भेट घेऊन भाजप पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. यावेळी रावल यांनी धुळे जिल्ह्यातील विधानसभेच्या (Maharashtra midterm election) पाचही मतदारसंघात तयारी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. शिवसेनेसोबतच्या वादानंतर महाराष्ट्रात भाजपची एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपने हालचाली सुरु केल्या आहेत.

भाजपच्या या हालचाली म्हणजे महाराष्ट्रावर पुन्हा निवडणुका लादण्याची चिन्हं आहेत. जर मुदतीत सरकार स्थापन झालं नाही, तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल. त्यानंतर पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील. त्याची तयारी भाजपने आतापासून सुरु केल्याची चर्चा आहे.

पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी धुळे जिल्ह्यात पुन्हा विधानसभा निवडणुकीबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्याची आढावा बैठक घेतली. मध्यावधी निवडणुकीसाठी भाजपने स्वबळावर तयारी करण्याचे आदेश मंत्री रावल यांनी दिल्याचं सांगण्यात येत आहे.

धुळे जिल्हातील पाचही मतदारसंघांचा आढावा घेऊन, भाजप कार्यकर्त्यांना तयारी करण्याचे आदेश देण्यात आले. साक्री आणि धुळे ग्रामीण मतदारसंघात 5 ते 10 हजार मते जमविण्यासाठी रणनीती ठरल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, भाजपचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी मंत्री रावल यांच्यासोबत मध्यावधी निवडणुकीबाबत बैठक झाल्याचं मान्य केलं आहे.