
राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया 15 जानेवारी 2026 रोजी पार पडेल. सध्या पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. महापालिकेवर एक हाती सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे यांची बारा वाजता अमरावती जाहीर सभा आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील आज सायंकाळी अमरावतीत कॉर्नर सभा घेतील. भाजपा आणि शिवसेना शिंदे गट कुठे युती म्हणून तर कुठे स्वतंत्रपणे निवडणुका लढत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलास देशमुख यांच्याबद्दल केलेल्या धक्कादायक विधानानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुरुवारी ठाण्यात रोड शो होणार आहे. राज ठाकरे या दरम्यान ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखांना भेट देणार आहेत. राज ठाकरे मनसेच्या ठामपा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची सदिच्छा भेट घेणार आहेत. राज ठाकरेंच्या या रोड शोला गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता सुरुवात होईल.
मालाडच्या प्रभाग क्रमांक 34 मधील अपक्ष उमेदवारावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अपक्ष उमेदवारावर दगडफेट करण्यात आल्याची माहिती आहे. अरबाज असलम शेख असं दगडफेक झालेल्या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवारावर दगडफेक करण्यात आली. आता या प्रकरणात मालवणी पोलीस तपास करत आहेत.
राजकीय वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे मनपा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांची साथ सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. संदीप देशपांडे यांना जागावाटपाच्या चर्चेपासून दूर ठेवल्याने ते नाराज असल्याचं म्हटलं जातंय. आता राज ठाकरे देशपांडे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती मिळाली आहे.
दहिसर प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रकाश दरेकरांच्या समर्थनार्थ चौक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपा खासदार आणि गायक मनोज तिवारी यांनी या सभेतून उत्तर भारतीय मतदारांना प्रकाश दरेकर यांना मतदान करण्याचं आवाहन केलं.
मनोज तिवारी यांनी आपल्या भाषणातून-गाण्यांद्वारे उपस्थित नागरिकांमध्ये उत्साह निर्माण केला. यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि मंत्री प्रविण दरेकर हेही उपस्थित होते. सर्व नेत्यांनी प्रकाश दरेकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
मनसेप्रमुख राज ठाकरे हे भांडपुमध्ये राजुल पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. भांडुपमध्ये मनसे बंडखोर अनिशा माजगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अनिशा माजगावकर यांनी राज ठाकरे भांडुपमध्ये आले असता त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तिथून पुढे काही अंतरावर शिवसैनिक आणि मनसैनिक हे राज ठाकरे यांची वाट पाहत होते. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.
वाॅर्ड 92 चा शिवसेना अधिकृत उमेदवार हाजी सालिन कुरेशीवर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. वांद्रे इथल्या ज्ञानेश्वर नगर इथे हा हल्ला झाला. प्रचारातच अज्ञात इसमांनी हल्ला केला. पोटात चाकू मारल्याची प्राथमिक माहीती आहे. हाजी सालिम कुरेशी यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इस्रो नवीन वर्षातील त्यांच्या पहिल्या मोहिमेची तयारी करत आहे. 12 जानेवारी रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून PSLV-C62 मिशनचे प्रक्षेपण करणार आहे. इस्रोच्या एका अधिकाऱ्याच्या मते, मोहिमेचा प्राथमिक पेलोड EOS-N1 आहे, जो संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने धोरणात्मक हेतूंसाठी बनवलेला एक इमेजिंग उपग्रह आहे.
अर्ज माघारीसाठी राहुल नार्वेकरांनी दबाव टाकल्याचा आरोप तेजल पवार यांनी केला आहे. तेजल पवार या वॉर्ड क्रमांक 226 मधून अपक्ष उमेदवार आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठी दहा लाखांची ऑफर दिल्याचंही तेजल पवार यांनी सांगितलं. तर राहुल नार्वेकरांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
संभाजीनगरमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. कैलासनगर भागातील कार्यालय अज्ञाताकडून पेटवण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. दादांचा कार्यालय जाळणार भाजपाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने बीएमसी निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘आपली मुंबई’ हे ‘सर्वांसाठी मुंबई’ चे स्पष्ट दृष्टिकोनातून हा जाहीरनामा बनवण्यात आला आहे. ज्यामध्ये गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत सर्वांना समान संधी मिळतील.
शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक महापालिकेच्या प्रचार सभेत म्हटले की, नाशिकला शिवसेनेची सत्ता आणायची आहे. राष्ट्रवादी आपल्या सोबत आहे. आपल्या उमेदवारांना निवडून द्या, आपला विकास आम्ही करू. नगर विकास विभागाचा माध्यमातून आपल्या प्रभागाचा विकास करू. शासन आपल्या दारी आले म्हणून लोकांनी मतदान केलं. अनेक योजना आणल्या, आताही मतदान करा, आपले उमेदवार निवडून द्या.
मोहोळच्या नूतन नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे यांच्या जात प्रमाणपत्रावर भाजप नेते सोमेश क्षीरसागर आक्षेप घेतला आहे. चुकीचे कागदपत्रे जोडून सिद्धी वस्त्रे यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळवल्याची तक्रार सोमेश क्षीरसागर यांनी केली आहे. सिद्धी वस्त्रे ह्या शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात होत्या आणि अवघ्या 22 व्या वर्षी नगराध्यक्ष झाल्या आहेत.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी शासनाने प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शाळांसमोर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.अनेक शाळांमध्ये १० ते १५ वर्गखोल्या आहेत. प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही बसवण्यासाठी मोठा खर्च येतो. हा खर्च शाळांनी करायचा की शासनाने करायचा असा थेट प्रश्न शाळा संस्थाचालक उपस्थित करत आहेत.
अमरावतीच्या साईनगर प्रभागानंतर आता भाजपचा गढ असलेल्या मोरबाग प्रभागातही नवनीत राणा यांच्याकडून रवी राणांच्या युवा स्वाभिमानच्या उमेदवाराचा प्रचार केला जात आहे. युवा स्वाभिमानचे उमेदवार दिपक सम्राट यांच्यासाठी हा प्रचार केला जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या शाखांना भेटी देत असून, आज राज ठाकरेंचा पूर्व उपनगरांचा दौरा आहे. आज राज ठाकरे चेंबूर, घाटकोपर, मुलुंड, विक्रोळी या विभागातील शाखांना भेटी देणार आहेत. यावेळी राज ठाकरेंनी चेंबूर विभागातील प्रभाग क्रमांक 146 मधील शाखेला भेट दिली आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
अमित साटम यांच्या आरोपांनंतर आमदार अस्लम शेख यांची पत्रकार परिषद
आज सायंकाळी चार वाजता अस्लम शेख यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन
अमित साटम यांच्या आरोपांना देणार उत्तर
आमदार असलम शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयात बैठक
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी जिल्हा पोलिस दल सज्ज
पोलिस दलाच्या वतीने बंदोबस्ताचेही नियोजन,
९० पोलिस अधिकाऱ्यांसह १२०० कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक व्यक्तींकडून २५१ शस्त्र जमा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपद्रवी लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचार सभेत पुन्हा एकदा भाजप बंडखोरांचा गोंधळ घालण्याचा प्रयत्न
भाजप कार्यकर्ता मनोज पोतराजे यांनी त्याच्या समर्थकांसह बावनकुळे यांच्या प्रचार सभेत घुसण्याचा केला प्रयत्न
मात्र पोलिसांनी पोतराजे यांना अडवल्यानं प्रयत्न फसला
पत्नीला उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही ऐनवेळी दुसऱ्या उमेदवाराला एबी फॉर्म देण्यात आल्यानं पोतराजे नाराज
नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित दादांची राष्ट्रवादी युतीमध्ये निवडणूक लढवत असून अजित दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आणि भुजबळांचे निकटवर्तीय अंबादास खैरे यांच्याकडून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बाईक रॅलीचे स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान शिवसेना राष्ट्रवादी पॅनलच्या उमेदवारांनी शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर होईल अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त केला आहे.
आठ दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेच्या पश्चिम विदर्भ संघटक पदाचा व शिवसेनेचा राजीनामा दिलेले जगदीश गुप्ता यांची पुन्हा घरवापसी झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मन धरणीला यश आले आहे. जगदीश गुप्ता एकनाथ शिंदे यांच्यासोबत व्यासपीठावर
जळगावात ठाकरेंच्या सेनेतील जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रभाकर सोनवणे यांचा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश. विधानसभा निवडणुकीत चोप्रा मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रभाकर सोनवणे यांनी भाजपमधून ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला होता.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सुशील वेल्हाळ यांच्या दोन्ही मुलांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश. वेल्हाळ यांच्या पक्षप्रवेशामुळे गुहागर मधील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ.
पंडित धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन येथील हनुमानाचे दर्शन घेतले. बागेश्वर बाबाला बघण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भाविकांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आहे.
विकास नाही झाला तरी चालेल तो आमच्यासाठी दुसरा मुद्दा आहे पण जाती जातीत भांडण लावणे तेढ निर्माण करणे हे भाजपचे काम आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही असे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
मी विधानसभेत फिरली असती तर 10 हजार मतांनी पराभव झाला असता, अशी टीका नवनीत राणा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके यांच्यावर केली. खोडकेंचा पराभव करण्याची ताकद भगव्यात आहे, असं त्या पुढे म्हणाल्या. खासदारकीत पराभव झाल्याने नवनीत राणा नैराश्यात असल्याची टीका खोडकेंनी केली होती.
काँग्रेस आणि MIM सोबतची आघाडी चालणार नाही. अकोट आणि अंबरनाथमधील आघाडी खपवून घेणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप-काँग्रेसची युती आहे. काँग्रेस आणि MIM भाजपसोबत चालणार नाही, कारवाई होणार, असं त्यांनी म्हटलंय. अकोट आणि अंबरनाथमधील आघाडीवर फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली.
“नवनीत राणा आणि रवी राणा यांनी भाजपचा सत्यानाश केला आहे. अजित पवार यांनीच उमेदवारी दिल्यामुळे नवनीत राणा 2019 मध्ये खासदार झाल्या होत्या, तेव्हा त्या मोदींवर टीका करायच्या. नवनीत राणांचा पराभव झाल्याने त्या नैराश्यात गेल्या आहेत,” अशी टीका सुलभा खोडके यांनी केली.
भाजपकडून पुण्यात जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. पुणे महानगरपालिकेसाठी भाजपकडून जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला.
एका राजकीय पक्षाच्या गाण्यावर निवडणूक आयोगाने घेतलेल्या आक्षेपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “जात किंवा प्रादेशिकतेच्या आधारावर कोणतीही निवडणूक लढवली जाऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने गाण्यांच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली आहे आणि सर्व पक्षांनी आदर्श आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे. निवडणुकीदरम्यान ध्रुवीकरणाचं राजकारण करणं चुकीचं असून ते आदर्श आचारसंहितेच्या विरोधात आहे.”
पिंपरी चिंचवड नगरपालिका ही भारतातली सर्वात श्रीमंत नगरपालिका होती. मुंबईमध्ये 13 हजार कोटींचं कर्ज घेतलं, तसं पिंपरीमध्ये करण्यात आलं आहे. पुण्याचे पालकमंत्री हे आरोप करत आहेत. अजित पवारांनी सरकारमधून बाहेर पडावं. सरकारमध्ये राहावं आणि सरकारवरच टीका करावी हे हास्यास्पद आहे. अजित पवारांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावं आणि त्यानंतर त्यांनी आरोप करावेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
शहर चालवायचं आहे, बँक खातं नाही हे ठाकरे विसरलेत अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. मुंबई पालिकेच्या एफडीवरती फुशारक्या मारतात अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला.
अंबरनाथमध्ये काँग्रेस -भाजपा युती झाल्यावरून शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा भाजपचा प्रश्न आहे, त्यांचे नेते उत्तर देतील. आम्ही काँग्रेसच्या विरोधात उठाव केला होता, काँग्रेसला आमचा विरोध होता आणि यापुढेही राहील. केंद्रात महायुती आहे, राज्यातही आहे. पण भाजपने काँग्रेसशी आघाडी केली आहे, त्याबद्दल त्यांच्याच नेत्यांना प्रश्न विचारला पाहिजे, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
अंबरनाथमधील युतीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती झाली आहे. मात्र या युतीबाबात फडणवीस हे स्थानिक नेत्यांना विचारणा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिकमध्ये आहेत. नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेऊन ते प्रचार रॅलीचा शुभारंभ करतील. दिवसभर रोड शो नंतर संध्याकाळी ते जाहीर सभा घेतील.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक अडथळा आल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ५ एबी फॉर्म निवडणूक आयोगाकडून बाद करण्यात आले आहेत. शिवसेनेने एकूण ५४ उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते, मात्र त्यातील ५ अर्ज बाद झाल्याने हे उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. आता या पाच उमेदवारांसह इतर पाच अशा एकूण १० अपक्ष उमेदवारांना शिवसेनेने अधिकृतपणे पुरस्कृत केले आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे अपक्ष लढणाऱ्या उमेदवारांना मोठे राजकीय बळ मिळाले असून, संबंधित मतदारसंघांतील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
रेल्वेच्या भुसावळ विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या डिसेंबर महिन्यात उल्लेखनीय कामगिरी करत एकूण १५२.९५ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. विशेषतः प्रवासी उत्पन्नात गेल्या वर्षाच्या तुलनेत २३ टक्क्यांची वाढ होऊन ७९.७६ कोटी रुपये तिजोरीत जमा झाले आहेत. मालवाहतुकीतून ६४.५१ कोटी, तर विनातिकीट प्रवास करणाऱ्या ६०,६७० प्रवाशांवरील कारवाईतून ४.५८ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. पेट्रोलियम पदार्थ, कांदा आणि अन्नधान्य वाहतुकीतील भक्कम कामगिरीसह तिकीट तपासणी मोहिमेतील १३ टक्के वाढीमुळे विभागाच्या एकूण उत्पन्नाला मोठी चालना मिळाली आहे.
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी आगामी निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांना युतीचे खुले आमंत्रण दिले आहे. नगरपालिका निवडणुकीत तानाजी सावंत विरुद्ध सर्वपक्षीय युती असा तीव्र संघर्ष पाहायला मिळाला होता. मात्र आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आमची दारे सर्वांसाठी खुली आहेत, असे वक्तव्य करत सावंतांनी नवीन राजकीय समीकरणांचे संकेत दिले आहेत. ज्या विरोधकांविरुद्ध आधी संघर्ष झाला, त्यांनाच आता सोबत घेण्याची तयारी दर्शवल्याने धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी गडकरी रंगायतन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असून, यावेळी ठाणेकरांच्या मनातील प्रश्न, शहराचा विकास आणि सर्वांगीण प्रगती यावर थेट चर्चा होणार आहे. या कार्यक्रमाचे महत्त्व लक्षात घेता, संपूर्ण ठाणे शहरात २४ विविध ठिकाणी या मुलाखतीचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना या संवादात सहभागी होता येईल.
नालासोपारा-विरारमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित चौक सभेत राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी मतदारांना महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले. पालघरमधील वाढवण बंदर प्रकल्पामुळे नालासोपाऱ्यातील तरुण-तरुणींना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील आणि त्यांना नोकऱ्या देण्याची जबाबदारी आपली असेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. विशेषतः कोकणातील मतदारांना साद घालत त्यांनी मच्छीमारांसाठी केंद्राच्या ‘पंतप्रधान मत्स्य संपदा’ आणि ‘केसीसी क्रेडिट कार्ड’ यांसारख्या योजना प्रभावीपणे राबवणार असल्याचे सांगितले. या भागाचा विकास आणि सुरक्षा ही महायुतीच्या उमेदवारांची प्राथमिकता असून, सरकारचा प्रतिनिधी म्हणून विकासासाठी सर्व शक्ती पणाला लावू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात सर्वसामान्य कोल्हापूरकरांच्या गरजांना प्राधान्य दिले आहे. महिला आणि विद्यार्थ्यांना बसचा मोफत प्रवास, नागरिकांना उपचारांसाठी १० हजार रुपयांची तातडीची मदत आणि मुलांच्या शिक्षणासाठी अत्याधुनिक ‘नॉलेज सेंटर’ व शिष्यवृत्ती यांसारख्या मोठ्या घोषणा यात करण्यात आल्या आहेत. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी झोपडपट्ट्यांचा विकास, फेरीवाल्यांसाठी हक्काची जागा आणि नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी सुरक्षित पाळणाघरे उभारण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. थोडक्यात, शिक्षण, आरोग्य आणि सोयी-सुविधांच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास साधण्यावर काँग्रेसने या जाहीरनाम्यातून जोर दिला आहे.
भाजप-राष्ट्रवादीला परिवर्तन विकास आघाडीचे आव्हान. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील प्रस्थापित भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात परिवर्तन विकास आघाडीने शड्डू ठोकला आहे.
“संदीप देशपांडे आणि माझी मैत्री आधीपासून आहे. आमची नेहमी चर्चा होत असते. परंतु आता त्याचा पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा आहे. त्यामुळे राजकीय चर्चा बंद कराव्या लागतील. परंतु चहा पिण्यासाठी आम्ही एकत्र असतो. संदीप देशपांडे माझा नेता होता. त्याने पहिल जाण्याच्या आधी, मी बाहेर निघालेलो आहे. परंतु राजकीय धडे आहे आम्ही घेत राहणार. चहा प्यायला आल्यानंतर आमच्याकडचं संभाषण तुम्हाला माहित असतं” असं संतोष धुरी म्हणाले.
काय आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात?. महिला आणि विद्यार्थ्यांना केएमटी प्रवास संपूर्ण मोफत. शहरातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य उपचारासाठी तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाणार. शहरातील झोपडपट्ट्यांसाठी मॉडेल वस्ती संकल्पना राबवणार. शहरातील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सेंटर उभारणार. महापौर गुणवत्ता शिष्यवृत्ती सुरू करणार.
भाजपने दिलेल्या स्क्रिप्टनुसार संतोष धुरी बोलत आहेत. सीटिंग जागा असल्याने ती जागा त्यांना मिळाली नाही. धुरींनी भाजपची स्क्रिप्ट वाचण्यापेक्षा वस्तुस्थिती समजून घ्यावी. संतोष धुरींच्या टीकेला उद्धव ठाकरे गटाकडून सचिन अहिर यांचं उत्तर. अनेक ठिकाणी आम्ही आमच्या जागा सोडल्या असं ते म्हणाले.
एमईएल प्रभाग क्रमांक 3 मध्ये पती-पत्नी उभे आहेत निवडणुकीच्या रिंगणात, पती आहेत काँग्रेसचे उमेदवार तर पत्नी दुसऱ्या जागेहुन याच प्रभागात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार, दोघांनीही या राजकीय लढाईचा कुठलाही परिणाम होणार नाही अशी दिली आहे प्रतिक्रिया..
खासदार शाहू छत्रपती काँग्रेस नेते यांच्यासह उमेदवारांच्या उपस्थितीत होणार जाहीरनामा प्रकाशन. 15 जानेवारी… काँग्रेसच भारी. जाहीरनामा प्रकाशनाच्या निमित्ताने काँग्रेसची नवी टॅगलाईन
महानगरपालिकेसाठी ८५९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात २८० उमेदवार महिला आहेत हे विशेष. मनपाच्या ११५ जागांपैकी ५८ जागा या महिलांसाठी राखीव आहेत. मनपा निवडणुकीत यंदा महिलांची उपस्थिती केवळ आरक्षित जागांपुरती मर्यादित न राहता महिला राखीव नसलेल्या प्रभागांपर्यंत विस्तारली आहे.
भाजप, शिवसेना ,काँग्रेस,राष्ट्रवादी , मनसेसह सर्वच पक्ष आणि अपक्ष, बंडखोरांकडून जोरदार प्रचार. कल्याण पश्चिमेत शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर यांच्या विरोधात भाजप बंडखोर उमेदवार तर भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पत्नी हेमलता पवार यांच्या विरोधात शिवसेनेतील बंडखोर उमेदवार रिंगणात. पक्षातून बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा आरोप–प्रत्यारोप मुळे काही ठिकाणी निवडणुकीची चुरस वाढली
शिवाजीनगर, कात्रज, बिबेवाडी, कोंढवा, पाषाणमधील नागरिकांनी गमावले सव्वा कोटी. शेअर बाजारातील गुंतवणुकीवर भरगोस परतावा घरातून ऑनलाईन कामाची संधी तसेच तातडीने कर्ज मिळवून देण्याचे आम्हीच दाखवून सायबर चोरट्यांकडून नागरिकांना गंडवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. शहरातील शिवाजीनगर भवानी पेठ कात्रज बिबेवाडी कोंढवा आणि पाषाण मधील नागरिकांची सुमारे एक कोटी 30 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.