पालघरमध्ये रेड अलर्ट कायम, शाळांना सुट्टी, नद्या इशारा पातळीवर; जिल्हाधिकाऱ्यांकडून मोठे आवाहन
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात १५० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे आज सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत.

सध्या महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस कोसळत आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम पाहायला मिळत आहे. त्यानुसार हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सध्या पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी संभाव्य धोक्यामुळे जिल्हा प्रशासनाने पालघरमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांना अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेत जिल्ह्यातील सद्यस्थितीबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी पालघर जिल्ह्यातील परिस्थिती सांगितली. काल दिवसभर पालघर जिल्ह्यात १५० मि.मी. पाऊस पडला. त्या पार्श्वभूमीवर रात्रीपासून आणि आज दिवसभर पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे आज दिवसभर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दोन नद्या इशारा पातळीवर
पालघर जिल्ह्यात चार मोठ्या नद्या आहेत. त्यापैकी दोन नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत. त्या अनुषंगाने आम्ही सतर्कता बाळगतोय. या जिल्ह्यातील धामणी धरणातून ४ हजार क्युसेक आणि कवलास धरणातून ३० हजार क्युसेक पाणी सोडले आहे. या जिल्ह्यातील पाटबंधारे आणि इरिगेशन विभागाशी आम्ही संपर्कात आहोत. तसेच महसूल प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तर नागरिकांच्या स्थलांतराची सोय देखील करण्यात आली आहे, अशी माहिती पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिली.
एनडीआरएफची टीम सक्रीय
सध्या जिल्ह्यात डिझास्टर टीम आणि ४५ जवानांची एनडीआरएफची (NDRF) एक कायमस्वरूपी टीम आहे. डिझास्टर मॅनेजमेंटसाठी काही किट्सही दिल्या आहेत. आमच्या सर्व टीम्स समन्वय साधून आहेत आणि गरजेच्या ठिकाणी पाठवत आहोत, असेही त्या म्हणाल्या.
जे व्हिडिओ पाहिले, त्यानुसार शॉर्टकटमुळे लोक धोकादायक प्रवास करत आहेत. त्या ठिकाणी काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या त्रुटी (गॅप) असतील, तर आम्ही त्याचे नियोजन करत आहोत. ६५० गावे ‘धरती आभास योजने’ अंतर्गत आहेत, त्या योजनेकडून आम्ही त्याचे नियोजन करत आहोत. यासाठी आम्ही एक कमिटी केली आहे. तिचा अहवाल पुढच्या आठवड्यात आम्हाला भेटणार आहे. यासाठी आम्ही डीपीसी (DPC) आणि राज्य निधीतून नियोजन करत आहोत. तसे पालकमंत्र्यांचे निर्देश आहेत. पुढच्या २ ते ३ वर्षांत ही कामे पूर्ण होतील. भविष्यात असा प्रॉब्लेम होणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले.
पावसाळ्यात सतर्क राहावे
त्यासोबत नागरिक, पालक, विद्यार्थी यांनी पावसाळ्यात कोणत्याही धोकादायक स्थितीत जीव धोक्यात घालून प्रवास करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील धबधबे, नद्या, नाले प्रवाहित झाले असताना अशा ठिकाणी नागरिक आणि पर्यटकांनी जाऊ नये, असे मनाई आदेश काढले आहेत. धोकादायक पूल आणि धबधबे या ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे, प्रशासनाचे नियम पाळावेत, अन्यथा त्यांच्यावर कारवाईही करण्यात येणार आहे,” असे डॉ. इंदुराणी जाखड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात सतर्क राहावे, धोकादायक ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले.
