मराठा समाजाच्या नेत्याला चारचाकीची धडक, अण्णा लिहिलेल्या कारमध्ये सापडलं असं काही… गूढ वाढले
महाराष्ट्रात गेल्या काही तासांत अपघातांची मालिका घडली आहे. बीडमध्ये मराठा सेवक अतुल घरत यांचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाला, तर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर टँकरच्या धडकेत दोन बळी गेले. नवी मुंबईतही दोन तरुण अपघातात दगावले.

गेल्या काही तासांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अपघातांच्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. बीडमध्ये मराठा सेवक अतुल घरत यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील टँकर अपघात झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच नवी मुंबईत अपघातामुळे दोन तरुणांचा अंत झाला. यासोबतच छत्रपती संभाजीनगर येथे अपघातामुळे चिमुकल्याचा बळी गेल्याने राज्यावर शोककळा पसरली आहे.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील दासखेड फाटा येथे रात्रीच्या वेळी झालेल्या अपघातात बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील मराठा सेवक अतुल घरत यांना आपला जीव गमवावा लागला. एका चारचाकी स्विफ्ट गाडीने अतुल घरत यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर चारचाकी चालक फरार झाला. मात्र, अपघातग्रस्त चारचाकीवर अण्णा असा मजकूर लिहिल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच या गाडीत पोलिसांची वर्दी आढळून आल्याने हा केवळ अपघात नसून घातपात असण्याचा संशय सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. या फरार चालकाला त्वरित अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पहाटेच्या सुमारास एका विचित्र आणि भीषण अपघाताची नोंद झाली आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरमुळे ही दुर्घटना घडली. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव टँकरचे चालकाकडून नियंत्रण सुटले. हा टँकर मुंबई लेनवरून थेट विरुद्ध दिशेच्या मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर घुसला. त्याने समोरून येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात २ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून ४ जण जखमी आहेत. सध्या जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नवी मुंबईत दोन तरुणांना गमावला जीव
नवी मुंबईत जेएनपीटी-पनवेल रस्त्यावर शनिवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. या नेरूळ येथील दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. नेरूळ येथील सहा मित्र पार्टीसाठी जात असताना, मध्यरात्री १२.१५ वाजता भांगरपाडा येथील पुलावर त्यांच्या भरधाव कारने एका कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की कारचा चक्काचूर झाला. या अपघातानंतर जखमी झालेल्या सहाही तरुणांना पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या उपचारादरम्यान हितेंद्र पाटील (२२) आणि श्रीनाथ चंद्रशेखर (२२) या दोन तरुणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत श्रीनाथच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यावर, पनवेल पोलिसांनी जखमी आणि कारचालक असलेल्या हर्ष पाटील २१ वर्षे या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील सेवन हिल उड्डाणपुलावर चारचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या विचित्र साखळी अपघातात एका निष्पाप चिमुकल्याचा बळी गेला. उड्डाणपुलावरून जात असताना चारचाकी चालकाचे नियंत्रण सुटले. ती समोरच्या वाहनांना धडकली. यात तीन वाहने (२ चारचाकी आणि १ ॲपे रिक्षा) एकमेकांना धडकून अपघात झाला. या अपघातात ५ वर्षाच्या एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
अंधेरीत रेंज रोव्हर कारचा अपघात
मुंबईतील अंधेरी लोखंडवाला बॅक रोड परिसरात एका भरधाव वेगातील आलिशान रेंज रोव्हर कारचा अपघात झाला आहे. ही रेंज रोव्हर कार सुमारे १२० किमी प्रति तास वेगाने धावत होती. या प्रचंड वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरला धडकली. ही कार धडकल्याने रस्त्यावरील चौक पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे, तर कारचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर कारमधील दोन्ही एअरबॅग्ज उघडल्याने चालक सुरक्षित बचावला. मात्र, चालक तात्काळ घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.
