नोकरी मिळणार या आशेने लग्न केलं… सत्य समोर येताच… कबडीपट्टू महिलेने उचललं टोकाचं पाऊल; नागपूर हादरले
Nagpur : नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील माळेगाव टाऊन येथील किरण दाढे या महिला कबड्डीपटूने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येमागील धक्कादायक कारण आता समोर आले आहे.

उपराजधानी नागपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. नोकरीच्या आमिषाने लग्न करून फसवणूक केल्यामुळे एका महिला कबड्डीपटूने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील माळेगाव टाऊन येथील किरण दाढे या महिला कबड्डीपटूने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. आर्थिक अडचणी, शिक्षण खर्च आणि नोकरीसाठी पतीकडून येणाऱ्या दबावाला कंटाळून या महिलेने कीटक नाशक औषध प्राशन करत आपले जीवन संपवलं आहे. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.
नोकरीचे आमिष दाखवत लग्न केले
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, महिला कबड्डीपटू किरण दाढेने स्वप्नील जयदेव लांबघरेसोबत 2020 मध्ये लग्न केले होते. लग्नापूर्वी किरण आणि तिच्या भावाला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी नोकरीचा फायदा होईल या आशेने किरण यांनी लग्नाला सहमती दिली होती. मात्र काही काळानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे किरणच्या लक्षात आले.
मानसिक छळ
लग्नानंतर स्वप्नील नोकरी देण्यास उशीर करत राहिला. त्याने तिचा मानसिक आणि लैंगिक छळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे किरण तिच्या पालकांच्या घरी रहायला आली. त्यानंतर तिला धमक्या देण्यात आल्या तसेच शिवीगाळ देखील करण्यात आली. त्यानंतर स्वप्नीलने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र फसवणूक झाल्याने किरण नैराश्यात गेली होती. त्यामुळे तिने विष प्राशन करून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
पती विरोधात गुन्हा दाखल
आत्महत्या करण्यासाठी किरणने कीटक नाशक पिले. कुंटुंबाच्या ही बाब लक्षात आली असता त्यांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले, मात्र तिचा मृत्यू झाला. किरणच्या आत्महत्येने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. किरणच्या माहेरच्यांनी स्वप्नीलवर नोकरी मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन लग्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पतीकडून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे किरण तणावात होती असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच नोकरी, संसार व तणावाच्या दबावामुळे तिने जीवन संपवल्याचे बोलले जात आहे. आता याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
