आयुष्य फक्त तीन दिवसाचं ठरलं… चौथीही मुलगी झाल्याने सैतान बापाने डोक्यात पाटच घातला; क्रूर घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरला
Jalgaon Crime : जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोराड गावात जन्मदात्या पित्याने 3 दिवसाच्या मुलीची डोक्यात लाकडी पाट मारून हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यातील अनेक भागात गुन्हेगारीच्या घटना वाढलेल्या आहेत. अशातच आता जळगावातील एका घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोराड गावात जन्मदात्या पित्याने 3 दिवसाच्या मुलीची डोक्यात लाकडी पाट मारून हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. कृष्णा लालचंद राठोड असे 26 वर्षीय अटकेतील आरोपी पित्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
चौथीही मुलगी झाल्याने पित्याने केली हत्या
कृष्णा लालचंद राठोड या या 26 वर्षीय आरोपी पित्याला मुलगा हवा होता, मात्र तीन मुलींनंतर चौथी देखील मुलगी झाल्याने तो संतापला. त्याने 3 दिवसाच्या मुलीची निघृण हत्या केली. आरोपी पित्याने 3 दिवसाच्या मुलीच्या डोक्यात लाकडी पाट घातला आणि तिचा जीव घेतला. घटनेबाबत सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात हत्या झाल्याचं समोर आला आहे. घटनेमध्ये कुटुंबातील कोणीही फिर्यादी व्हायला तयार नसल्याने स्वतः पोलिसांनी फिर्यादी होऊन हा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कृष्णा लालचंद राठोड याच्या पत्नीने एका चिमुकलीला जन्म दिला होता. मात्र आधीच 3 मुली असलेला कृष्णा ही चौथी मुलगी झाल्याने नाराज झाला. त्याने तिची हत्या केली. सुरुवातीला कुटुंबीयांनी आंघोळ करताना मुलगी खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला अशी माहिती दिली होती, मात्र शवविच्छेदन अहवालात मुलीचा मृत्यू हा ठणक वस्तू डोक्यात मारल्यामुळे झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांची सखोल तपास सुरू केला.
आरोपीने दिली कबुली
पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपी कृष्णा लालचंद राठोड या पित्याने चौथी मुलगी झाल्यामुळे तिची हत्या केली असल्याची कबुली दिली. त्यानंतर आता त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सर्वसामान्य लोकांनी आरोपील कठोर शिक्षा व्हावी अशा मागणी केली आहे.
