Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे यांची आंदोलनाबाबत मोठी घोषणा, कार्यक्रमात बदल, मुंबईला एकटेच…; कारण काय?
मनोज जरांगे पाटलांनी मुंबई मोर्चाच्या योजनेत बदल केला आहे. ते समर्थकांशिवाय एकटेच मुंबईला जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या कथित डावाला प्रत्युत्तर म्हणून ही नवी रणनीती आखल्याचे त्यांनी सांगितले. सणांच्या नावाखाली परवानगी नाकारल्याने, आता एकट्याने जाऊन आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी मिळते का, हे पाहणार असल्याचे जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील हे उद्या समर्थकांसह मुंबईला धडकणार होते. पण जरांगे यांनी आपल्या कार्यक्रमात बदल केला आहे. मुंबईला आपण एकटेच जाणार असून कुणीही माझ्यासोबत येऊ नका, असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विरोधात सणासुदीच्या आडून डाव टाकला आहे. त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी आपल्यालाही डाव टाकावा लागणार आहे. आता मी एकटा येत असल्याने आता तरी मला आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी मिळणार का? असा सवालच मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारला केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेऊन बदललेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. उद्याच्या आंदोलनाबाबत महत्त्वाची माहिती देतोय. त्यावर लक्ष ठेवा. विनाकारण कुणीही नाराज होऊ नका. कुणाला काही वाटू देऊ नका. आपल्याच हिताचे हे निर्णय आहेत. आरक्षणासाठी महत्त्वाचे आहेत. उद्या 15 सप्टेंबरला आपण सकाळी 11 वाजता मुंबईला निघणार आहोत. मुंबईला तर जायचं आहे, त्यात बदल नाही. वेळ प्रसंगी जीव द्यायची वेळ आली तरी चालेल, पण मुंबईला जाण्याचा दिलेला शब्द मागे घेणार नाही. मराठ्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागू देणार नाही. शब्द मागे घेणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
उद्या एकटाच जाईन, नंतर तुम्ही या
उद्या 15 सप्टेंबर रोजी ठरलेल्या मार्गाने उद्या अंतरवलीतून निघायचं आहे. पण उद्या मुंबईला जाताना मी एकटा एक गाडी घेऊन जाईल. जास्तीत जास्त दोन गाड्या माझ्यासोबत असतील. एक गाडी बंद पडली तर दुसऱ्या गाडीत बसता येईल. त्याशिवाय सोबत दोन रुग्णवाहिका असतील. एक बिघडली तर दुसरीत बसायला होईल. जास्तीत जास्त चार गाड्या माझ्यासोबत असतील. माझ्यासोबत पाच किंवा दहा माणसांपेक्षा अधिक लोक नसतील. इतरांनी मुंबईला यायचं नाही. फक्त मी एकटाच जाणार आहे. तुम्ही मुंबईला कधी यायचं हे मी तुम्हाला नंतर सांगेन, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.
फडणवीसांच्या तोडीस तोड
आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्या तोडीस तोड डाव टाकायचा आहे. त्यांनी सणावाराच्या आड येऊन डाव टाकला आहे. त्यांची माणसं रॅलीत घुसवून मारामाऱ्या करण्याचा डाव आहे. म्हणजे दंगलीचा डाग मराठ्यांवर येईल. त्यामुळेच आपल्यालाही नवा डाव टाकावा लागत आहे. त्याचाच भाग म्हणून मी एकटा मुंबईला जाईन. तुम्ही यायचं नाही. त्यांनी सणांच्या आडून आपल्याला परवानगी नाकारली ना? मग मला एकट्याला परवानगी देतात की नाही ते पाहायचं आहे, असं जरांगे म्हणाले. मी एकटाच मुंबईत खिंड लढवणार आहे. एकदा मार्ग सोपा झाला की मग तुम्हाला कधी मुंबईत यायचं याची माहिती दिली जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
