एक तर मुंबईतून विजयी यात्रा निघेल, नाही तर माझी प्रेतयात्रा… मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
आझाद मैदानातून बाहेर पडत असताना सुप्रिया सुळे यांना घेरण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांकडून करण्यात आला. यावर आता जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर जात जरांगे पाटलांच्या तब्ब्येतीची विचारपूस केली. मात्र जरांगे पाटील झोपले असल्याचे या दोघांमध्ये कोणतीही खास चर्चा झाली नाही. मात्र आझाद मैदानातून बाहेर पडत असताना सुप्रिया सुळे यांना घेरण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांकडून करण्यात आला. यावर आता जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच जरांगे पाटलांनी सरकारला निर्वाणीचा इशाराही दिला आहे.
सुप्रिया सुळेंना घेरलं
मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे आझाद मैदानातून बाहेर पडत होत्या. यावेळी त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. यावेळी काही आंदोलकांनी खासदार शरद पवार यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. एका आंदोलकाने तर शरद पवार यांनी मराठ्यांचे वाटोळे केले आहे, असा आरोप केला. काही आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या कारचा पाठलाग केला. तसेच सुळे यांच्या कारवर काही लोकांनी बॉटलही फेकल्या होत्या.
काय म्हणाले जरांगे पाटील?
या घटनेवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ‘कोणताही नेता आला तर त्यांना त्रास देऊ नका, तो आपला दुश्मन जरी असला तरी त्याला सन्मान द्यायला शिका. अन्यथा आपल्याकडे नेते यायला भेतील. नेते आल्यावर तुम्ही गोधळ घालत असाल तर तुमच्याकडे कोणीही येणार नाही. जोपर्यंत सहन होत आहे तोपर्यंत नेत्यांचा सन्मान करा. ज्यावेळेस असं वाटेल की, आरक्षण भेटत नाही, त्यावेळेस पाहू काय करायचं आहे ते.’
कोणत्याही पक्षाचा नेता आला तर त्याला माघारी बोलू नका, त्याला सन्मानाने येऊद्या आणि सन्मानाने जाऊ द्या. गोंधळ घालणारे कोण आहेत ते पहावं लागेल. ते सरकारने पाठवलेले आहेत का? माझे लोक असं करत नाहीत, ते सरकारचेच असू शकतात. त्यांना दंगल घडवायची आहे. त्यामुळे पोरांनी सावध रहायला हवं असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना जरांगे पाटलांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. एकतर मुंबईतून विजयी यात्रा निघेल, नाही तर माझी प्रेतयात्रा असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आणखी एका दिवसाची मुदतवाढ
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज सायंकाळी या आंदोलनाची मुदत संपली होती, मात्र मुंबई पोलिसांनी आणखी एका दिवसासाठी या आंदोलनाला परवानगी दिली आहे. आता उद्याही मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु राहणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे पथक, क्यूआरटी, आरएएफ तसेच विशेष दल सोमवारीही मुंबईत तैनात राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
