Kunbi Caste Certificate : बलिदानाचं चीज झालं… अखेर तो कागुद हाती येताच घळाघळा आसवं ओघळली… कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू; तुम्हाला मिळालं का?
मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर, महाराष्ट्र सरकारने कुणबी प्रमाणपत्रे वितरित करण्यास सुरुवात केली आहे. बीड आणि धाराशिवमध्ये शेकडो मराठा बांधवांना ही प्रमाणपत्रे मिळाली आहेत.

Kunbi Caste Certificate : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मुंबईत आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्या होत्या . आरक्षणासाठी अनेकांनी प्राणांचंही बलिदान दिलं, अखेर आज यासंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने कुणबी प्रमाणापत्राचे वाटप सुरू करण्यात आले आहे. बीडमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते आज पाच मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. त्यामुळे आंदोलनाला यश मिळल्याची भावना व्यक्त होत असून अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर 2 सप्टेंबर 2025 च्या काढलेल्या जीआर नंतर राज्यात अनेक जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले असून आज बीडमध्ये पाच जणांना कुणबी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आलं.
हैदराबाद गॅजेटच्या आधारे प्रमाणपत्र दिल्याची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र धारकांना दिली आहे. सर्व प्रमाणपत्रांवर कुणबी असा उल्लेख करण्यात आला आहे. राज्यात ठिकठिकाणी कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाले आहे. कुठे -कुठे प्रमाणपत्र देण्यात आले, ते सविस्तर जाणून घेऊया.
धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्राचे वाटप
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. मराठवाड्यात पहिल्यांदाच धाराशिव मध्ये कुणबी प्रमाणपत्राचे वाटप झाले असून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते चार कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली. मुंडे अभिषेक व्यंकटेश, धाराशिव, प्रगती व्यंकटेश मुंडे, पूजा व्यंकटेश मुंडे, गणेश व्यंकटेश मुंडे सर्व राहणार धाराशिव यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
तर हिंगोलीमध्येदेखील 50 कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. पालकमंत्री नरहरि झिरवळ यांच्या हस्ते 50 मराठा बांधवाना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाले. हैदराबाद गॅजीटर मध्ये नोंदी असलेल्या 50 मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले.
मराठ्यांना मुक्ती मिळाली पाहिजे – जरांगे पाटील
दरम्यान मराठा आरक्षणाची मागणी लावून धरत सातत्याने आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनीही यावर भाष्य केले आहे. मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. मराठवाड्याला मुक्ती मिळाली, पण मराठ्यांना मुक्ती मिळाली पाहिजे असे ते म्हणाले.
आज जे कुणबी प्रमाणपत्र वाटप होणार आहे त्यांनी अंतरवाली सराटीला यायचं आहे. मला ते पाहू द्या नेमके सरकारने कोणते प्रमुख दिले होते, प्रमाणपत्र पाहून कळणार हे प्रमाणपत्र कोणते आहे. जीआरच्या आधारे प्रमाणपत्र दिली की नाही ते कळणार असे ते म्हणाले. 84 च्या जीआरचा आधार कसा घेतला आणि जर मराठ्यांचे आरक्षण काढणार असाल तर तुमचे आरक्षण कसे दिले, असा प्रश्नही मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
तसेच पावसामुळे मोठे नुकसान झालं असून जनावरे वाहून गेली आहेत. याबाबत सरकारने सरसकट मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. जर आरक्षणात काही मागे पुढे केलं, तर दसऱ्यानंतर वेगळ्या स्टाईलने आंदोलन होणार असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.
