मोबाईल बंद, पत्ता लागेना, सुट्टी घेऊन लग्नासाठी कारने निघालेलं दांपत्य रहस्यमयरित्या गायब.. त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
तेलंगणा येथून जळगावला लग्नासाठी निघालेले एक दांपत्य बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-मलकापूर दरम्यान रहस्यमयरित्या बेपत्ता झाले आहे. नातेवाईकांनी नांदुरा पोलिसांत तक्रार दाखल केली असून, दांपत्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन वडनेर गावाजवळ आढळले. पोलिसांना घातपाताचा संशय असून, सध्या त्यांचा कसून शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

घरच्या लग्नासाठी चांगली 8 दिवसांची सुट्टी घेऊन तेलंगणहून जळगावच्या दिशेने निघालेलं एक दांपत्य अचानक रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूर दरम्यान असलेल्या वडनेर भोलजी परिसरात हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. त्या दांपत्याच्या नातेवाईकांनी नांदुरा पोलिसांत धाव याप्रकरणी तक्रार नोंदवल्यावर हा सर्व प्रकार उघड झालाय. पोलिस त्या दांपत्याचा कसून शोध घेत आहेत. हाँ घातपाताचा प्रकार असू शकतो असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र त्यामुळो मोठी खळबळ माजली असून नातेवाईक भीतीच्या सावटाखाली आहेत.
नेमक घडलं तरी काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी रमेश पाटील यांनी नांदुरा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली. त्यानुसार, त्यांचे चुलत भाऊ पद्मसिंह दामू पाटील हे तेलंगणमध्ये त्यांची पत्नी नम्रता व मुलीसह राहतात. हे तेलंगणा राज्यातील सीतापुरम येथील एका खाजगी सिमेंट कंपनीमध्ये काम करतात. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 च्या सुमारास पद्मसिंह हे त्यांची पत्नी नम्रता हिच्यासह लग्नासाठी जळगावला यायला निघाले, ते त्यांच्या कारने येत होते. सकाळी निघ्यावर त्यांचं भावाशी बोलणं झालं, रात्री 10 पर्यंत ते घरी पोहोचणं अपेक्षित होते.
मात्र 10 वाजून गेले तरी ते घरी आले नाहीत, आणखी थोडा वेळ वाट पाहून अखेर रमेश यांनी त्यांचा भाऊ पद्मसिंह यांच्या फोनवर कॉल लावला, तो मोबाईल बंद येत होता. त्यानंतर त्यांनी त्यांची वहिनी, पद्मसिंह यांची पत्नी नम्रता यांनाही कॉल केला, तही मोबाईल बंदच येत होता. 28 तारखेपर्यंत नातेवाईकांनी त्यांचा फोन ट्राय केला, शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्या दांपत्याच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूर दरम्यान महामार्गावर असलेल्या वडनेर गावाजवळ आढळून आलं. तिथूनच ते दोघेही रहस्यमयरित्या गायब झाले. आता पोलिसांचे पथक या दांपत्याचा शोध घेत असून ते दोघं अचानक गायब झाल्याने घातपात झालेला असू शकतो असा संशयही व्यक्त केला जात आहे.
