बार्शीच्या आमदाराने जरांगेंना हात जोडले, जरांगेना म्हणाले, तुम्ही टोमणे…
राज्यातील सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी म्हटले आहे.आजपासून राऊत यांनी सोलापूरातील बार्शीत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटील यांच्यावर उदयन राजेंसंदर्भात आरोप केल्यानंतर जरांगे पाटील यांनी मराठ्या फूट पाडणाऱ्यांना निवडणूकात जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा कालच दिला आहे. जरांगे पाटील 16 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून आंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार आहेत. तर राजेंद्र राऊत यांनीही बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे राजेंद्र राऊत यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचीच मागणी केली आहे. त्यामुळे एकाच मागणीसाठी दोन आंदोलने होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आता राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटील यांना हात जोडून आवाहन केले आहे.
मराठा आरक्षण आंदोलक जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांचे उपोषण मराठवाडा मुक्ती संग्रामच्या दिनाचे औचित्य साधून सुरु होत आहे.त्यामुळे 16 सप्टेंबरच्या रात्री पासून जरांगे यांच्या उपोषणाला सुरुवात होत आहे. या उपोषणाची मागणी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी आहे. तसेच हैदराबाद गॅझेटसह सर्व तीन गॅझेटला आधारभूत मानून मराठ्यांना कुणबी म्हणून सरसकट आरक्षण देण्यात यावे अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या वर आरोप करणारे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील ठिय्या आंदोलनाची हाक दिली आहे. यावेळी राजेंद्र राऊत यांनी जरांगे यांना हात जोडून विनंती केली आहे.
राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांना हात जोडून आवाहन केले आहेत. ते म्हणाले तुम्ही असले टोमण मारायचं बंद करा. गेल्या वर्षभरापासून समाजाच्या बाबतीत सुरू असलेले राजकारण थांबवा आणि नौटंकी करू नका असेही नाव न घेता राऊत यांनी म्हटले आहे. सगळ्या आमदारांकडून पत्र घ्या आणि विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करा बाकी काहीही बोलू नका असेही राऊत यांनी म्हटले आहे. राजेंद्र राऊत म्हणाले की येत्या 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे वीस दिवस आपल्या हातात आहेत सरकारला विशेष अधिवेशन बोलवण्यास भाग पाडावे असेही राऊत यांनी म्हटले आहे.
विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवा
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतआजपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे, ओबीसीतून मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी हे ठिय्या आंदोलन सुरू असल्याची भूमिका आमदार राऊत यांनी मांडली आहे. गरजवंत मराठ्यांचा लढा 40 वर्षापासून सुरू आहे मात्र त्याला राजकीय फाटे फुटतात आणि तो प्रश्न प्रलंबित पडतो. निवडणुका जवळ आल्या की मराठा आरक्षणाच्या विषयाला हवा दिली जाते. त्यामुळे विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे असेही त्यांनी म्हटले आहे. आरक्षणावरून अंधारात एक आणि उजेडात एक अशी भूमिका कोणीही घेऊ नये. सर्व राजकीय पक्षांना आपण मेलद्वारे पत्र पाठवले असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
कोणाची नौटंकी ऐकून घ्यायची की
विशेष अधिवेशन बोलवण्याबाबत आपली भूमिका काय? असा सवाल राजेंद्र राऊत यांनी जरांगे यांना केला आहे. काही लोक महाराष्ट्रात दंगली घडवण्याचं पाप करत आहेत त्यामुळे या विषयात स्पष्टता यावी. भाजपला माझं पाहिलं आवाहन आहे तुमची ओबीसीतून आरक्षणाबाबतची भूमिका काय ते स्पष्ट करा असेही राऊत यांनी म्हटले आहे. तुम्ही म्हणालात आमदाराने भूमिका स्पष्ट करावी, मी माझी भूमिका स्पष्ट केली. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी आपली मागणी आहे असे राऊत यांनी म्हटले आहे. मराठा बांधवांनो आपण राजकारणात फसायचं की कोणाची नौटंकी ऐकून घ्यायची ही वेळ आली आहे. 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे वीस दिवस आपल्या हातात आहेत. सरकार आणि विरोधी पक्षाकडून या विषयाला वेगळी बगल देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. सर्वांना विनंती सर्व आमदारांच्या घराबाहेर जाऊन बसा आणि आरक्षणाबाबत त्यांनी भूमिका विचारा असे राजेंद्र राऊत यांनी म्हटले आहे.
दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या
फक्त अधिवेशन घ्यायला लावा सगळे उघडे पडतात. सर्व आमदारांनी आता विधानसभेत भूमिका मांडावी, दूध का दूध पाणी का पाणी होईल असे राजेंद्र राऊत यांनी म्हटले आहे. मराठा बांधवांनो कोणाला फसवायचं नाही, कोणावर विश्वास ठेवू नका विशेष अधिवेशन बोलवावे आणि आमदारांनी भूमिका स्पष्ट करा असे राऊत यांनी म्हटले आहे. आचारसंहितेआधी विशेष अधिवेशन बोलवले नाही तर ओळखून घ्यायचं आणि मराठा समाजाने धडे शिकवत जायचं, कोण कोण नाटकं करताय ते दोन-चार दिवसात कळेल. त्या सगळ्यांना धडा शिकवायचं असे राजेंद्र राऊत यांनी म्हटले आहे. भाजपची ओबीसीतून मराठा आरक्षणाबाबतची भूमिका काय असा माझा सवाल आहे. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट, अजितदादा, शरद पवार गट, काँग्रेस तसेच उद्धव ठाकरे यांनी याबाबतची भूमिका जाहीर करावी असेही राजेंद्र राऊत यांनी म्हटले आहे.