आवाज खाली करा, हातवारे केले तर…; रोहित पवारांना पोलीस ठाण्यात राग अनावर, VIDEO व्हायरल
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित पवार यांना पोलीस स्टेशनमध्ये राग अनावर झाल्याचे दिसत आहे.

गुरुवारी विधानभवन परिसरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाने गंभीर स्वरूप धारण केले. या वादात पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात पडळकरांचे कार्यकर्ते आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण करताना दिसत आहेत. या घटनेनंतर रात्री उशिरा पोलिसांनी आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना अटक केली, ज्यामुळे हा वाद आणखी चिघळला.
नेमकं काय झालं?
या अटकेनंतर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे दोन्ही आमदार मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे रोहित पवार आणि एका पोलीस अधिकाऱ्यामध्ये बाचाबाची झाली. एका पोलीस अधिकारी हातवारे करत रोहित पवार यांच्याशी बोलत होता. ते पाहून पवार संतापले. त्यांनी मोठ्या आवाजात त्या अधिकाऱ्याला सुनावले, “हातवारे करू नका… आवाज खाली ठेवा… शहाणपण करू नका… बोलता येत नसेल तर बोलू नका, कळलं का?” या वेळी रोहित पवारांचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आणि त्यांनी “साहेबांना हात लावायचा नाही,” असा इशारा पोलिसांना दिला. या घटनेदरम्यान जितेंद्र आव्हाडही तिथे उपस्थित होते.
वाचा: चक्क नाग गळ्यात अडकून बाइकवरुन चालला होता, वाटेतच होत्याचं नव्हतं झालं
आव्हाड आणि काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर पोलीस ठाण्यातील तणाव काहीसा निवळला. मात्र, या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये रोहित पवार एका पोलीस अधिकाऱ्यावर संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
रात्रीच्या घटनेचा तपशील
गुरुवारी दुपारी विधानभवन परिसरात पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण केली. या घटनेचे पडसाद रात्रभर उमटले. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना विधानभवन परिसरात अटक केली. ही बाब जितेंद्र आव्हाड यांना समजताच ते तातडीने विधानभवनात पोहोचले आणि कार्यकर्त्यांसह पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन केले. यात रोहित पवारही सहभागी झाले. आव्हाड ठिय्या आंदोलनावर ठाम असताना रात्री दीड वाजता पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली. पोलिस आव्हाडांना बाजूला खेचत नितीन देशमुख यांना घेऊन पोलिस ठाण्याकडे रवाना झाले.
