काय सांगता! आमदार साहेबांनी लेकीला टाकलं सरकारी शाळेत, कारण वाचून बसेल धक्का…
आमदार संजय पुराम यांनी आपल्या मुलीला आदिवासी आश्रम शाळेत प्रवेश दिल्याने महाराष्ट्रात चर्चा निर्माण झाली आहे. त्यांच्या या निर्णयाने खासगी शाळांच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकारी शाळांच्या दर्जा सुधारण्यासाठी हा निर्णय प्रेरणादायी आहे. यामुळे सरकारी शाळांमध्ये अधिक निधी व लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे.

आजकाल महाराष्ट्रात सगळीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा बोलबाला आहे. अनेक मोठे अधिकारी, कर्मचारी आणि अगदी आपले लोकप्रतिनिधीही आपल्या मुलांना चांगल्या इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून लाखो रुपये खर्च करतात. पण, आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पुराम यांनी मात्र एक खूपच वेगळे आणि कौतुकास्पद उदाहरण घालून दिले आहे. त्यांनी आपल्या मुलीला आदिवासी विभागाच्या सरकारी आश्रम शाळेतच प्रवेश दिला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशासाठीही एक प्रेरणा
आमदार संजय पुराम यांनी त्यांची मुलगी समृद्धी हिला पुराडा गावात असलेल्या सरकारी आश्रम शाळेत आठवीत दाखल केले आहे. जिथे साधे छोटे पदाधिकारी देखील आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये चांगल्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करतात, तिथे एका आमदाराने असा निर्णय घेणे हे संपूर्ण महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशासाठीही एक प्रेरणा आहे.
आमदार संजय पुराम यांनी स्वतःही आश्रम शाळेतूनच शिक्षण घेतले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आपला मोठा मुलगा बिरसा संजय पुराम यालाही पहिल्या वर्गापासून बारावीपर्यंत पुराडा येथील आदिवासी आश्रम शाळेतच शिकवले. आता त्यांची लहान मुलगी समृद्धीलाही त्यांनी याच शाळेत प्रवेश देऊन, सरकारी शाळांवर विश्वास दाखवला आहे.
समाजात एक मोठे उदाहरण
या निर्णयामुळे सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. पुराडा आश्रम शाळेचे मुख्याध्यापक कापसे यांनी सांगितले की, “आमदाराची मुलगी आमच्या शाळेत शिकत असल्यामुळे शाळेकडे आमदारांचे अधिक लक्ष राहील. याचा निश्चितच शाळेला फायदा होईल.” तर, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी उमेश कासिद यांनी याला मोठ्या गौरवाची गोष्ट म्हटले आहे. त्यांच्या मते, आमदारांनी आश्रम शाळेवर विश्वास दाखवल्याने समाजात एक मोठे उदाहरण निर्माण झाले आहे.
संजय पुराम यांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक
जर याचप्रमाणे महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या मुलांना सरकारी शाळांमध्ये दाखल केले, तर या शाळांचा चेहरामोहरा बदलून जाईल. सरकारी शाळांमध्येही दर्जेदार आणि उत्तम शिक्षण मिळू शकेल. तसेच कोणालाही आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देऊन लाखो रुपये खर्च करण्याची गरज भासणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यासोबतच आमदार संजय पुराम यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यामुळे सरकारी शाळांबद्दलचा लोकांचा दृष्टिकोन बदलण्यास नक्कीच मदत होईल.
