Mumbai Megablock : मेगा ‘ब्लॉक डे..’ मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, कोणत्या मार्गांवर रखडणार वाहतूक ?
मध्य रेल्वेवर रविवारी रुळांच्या दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक जाहीर झाला आहे. माटुंगा-मुलुंड जलद मार्गावर आणि ठाणे-वाशी/नेरुळ ट्रान्स हार्बर लाईनवर सेवा विस्कळीत होईल. अनेक लोकल रद्द होतील किंवा उशिराने धावतील. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना या बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

मुंबईकरांची लाईफलाइन असलेली रेल्वे अविरत धावत असते. लाखो प्रवाशांन घेऊन रात्रंदिवस धावणाऱ्या या लोकललाही थोडी विश्रांतीची , डागडुजीची गरज असते. हेच लक्षात घेऊन लोकलसाठी वेळोवेळी ब्लॉक घेऊन, दुरुस्तीची कामे करण्यात येतात. याच पार्श्वभूमीवर मुंबईत ऊद्या सेंट्रल रेल्वेकडून उपनगरीय मार्गांवर ‘मेगा ब्लॉक’ जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल. माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येत आहे.
कसे असेल वेळापत्रक ?
माटुंगा ते मुलुंड (अप आणि डाऊन फास्ट लाईन): सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 पर्यंत मेगाब्लॉक असेल . छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी10.36 ते दुपारी 3.10 दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या कालावधीत सुटणाऱ्या डाऊन फास्ट गाड्या माटुंगा स्थानकापासून डाऊन स्लो लाईनवर वळवण्यात येतील आणि मुलुंडपर्यंत सर्व स्थानकांवर थांबतील. या गाड्या आपल्या गंतव्यस्थानी साधारण 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. तर ठाण्यानंतर या गाड्या पुन्हा फास्ट लाईनवर धावतील. तसेच ठाण्याहून सुटणाऱ्या अप फास्ट गाड्याही मुलुंडपासून माटुंगापर्यंत स्लो लाईनवर धावतील आणि त्या देखील 15 ते 20 मिनिटे उशिराने पोहोचतील.
ठाणे – वाशी / नेरुळ (ट्रान्स हार्बर लाईन): सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक असेल. या काळात ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यानची सर्व अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर सेवा पूर्णपणे बंद राहील.
ठाण्याहून सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या आणि पनवेलकडून ठाण्याकडे येणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे घराबाहेर पडताना प्रवाशांनी रेल्वेच्या या बदलांचा विचार करून बाहेर पडण्याचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
