गुरुदेवजींच्या आशीर्वादानंतर चमत्कार, घशाची समस्या संपली, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे विधान!
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना गुरुदेवजींच्या चमत्कारामुळेच माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली, असे विधान केले आहे. या कार्यक्रमाला मंगल प्रभात लोढादेखील उपस्थित होते.

Ritu Tawade : सध्या राज्यात भोंदूबाबा अशोक खरात हे प्रकरण खूपच चर्चेत आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. तो तंत्र-मंत्र तसेच जादू करण्याचे आश्वासन देऊन महिलांना जाळ्यात ओढायचा. आतापर्यंत त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. त्याच्या या कुकृत्याचे अनेक फोटोदेखील समोर आले आहेत. खरातचे प्रकरण समोर आल्यानंतर अंधश्रद्धा, बुवाबाजीचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला. अंधश्रद्धेला बळी पडू नका, असे राजकीय नेत्यांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच सांगत आहेत. असे असतानाच आता मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी एक विधान केले आहे. गुरुदेवजींच्या आशीर्वादाने माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली. हा तर चमत्कार झाला, असे रितू तावडे म्हणाल्या आहेत. त्या मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होत्या. त्यांच्या या विधानानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
रितू तावडे नेमकं काय म्हणाल्या?
या कार्यक्रमात बोलत असताना, रितू तावडे यांनी नम्रमुनी महाराज यांच्या चमत्कारामुळे माझ्या घशाचा त्रास नाहीसा झाला, अशा आशयाचे विधान केले. “तुम्हाला मी माझा एक अनुभव सांगू इच्छिते. गेल्या दीड-दोन वर्षांपासून मी माझ्या घशाबाबतच्या समस्येने खूप त्रस्त होते. माझा आवाज तुम्हाला जसा ऐकायला येतोय, तो असा नव्हता. मी परम गुरुदेवजी यांच्याकडे माझी समस्या मांडली. मी औषधं घेत आहे. परंतु काहीही फरक परत नाहीये. त्यानंतर गुरुदेवजींनी माझ्यासाठी प्रार्थना केली. आता मी चकित आहे. दीड वर्षांपासून मी ज्या घशाच्या समस्येने त्रस्त होते, त्यांनी आशीर्वाद दिल्याने मी आज तुमच्यासमोर असं बोलू शकत आहे,” असं रितू तावडे म्हणाल्या.
मंगल प्रभात लोढा यांच्याकडूनही चमत्काराचा उल्लेख
मी पराग भाई यांना याबाबत सांगत होते. हा तर खूपच मोठा चमत्कार झाला, कारण मी या समस्येमुळे खूप त्रासले होते, असेही रितू तावडे सांगायला विसरल्या नाहीत. दरम्यान, रितू तावडे यांच्या या विधानानंतर भाजपाचे नेते तथा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीदेखील गुरुदेवजींच्या चमत्काराचा उल्लेख केला. गुरुदेवजी यांची भेट घेतल्याने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्या आशीर्वादाने रितू तावडे मुंबईच्या महापौर झाल्या आहाेत, असे लोढा म्हणाले. दरम्यान, आता विरोधक यावर नेमकी काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
