फेसबुकवर क्लिक केलं अन् चार दिवसात… मुंबईत नर्ससोबतची घटना पाहून तुमचेही डोळे उघडतील
मुंबईतील एका नर्सची २९९ रुपयांचा ड्रेस खरेदी करण्याच्या प्रयत्नात १ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. देवनार पोलिसांनी या सायबर गुन्ह्याचा तपास सुरू केला असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

ऑनलाईन शॉपिंग करताना दिसणाऱ्या आकर्षक ऑफर्स कधीकधी किती भयानक ठरू शकतात, याचे धक्कादायक उदाहरण मुंबईत समोर आले आहे. एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सला २९९ रुपयांचा ड्रेस खरेदी करणे चक्क १ लाख रुपयांना पडले आहे. अवघ्या ५ दिवसांत सायबर भामट्यांनी तिची फसवणूक करून कष्टाची कमाई लुटली. याप्रकरणी देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
तक्रारदार नर्स ही मुंबईतील एका नामवंत खासगी रुग्णालयात कार्यरत असून ती सध्या एका वसतिगृहात राहते. १६ एप्रिल रोजी तिने फेसबुकवर एक जाहिरात पाहिली, ज्यामध्ये अतिशय सुंदर ड्रेस अवघ्या २९९ रुपयांत विकला जात होता. स्वस्त किंमतीमुळे तिने त्या जाहिरातीवर क्लिक केले. त्यानंतर खरेदीची प्रक्रिया सुरू केली. हीच तिची पहिली चूक ठरली.
सायबर गुन्हेगारांनी तिला व्हॉट्सॲपवर संपर्क साधून ऑर्डर कन्फर्म करण्यास सांगितले. त्यानंतर फसवणुकीचा सिलसिला सुरू झाला. तिला सुरुवातीला ड्रेसचे २९९ रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर पेमेंट केल्यानंतर शिपिंग चार्जेस पेडींग आहेत, असे सांगत पुन्हा पैसे मागितले. त्यानंतर जीपीएस ट्रॅकिंग, व्हेरिफिकेशन कोड आणि पत्ता पडताळणी यांसारख्या असंख्य बाबींचे नाव सांगून हजारो रुपये भरण्यास भाग पाडले. याबद्दल दरवेळी नर्सने विचारणा केली असता, हे पैसे फक्त सुरक्षेसाठी असून ऑर्डर पोहोचताच यातील बहुतांश रक्कम तुम्हाला परत मिळेल, असे सांगून तिला विश्वासात घेतले गेले. अशा प्रकारे १६ ते २० एप्रिल या पाच दिवसांत नर्सने एकूण १ लाख रुपये सायबर भामट्यांच्या विविध बँक खात्यात ट्रान्सफर केले.
जेव्हा एक लाख रुपये देऊनही ड्रेस मिळाला नाही आणि समोरच्या व्यक्तीने अजून पैशांची मागणी सुरूच ठेवली, तेव्हा नर्सला शंका आली. यानंतर तिला फसवणूक झाल्याची खात्री पटली. तिने तात्काळ सायबर गुन्हे शाखेच्या १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवली. त्यानंतर देवनार पोलीस ठाण्यात अधिकृत एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला.
देवनार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट फेसबुक जाहिराती आणि फेक डिलिव्हरी एजंटचा वापर करून ही फसवणूक करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी कोणतीही अनोळखी लिंक किंवा फेसबुकवरील संशयास्पद स्वस्त जाहिरातींवर विश्वास ठेवू नका. ऑनलाईन पेमेंट करताना सावधगिरी बाळगा, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
