
Rohit Pawar -Ajit Pawar- VSR Company: अजितदादांची अकाली एक्झिट सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. पण हा विमान अपघात होता की घातपात यावरून सध्या काहूर उठले आहे. शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तर VSR या विमान कंपनीविरोधात मोठा मोर्चा उघडला आहे. त्यांनी दोन पत्रकार परिषद घेत या कंपनीच्या कारभाराची पोलखोल केली. तसेच 27 जानेवारी 2026 रोजीच्या घटनाक्रमावरून त्यांनी दादांच्या पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांवर हल्ला चढवला आहे. दादांना त्या दिवशी उशीर झाल्यानेच त्यांनी दुसर्या दिवशी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय घातक ठरल्याचे त्यांनी इंगित केले. तर ऐनवेळी वैमानिक आणि विमान बदलल्याच्या चर्चाही मोठ्या प्रमाणात होत आहे. रोहित पवार या विमान कंपनीविरोधात आक्रमक झाले असले तरी त्यांनी सु्द्धा एका दिग्गज क्रिकेटपटूसोबत VSR कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याचे आता समोर येत आहे.
व्हीएसआर कंपनीच्या विमानाने बारामती प्रवास
शरद पवार एनसीपी आमदार रोहित पवार यांनी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी व्हीएसआर कंपनीच्या विमानाने मुंबई ते बारामती असा प्रवास केला होता. व्हीएसआर कंपनी कारभार विषयी रोहित पवारांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणानंतर घातपात आणि विमान कंपनीबाबीत प्रश्न उपस्थित केल्यानंतर आत्ता नवी माहिती समोर आली आहे.
रोहित पवार याच्यासह गाठली बारामती
प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मासह आमदार रोहित पवार यांनी चार्टर विमानाने प्रवास केला. मुंबई ते बारामती दरम्यान व्हीएसआर कंपनीच्या चार्टर विमानातून हा प्रवास झाल्याचे नवे पुरावे समोर आले आहे. बारामतीला जाण्यासाठी याच कंपनीचं विमान रोहित पवार यांनी वापरले होते. कंपनीच्या कारभाराविषयी रोहित पवार आता नवनवीन शंका उपस्थित करत असताना नवी माहिती उघड झाली आहे.
व्हीएसआर व्हेंचर्सच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत प्रेझेंटन्शन दिले. त्यात त्यांनी व्हीएसआर व्हेंचर्स या कंपनीच्या कारभारावर असंख्य प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी काही चॅटिंग समोर आणली. त्यात कंपनीचे मालक आणि पायलट यांच्यातील संवाद समोर आणला. त्यात काही पायलट हे अट्टल मद्यपी असल्याचे समोर आले. तर कंपनी वैमानिकांना आराम करू देत नसल्याकडे ही त्यांनी लक्ष वेधले. विमान हे गुजरातमधून आले होते. वेळेवर पायलट बदलला असे अनेक संशयाचे काहूर सध्या उठलेले आहे. तर या कंपनीवर अद्याप बंदी का घातली जात नाही असा सवालही रोहित पवार यांनी विचारला होता. दरम्यान त्यांनी सु्द्धा याच कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.