अनुसूचित जातीच्या किती लोकांना भारतरत्न दिले?- ओवेसींचा भाजपवर घणाघात

मुंबई : “ज्यांना भारतरत्न पुरस्कार दिलेत, त्यामध्ये किती अनुसूचित जातीचे, आदिवासी आणि मुसलमान आहेत”, असा सवाल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकरला केला. कल्याण येथील एपीएमसी मार्केट परिसरात झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर या सभेला उपस्थित होते. “सरदार वल्लभभाई पटेल नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]

अनुसूचित जातीच्या किती लोकांना भारतरत्न दिले?- ओवेसींचा भाजपवर घणाघात
Nupur Chilkulwar

|

Jul 05, 2019 | 4:34 PM

मुंबई : “ज्यांना भारतरत्न पुरस्कार दिलेत, त्यामध्ये किती अनुसूचित जातीचे, आदिवासी आणि मुसलमान आहेत”, असा सवाल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकरला केला. कल्याण येथील एपीएमसी मार्केट परिसरात झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर या सभेला उपस्थित होते.

“सरदार वल्लभभाई पटेल नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणखी काही वर्षे जिवंत असते, तर रोहित वेमुलाचा मृत्यू झाला नसता. ज्या लोकांनी आपल्याला 70 वर्षे रडवलं, त्यांच्याविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची आता गरज आहे”, असे ओवेसी या सभेत म्हणाले. तसेच नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आम्हाला न्याय देतील या भ्रमात राहू नका, असेही ओवेसींनी सांगितले.

“एकीकडे 26 जानेवारीला मोहम्मद रफीची देशभक्तीपर गाणी ऐकायची आणि मुंबईत मात्र मोहम्मदला घर घेऊ द्यायचं नाही. 280 जागा मिळवूनही पंतप्रधान रोहित वेमुलाचा मृत्यू रोखू शकले नाहीत”, असा घणाघात त्यांनी सरकारवर केला.

“संसदेत दलित समाजाचे एक मंत्री आहेत, मी नाव नाही घेणार. मला खूप त्रास झाला की, तुम्ही त्यांची चमचेगिरी करत होते”, असे म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नाव न घेता ओवेसी यांनी त्यांच्यावर टीका केली. तर “शिवसेनेची काय समस्या आहे, एवढे का मोदीला घाबरता तुम्ही”, असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला.

या सभेला प्रकाश आंबेडकरही उपस्थित होते. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. “आरएसएस ही देशातील एक दहशतवादी संघटना आहे. आरएसएस प्रमुख हे शस्त्रांची पूजा करतात. पोलीस, लष्कर असताना शस्त्रांची गरज काय”, असा खडा सवाल प्रकाश आंबडेकर यांनी केला.

“आरएसएसने सांस्कृतिक राष्ट्रवाद काय असतो तो समजावून सांगावा. कारण यांचा राष्ट्रवाद म्हणजे मनुवाद आहे. मुंबई, ठाणे, कल्याण आसपासच्या 70 किलोमीटरचा परिसर हा सरकारसाठी सोन्याची कोंबडी आहे. इथला मुसलमान बदमाश असता तर संपूर्ण काश्मीर जळत असते. गेल्या 70 वर्षांत राजकीय पक्षांनी कोणाला उमेदवारी दिली? आधी जातशाही आली आणि नंतर घराणेशाही आली”, अशा शब्दांत त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर टीका केली. तर विकासाचा आराखडा देऊ शकत नाही म्हणून आरक्षणाची खिरापत सरकार वाटत सुटल्याचा घणाघाती आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच वैचारिक दिवाळखोरीचे हे सरकार उखडून फेकण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें