राहुल नार्वेकर यांची आदित्य ठाकरे यांच्यावर पहिल्यांदाच टीका; म्हणाले, विधान परिषदेच्या आमदारांमार्फत…
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा परदेश दौरा रद्द झाला. त्यानंतर मतदारसंघात विकासकामात अडथळा आणणाऱ्यांना त्यांनी फटकारलं होतं. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या दोन्ही मुद्द्यांवरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.

विनायक डावरूंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 4 ऑक्टोबर 2023 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मतदारसंघात गेले असता त्यांनी विकास कामात अडथळा आणणाऱ्या काही जणांची कानउघाडणी केली होती. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओवरून ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांवर चांगलीच टीका केली होती. परदेश दौरा रद्द झाल्यामुळे विधानसभा अध्यक्ष त्याचा राग इतरांवर काढत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली होती. विरोधकांच्या या टीकेला राहुल नार्वेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मीडियाशी संवाद साधत होते. इतर काही लोकांसारखं मी विधान परिषदेतील आमदारांमार्फत माझा मतदारसंघ चालवत नाही. मी स्वत: मतदारसंघात उतरून काम करतो. आजही दिवसातील चार तास कार्यालयात बसून विभागातील कामे करतो. त्यामुळे ज्या लोकांना विधानसभा मतदारसंघ इतर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चालवायची सवय आहे त्यांना लोकांमध्ये जाऊन कसे प्रश्न सोडवायचे हे समजणारच नाही. त्याबद्दल भाष्य करायची गरज नाही.
मतदारसंघात विकासकामे का रखडली आहे हे मी पाहत असतो. जे लोक अडथळे आणतात त्यांची कान उघाडणी करतो. तसाच तो प्रयत्न होता. त्यामुळे काही लोक जर विपरीत अर्थ काढत असतील तर त्यांना त्याबद्दल शुभेच्छा. अशा प्रयत्नातून अध्यक्षांवर कोणताही दबाव पडणार नाही, असा टोला राहुल नार्वेकर यांनी आदित्य ठाकरे यांना नाव न घेता लगावला.
काही लोकांनी चित्र निर्माण केलंय
यावेळी परदेश दौऱ्यावरून होणाऱ्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. मााझा परदेश दौरा मी 26 तारखेलाच रद्द केला. 26 तारखेला मी सीपीएला कळवलं होतं. इकडे माझे काही पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत आणि काही महत्त्वाचे कार्यक्रम असल्याने परिषदेला उपस्थित राहू शकणार नाही हे मी 26 तारखेलाच कळवलं. पण 28 तारखेला उगाच त्या दौऱ्या संदर्भात चर्चा घडवून आणली गेली. आपणच हा दौरा रद्द करायला लावला असं चित्र निर्माण करण्याचा केविलवाणा प्रकार काही नेत्यांनी केला. त्यांचा हा जो प्रयत्न आहे, अध्यक्षांवर दबाव आणायचा. पण अध्यक्ष तुमच्या गिधड धमक्यांना भीक घालत नाहीत. अशा प्रकारातून प्रभाव पडत नाही. नियमानुसारच काम होणार, असंही नार्वेकर यांनी ठणकावून सांगितलं.
परिणाम होणार नाही
16 आमदारांच्या अपात्रतेवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रकरणावर निर्णय देण्यात मी दिरंगाई करणार नाही. तसेच कोणताही घाईही करणार नाही. नियमानुसारच मी कार्यवाही करेन. जे संविधानात आहे, त्यानियमानुसारच कामकाज चालेल. पण काही लोक माझ्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्यावर टीका करत आहेत. पण मी त्याकडे लक्ष देत नाही. अशा टीकेने माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. जे नियमात आहे, त्याच पद्धतीने मी करेन, असं त्यांनी स्पष्ट केलं.