Nishikant Dubey : माहिममध्ये मुस्लिम राहतात, हिम्मत असेल तर…निशिकांत दुबेंचं पुन्हा चॅलेंज
Nishikant Dubey : "त्यांचं त्यांच्या भाषेवर प्रेम आहे. तसच उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांची हिंदी भाषा आहे. भाषेच्या आधारावर ठाकरे परिवार मारहाण करत असेल तर ते अजिबात सहन होणार नाही" असं निशिकांत दुबे म्हणाले.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद सुरु आहे. “मुंबई आणि महाराष्ट्राकडे स्वतःच असं काय आहे? मुंबई आणि महाराष्ट्र तर इतरांच्या भाकरीवर जगतो. मुंबईत महाराष्ट्रात स्वतःचे उद्योग धंदे नाहीयत” असं निशिकांत दुबे म्हणाले होते. आज पुन्हा एकदा मीडियाशी बोलताना ते काही गोष्टी बोलले आहेत. “मराठी भाषेचा सन्मान आहे, कन्नड भाषेचा सन्मान आहे, तेलगु, तामिळचा भाषेचा सन्मान आहे. ती त्यांची ओरिजनल भाषा आहे. त्यांचं त्यांच्या भाषेवर प्रेम आहे. तसच उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांची हिंदी भाषा आहे. भाषेच्या आधारावर ठाकरे परिवार मारहाण करत असेल तर ते अजिबात सहन होणार नाही” असं निशिकांत दुबे म्हणाले.
“माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. महाराष्ट्रचं देशाच्या विकासात योगदान आहे हे नाकारणार नाही. मी जे बोललो, ते चुकीच्या पद्धतीने घेतलं. मुंबई, महाराष्ट्रातून कर देतात त्यात आमचं सुद्धा योगदान आहे. याच ठाकरे कुटुंबाशी काही देणघेणं नाही” असं निशिकांत दुबे म्हणाले. “तुम्ही गरीबांना मारहाण करता. इथे मुकेश अंबानी राहतात, ते कमी मराठी बोलतात हिम्मत असेल तर तिथे जा. माहिममध्ये मुस्लिम आहेत, हिम्मत असेल तर तिथे जा. स्टटे बँक ऑफ इंडियाचा चेअरमन आंध्र प्रदेशचा आहे, तेलगु बोलतो, एलआयसीचा चेअरमन नॉर्थ ईस्टचा आहे. त्यांना मारहाण करुन दाखवा” असं आव्हान निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधुंना दिलं.
‘टाटांनी पहिली इंडस्ट्री बिहारमध्ये सुरु केली’
“गरीब माणूस इथे कमाईसाठी आलाय, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत योगदान देत आहे. टाटांनी पहिली इंडस्ट्री बिहारमध्ये सुरु केली. राज आणि उद्धव ठाकरे असं बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल लोकांना घाबरवून राजकारण करत असतील, तर त्याने राजकारण होणार नाही. केरळ, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये सुद्धा असच पटक-पटक के मारतील याचा मी पुनरुच्चार करीन” असं निशिकांत दुबे म्हणाले.
डायरेक्टर पदावरती कार्यरत
खासदार निशिकांत दुबे यांचा मुंबईत खार इथे स्वतःच्या मालकीचा फ्लॅट आहे. झुलेलाल अपार्टमेंट नावाच्या इमारतीत त्यांचा फ्लॅट आहे. 2009 साली राजकारणात येण्यापूर्वी खासदार निशिकांत दुबे हे मुंबई मधल्याच एका बड्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये डायरेक्टर पदावरती कार्यरत होते.
