99 उमेदवार जाहीर केले, पण भाजपने सस्पेन्स राखून ठेवलाच, 3 मोठ्या नेत्यांचं तिकीट कापलं जाणार?
भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने मुंबईतील 14 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. पण तरीदेखील मुंबईतील वर्सोवा, बोरीवली आणि घाटकोपर पूर्व या महत्त्वाच्या जागांवर उमेदवारांची घोषणा अद्याप बाकी आहे. त्यामुळे त्या जागांचा सस्पेन्स कायम राहिला आहे.
भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत एकूण 99 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पण तरीही काही जागांवरचा सस्पेन्स अखेर कायम राहिला आहे. भाजपच्या वर्सोवाच्या विद्यमान आमदार भारती लव्हेकर, बोरीवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राणे, तसेच घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार पराग शाह यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. तसेच या विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारदेखील जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे या मतदारसंघांबाबतचा सस्पेन्स वाढला आहे. भारती लव्हेकर, पराग शाह आणि सुनील राणे यांना पुन्हा उमेदवारीची संधी मिळणार का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे भाजपची उमेदवारी जाहीर होण्याआधीच या आमदारांचं तिकीट कापलं जाईल, अशी चर्चा होती. यामध्ये आमदार राम कदम यांच्यादेखील नावाची चर्चा होती. पण राम कदम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या उर्वरित तीन आमदारांना पुन्हा संधी मिळणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारती लव्हेकर यांच्या जागी वर्सोवातून भाजप नेते संजय पांडे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर बोरीवली विधानसभा मतदारसंघातून सुनील राणे यांच्या जागी गोपाळ शेट्टी यांच्या नावाची चर्चा आहे. तर घाटकोपर पूर्वमध्ये विद्यमान आमदार पराग शाह यांच्या ऐवजी प्रकाश मेहता यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपच्या पहिल्या यादीत याबाबतचा सस्पेन्स संपणार अशी आशा होती. पण याबाबतचा सस्पेन्स अखेर वाढला आहे. भाजप हायकमांडने या तीन जागांवर कोणावर विश्वास ठेवला आहे? ते आता आगामी काळात समोर येणार आहे.
खासदारकीचं तिकीट कापल्यानंतर भाजप गोपाळ शेट्टी यांना खूश करणार?
भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचं लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून तिकीट कापण्यात आलं होतं. पक्षाने त्यांच्या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यावेळी गोपाळ शेट्टी हे नाराज झाल्याची चर्चा होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळ शेट्टी यांच्यासोबत बातचित करत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये फडणवीस यांना यश देखील आला होता. यानंतर गोपाळ शेट्टी यांनी पियूष गोयल यांच्यासाठी प्रचार केला होता. यानंतर आता बोरीवली विधानसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे बोरीवलीत विद्यमान आमदार सुनील राणे यांचं तिकीट कापून गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी देवून पक्ष त्यांना खूश करणार का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, भाजपने मुंबईतील एकूण 14 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पण गेल्या निवडणुकीत भाजपने मुंबईतील 36 मतदारसंघांपैकी 19 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे भाजपच्या पहिल्या यादीत उर्वरित 5 जागांचं काय? असा प्रश्न आहे. या 5 जागांवर भाजपकडून आणखी उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. पण तरीदेखील भारती लव्हेकर, सुनील राणे, पराग शाह यांची उमेदवारी धोक्यात असल्याची चिन्हं आहेत.