पहिल्यांदा कोरोना दूर कर, काही लोकांच्या मनातील रोगही दूर कर; भुजबळांचे गणरायाला साकडे

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज अंजिरवाडी येथील बाप्पाचे दर्शन घेतले. (chhagan bhujbal)

पहिल्यांदा कोरोना दूर कर, काही लोकांच्या मनातील रोगही दूर कर; भुजबळांचे गणरायाला साकडे
chhagan bhujbal

मुंबई: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज अंजिरवाडी येथील बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यावरील कोरोनाचं संकट दूर कर आणि काही लोकांच्या मनातील द्वेषाचा रोगही दूर कर, असे साकडे बाप्पाला घातले. यावेळी भुजबळांनी अंजिरवाडीतील बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. (chhagan bhujbal reaction on Relief In Corruption Case)

छगन भुजबळ यांनी अंजिरवाडीतील बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. पहिल्यांदा कोरोना दूर करा. कोरोना दूर झाल्यानंतर काही लोकांच्या मनातील रोग दूर करा. सर्वांना निरोगी करा, शारीरिक आणि मानसिकृष्ट्याही. कोरोनाचा दूर करावा तसे मनामनातले रोगही दूर करावेत असं साकडं मी गणरायांना घातलं आहे, असं भुजबळ म्हणाले.

न्यायदेवतेलाही सर्वकाही माहीत

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून भुजबळांची निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. गणपतीही आशीर्वाद देतात आणि नियती आशीर्वाद देते ती जनतेच्या माध्यमातूनच देते. नियतीने आशीर्वाद दिला. त्यामुळे मला न्याय मिळत चालला आहे. आणखीही न्याय मिळेल. दोन प्रकरणात न्याय मिळाला. महाराष्ट्र सदन हे बेसिक आहे. बाकीच्या केसेस या त्याच पायावर उभ्या आहेत. इकडून तिकडून या केसेस तयार केल्या आहेत. आता न्यायदेवतेलाही माहीत झाले आहे. काय आहे आणि काय नाही. त्यामुळे आम्हाला आनंद आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळत आहे, असं ते म्हणाले.

ईडी हा केंद्राचा दुसरा पपेट

यावेळी त्यांनी ईडीच्या होत असलेल्या गैरवापरावरही त्यांनी टीका केली. मागे सर्वोच्च न्यायालय म्हणाले होते की, सीबीआय हा पपेट आहे. आता ईडी हा केंद्र सरकारचा दुसरा पपेट आहे. ईडीचा एवढा दुरुपयोग कधीही झाला नव्हता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनीही तेच सांगितलं. शिवसेनेच्या स्थापनापासून मी राजकारणात आहे. कधी यांचं तर कधी त्यांचं सरकार आलं. वाजपेयींचंही सरकार आलं. पण अशी वागणूक कधीच दिली गेली नाही. जिथे जिथे विरोधी पक्षांचं सरकार आहे, विरोधक प्रबळ आहेत. तिथे या सर्वांना त्रास सुरू आहे, असा दावाही त्यांनी केला.

अंजिरवाडी, बालपण आणि बाळासाहेब

भुजबळ यांनी यावेळी अंजिरवाडी गणेशोत्सव मंडळाशी निगडीत आठवणींना उजाळा दिला. जानेवारी 1990 मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन झालं. गणपती मंडळाचं हे 75 वे वर्ष आहे. वयाच्या 10व्या-15 व्या वर्षापासून मी या मंडळात काम करतो. मी 42 वर्षापासून मंडळाचा अध्यक्ष आहे. पंकज 20 वर्षांपासून सरचिटणीस आहेत. पण सध्या पंकज आणि समीरच सर्व काम पाहात आहेत. मी फक्त गणेश चतुर्थी आणि विसर्जनाच्या दिवशीच इथे येतो, असं सांगतानाच शेजारच्याच वाड्यांमध्ये मी लहानाचा मोठा झालो. या वाड्या, रस्ते माझ्या परिचयाचे आहेत. भाजीपाला वाडी, तुळशीवाडी, सिताफळ वाडी याच बाजूला आहेत. इथेच मी लहानाचा मोठा झालो. इथेच माझे बालपणीचे मित्रं आहेत. राजकारण आणि समाजकारणाचे धडे मी इथूनच घेतले. शिवसेनेत प्रवेश घेतला तेव्हा इथल्या लोकांसहित प्रवेश घेतला. इथल्या लोकांनीच मला नगरसेवक म्हणूनमहापालिकेत पाठवलं. एक दोन वर्ष तुरुंगातील सोडल्यास गणेशोत्सवाला आम्ही इथे येतो. कुठेही असलो तरी गणेशोत्सवात भुजबळ कुटुंब इथे येतेच, असंही त्यांनी सांगितलं. (chhagan bhujbal reaction on Relief In Corruption Case)

 

संबंधित बातम्या:

Ganesh Chaturthi 2021 Live Updates | लाडक्या बाप्पाचं आगमन, राज्यभरात गणेशोत्सवाची धूम

Ganesh Chaturthi 2021 | ना ढोलताशांचा दणदणाट, ना गुलालांची उधळण; कोरोना नियमांचं पालन करत गणरायाचं उत्साहात आगमन

लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी बाजारात गर्दी, औरंगाबादेत बालगणेशाच्या मोहक मूर्तींची भूरळ

(chhagan bhujbal reaction on Relief In Corruption Case)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI