ब्लेझर, चष्मा अन् काळीकुट्ट दाढी… छगन भुजबळांचे हे फोटो तुम्ही कधीच पाहिले नसतील
Chhagan Bhujbal Unseen Photos : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे काही जुने फोटो... छगन भुजबळ यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी शेअर केलेत. हे फोटो तुम्ही कधीही पाहिले नसतील. महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाची आठवण छगन भुजबळ यांनी शेअर केलीय. वाचा सविस्तर...
छगन भुजबळ… राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते… छगन भुजबळ म्हटलं की, पांढरी शुभ्र दाढी – डोळ्यावर चष्मा अन् गळ्यात मफलर असणारं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं राहातं. पण छगन भुजबळ यांचा जुना लुक तुम्हाला माहिती आहे का? त्यांचे काही जुने फोटो तुम्ही पाहिले आहेत का? छगन भुजबळांनी नुकतं काही जुने फोटो आणि आठवणी शेअर केल्या. यात छगन भुजबळ यांनी ब्लेझर घातलेलं दिसत आहे. तसंच डोळ्यावर चष्मा अन् काळी कुट्ट दाढी असा छगन भुजबळांचा लुक या फोटोमध्ये दिसतोय. कर्नाटक सीमाप्रश्न पेटलेला असताना छगन भुजबळ यांनी 1986 साली वेशांतर करून आंदोलन केलं होतं. यावेळी त्यांना अटकही झाली होती. तेव्हाच्या आठवणी छगन भुजबळ यांनी शेअर केल्या आहेत.
छगन भुजबळ यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी
कर्नाटकमधील सीमाभागात कानडी सक्तीच्या विरोधात आणि बेळगांव-कारवार सीमाप्रश्नी दि. ४ जून १९८६ रोजी वेषांतर करून मी बेळगावात आंदोलन केले होते. आज त्याला ३८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने पुन्हा एकदा त्या सर्व घडामोडी आणि मराठी बांधवांच्या हक्कांसाठी आम्ही भारावून जाऊन केलेलं ते आंदोलन यांच्या आठवणी आज पुन्हा पुन्हा जाग्या झाल्या.
कर्नाटक राज्याची स्थापना झाल्यावर बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह शेकडो मराठी गावांवर कर्नाटक सरकारकडून अनेक वर्षांपासून कन्नड भाषेची सक्ती लादण्यात आलेली. कर्नाटक सरकारच्या या गळचेपीचा निषेध आणि सीमाप्रश्नी आंदोलन करण्याचा आम्ही निर्णय घेतला.
याची चाहूल लागल्यानंतर कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून येण्याचे सर्व मार्ग बंद केले. पण काहीही करून बेळगावात धडक द्यायचीच असा निश्चय केलेला असल्याने वेशभूषा बदलून गोवा मार्गे मी बेळगावात दाखल झालो. आधी पत्रकार पांडे, तर नंतर दुबईचे व्यापारी इक्बाल शेख यांची वेशभूषा मी केली होती. पत्रकार पांडे ही वेशभूषा इतकी बेमालूम झाली होती की तेव्हा खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मीनाताई म्हणजे माँ यांनी देखील मला पटकन ओळखलं नव्हतं.
त्यानंतर बेळगावात दाखल झाल्यावर आम्ही कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलन केले. यानंतर आम्हाला अटक झाली होती. धारवाडच्या तुरूंगात दोन महिने काढल्यानंतर आमची सुटका झाली. यावेळी माझ्यासोबत दगडू सकपाळ, बाबा पिंगळे, अरविंद तायडे, हेमंत मंडलिक व असंख्य शिवसैनिक होते. प्रमोद नलावडे यांनी वेशभूषा करण्यात मला मदत केली होती.