पॉझिटिव्हच कंटेट टाका, तरच पैसे, राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी पैसे देऊन मुलं आणली; मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या पुणे कार्यक्रमावर खळबळजनक दावा केला आहे. कार्यक्रमासाठी काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयांमधून मुलींना पैसे देऊन आणले गेले. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना केवळ सकारात्मक मजकूर पोस्ट करण्याची सक्ती करण्यात आली, अन्यथा पैसे मिळणार नाहीत असे सांगण्यात आले.

पॉझिटिव्हच कंटेट टाका, तरच पैसे, राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी पैसे देऊन मुलं आणली; मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 22, 2026 | 2:22 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी येणाऱ्या 90 ते 95 मुली या काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजातील आहेत. या मुलामुलींना आणि सोशल इन्फ्लुएंसरला पैसे देऊन बोलावलं आहे. कार्यक्रमाचा केवळ पॉझिटिव्ह कंटेट टाका. नाही तर पैसे देणार नाही, असं या सोशल इन्फ्ल्यूएंसरला सांगण्यात आलं आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. तसेच राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाबाबत नवनाथ बन यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

90 ते 95 टक्के मुली या काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजातील आहे. त्यांनाच या कार्यक्रमात एन्ट्री मिळणार आहे. नवनाथ बनने या कार्यक्रमाचा पर्दाफाश केला आहे. इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून मुलींना आणलं जात आहे. इन्फ्लुएंसरला बोलावलं जात आहे. राहुल गांधी आणि पक्षाबद्दल फक्त पॉझिटिव्ह टाकायला सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर पॉझिटिव्हच कंटेट टाका तरच तुम्हाला पैसे देऊ, निगेटीव्ह टाकला तर पैसे देणार नाही, असं या इन्फ्लुएंसरला सांगितलं गेलं आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पोलीस कारवाई करतील

हा इव्हेंट आहे. हा इव्हेंट चर्चेत राहण्यासाठी सर्व घडवून आणलं जात आहे. जसा एखादा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी वाद निर्माण केला जातो. म्हणजे सिनेमा हिट होतो. तसा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. पण पोलिसांनी त्यात लक्ष घातलं आहे. पोलीस त्यात योग्य कारवाई करतील, असं फडणवीस म्हणाले.

आरोपांची पडताळणी करणार

राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी 3 हजार लोकांना 30-35 हजार रुपये खर्च केले जात आहेत. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमावर 9 ते 10 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. ‘छात्रों की गूंज’साठी कोट्यवधींची उधळण केली जात आहे. या पैशांचा स्रोत काँग्रेसने सांगावा, असं आव्हान भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिलं होतं. त्यावरही मुख्यमंत्र्यानी प्रतिक्रिया दिली आहे. नवनाथ बन यांनी जे आरोप केले आहेत, ते पुराव्याच्या आधारे केले आहेत. त्यांनी जे सांगितलं त्याची पडताळणी केली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

काय घडलं?

दरम्यान, राहुल गांधी यांच्या पुण्यातील छात्रो की गुंज या कार्यक्रमाच्या आधीच पुण्यात मोठा राडा झाला. अभाविपचे कार्यकर्ते आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमध्ये काल रात्री 10 वाजता धुमश्चक्री उडाली. त्यानंतर आज सकाळी काही जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. केवळ आमच्याच कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून हा दहशत निर्माण करण्याचा प्रकार असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us