बाळासाहेब ठाकरे यांना काय गुरुदक्षिणा द्याल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…
"जनतेची सेवा ही आधीपासून करतोच आहे. जनता, सर्वसामान्यांची सेवा हीच बाळासाहेब ठाकरे यांना गुरुदक्षिणा आहे. बाळासाहेबांना आणखी काय हवं होतं? बाळासाहेब म्हणायचे की, जनतेच्या दारात जा, आम्ही शासन आपल्या दारी घेऊन गेलो. बाळासाहेब म्हणायचे कुणी आलं तर त्याला भेटायला जा, त्याच्या दारात जा, घरी जा. ते करायचं काम आम्ही केलं. तीच बाळासाहेबांना गुरुदक्षिणा आहे", अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त दादर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर येऊन वंदन केलं. “दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी आलो. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील जनतेच्या शुभेच्छांमुळे मुख्यमंत्री झालो. त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो. बाळासाहेबांचे आशीर्वादानेच आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री होऊ शकतो. त्यातून उतराई होऊ शकत नाही. पण त्यांचे विचार पुढे नेण्याचं काम करतो”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करण्याचा प्रयत्न केला. जनता देखील आपुलकीने या सरकारकडे पाहते आहे. कारण तसं काम आम्ही केलं, विकासाचं काम केलं. बाळासाहेब नेहमी सांगायचे इमारतीतील प्रकल्प होतील, लोकांना मोकळा श्वास घेण्यासाठी विरंगुळा म्हणून उद्यान हवीत. आम्ही ते करत आहोत. रेसकोर्सची 120 एकर जमीन आणि कोस्टल रोडच्या बाजूची दीडशे एकर अशा एकूण 300 एकर जमिनीवर मोठे पार्क तयार करत आहोत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“सर्वसामान्य लोकांचे जीवन बदलावं म्हणून अनेक उपक्रम राबवले. ऐतिहासिक निर्णय घेतले. बाळासाहेब नेहमी म्हणायचे, लोकांना नोकऱ्या द्या. पण त्याआधी नोकऱ्या देणारे हात तयार करा. त्यासाठी आम्ही युवकांना सहा हजार, आठ हजार, दहा हजार रुपये देत आहोत. बाळासाहेबांना अपेक्षित असलेल्या योजना आम्ही अंमलात आणल्या आहेत”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
बाळासाहेबांना काय गुरुदक्षिणा द्याल? शिंदे म्हणाले…
“आम्ही लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना आणल्या. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून त्यांच्याकडून बदनाम करण्याचं काम सुरू आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आम्ही काम केलेलं नाही. आम्ही केलेल्या योजना कशाप्रकारे अपयशी ठरतील याचा प्रयत्न ते करत आहेत. गेल्या अडीच वर्षात झालेलं काम आणि त्यापूर्वीच्या दोन वर्षाचं काम याची तुलना जनता जनार्दन करत आहे. जनतेची सेवा आम्ही आधीपासूनच करत आहोत. सर्वसामान्यांची सेवा हीच बाळासाहेबांना गुरुदक्षिणा आहे. बाळासाहेब म्हणायचे जनतेच्या दारी जा आणि आम्ही शासन आपल्या दारी घेऊन जात आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. पावसाच्या पार्श्वभूमीवर काय तयारी केली आहे, याबाबतही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. “सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. पावसामध्ये कुणालाही त्रास व्हायला नको. त्यासाठी अलर्ट मोडवर राहा असे आदेश दिले आहेत. यंत्रणा सज्ज आहे”, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
