गरज पडली तर धर्मासाठी… जैन धर्मीय संतापले, सरकारकडे केली मोठी मागणी
मुंबईतील दादर कबूतरखाना बंद केल्याने जैन धर्मीय संतप्त झाले आहेत. जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी जीवदयेच्या तत्त्वासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला असून, आमरण उपोषण सुरू केले होते. कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याची त्यांची मागणी आहे.

दादर कबूतरखाना बंद करण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाविरोधात जैन धर्मीय पुन्हा आक्रमक झाले आहेत. जैन धर्माच्या जीवदया तत्त्वानुसार कबुतरांना दाणा-पाणी देण्याच्या मागणीसाठी जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या विरोधात निलेशचंद्र विजय यांनी आमरण उपोषण करण्याची भूमिका घेत सरकारला आणि प्रशासनाला थेट आव्हान केले आहे.
जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी नुकतंच एक जाहीर सभा घेतली. या सभेत जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी विविध मागण्या केल्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद करण्यात आलेला दादर कबूतरखाना त्वरित पुन्हा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हा कबूतरखाना १०० वर्षांहून अधिक जुना असून तो जैन समाजासाठी जीवदयेचे प्रतीक आहे. मुंबई महापालिकेने कबुतरखान्यासाठी दिलेले चार पर्यायी स्थळ मुनींना मान्य नाहीत. कबूतर ४ ते ७ किलोमीटर दूर उडून जाणार नाहीत, असे जैन मुनी निलेशचंद्र विजय म्हणाले.
आश्वासन पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन सुरु करणार
या पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीवदयासाठी लढू,” असा इशारा त्यांनी दिला. मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मध्यस्थीनंतर सरकारने १५ दिवसांच्या मुदतीत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यावर मुनींनी तात्पुरते उपोषण मागे घेतले. मात्र, आश्वासन पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
मी कुठल्या पार्टीचा समर्थक नाहीये, मी फक्त जीवदयासाठी हे सगळं करतोय. मुंबई महापालिकेवर तोच राज्य करेल जो भुतदया दाखवेल. मुनींनी स्वतःला कट्टर सनातनी जैन मुनी म्हणून संबोधले आहे. तसेच आम्हाला हिंदूराष्ट्र बनवायचे आहे. चहावाला आणि गायवाल्याच्या आम्ही विरोध करत नाही. पण १५ दिवसांचा अल्टिमेटम असूनही अद्याप काहीही सरकारने केलेलं नाही, याचा अर्थ त्यांच्यात जीवदया नाही, असे मत जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी व्यक्त केले.
गरज पडली तर धर्मासाठी शस्त्रं पण उचलू
कबूतरखाना उघडण्यासोबतच त्यांनी गोरक्षक बोर्डाप्रमाणेच जैन प्रार्थनास्थळे आणि कबूतरखान्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्याची मागणी केली आहे. गरज पडली तर धर्मासाठी शस्त्रं पण उचलू असा थेट इशारा दिला होता, ज्यामुळे वाद निर्माण झाला होता. नंतर त्यांनी शांततामय सत्याग्रह करणार असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान सध्या जैन मुनींनी कुलाब्यातून जीवदया अभियान सुरू केले आहे. त्यांचा कोणताही पारंपरिक मोर्चा नसून जैन समुदायातील लोकांना एकत्रित करण्याचे काम सुरू आहे. गौरक्षकांच्या धर्तीवर प्रत्येक वॉर्डात कबूतर रक्षक तयार करण्याची योजना आहे. या कामात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते कबूतर घेऊन येऊन मदत करत असल्याचे त्यांनी नमूद केले. आमची तुलना मुस्लिमांशी नको. ते लव्ह जिहाद आणि लँड जिहाद करतात, पण आम्ही फक्त देशाच्या विकासासाठी काम करतो. आम्ही जैन समाज नेहमी तुमच्यासोबत राहिलो आहे. पण आम्ही जीव दयेसोबत कोम्प्रोमाईज़ करणार नाही,” असेही त्यांनी सांगितले.
