आईच हरवली… महाकाय शहरात भटकली… कचऱ्यातलं अन्न खाल्लं… एक शब्द ऐकला अन् 7 वर्षाने स्मरणशक्ती परतली
मुंबईत सात वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली कस्तुरी पाटील नावाची महिला अलीकडेच सापडली. स्मृतीभ्रंश झाल्याने ती भटकत होती. एका दिवशी तिने "बादामी" हा शब्द उच्चारला, ज्यामुळे पोलिसांना तिचा शोध घेण्यास मदत झाली. तिच्या मुलीशी सात वर्षांनंतर पुनर्मिलन झाले, ज्यामुळे दोघांचाही आनंद झाला.

मुंबई सारख्या महानगरातील गल्लीबोळात भटकत असताना केवळ एक शब्द तुमचं आयुष्य बदलू शकतो, याची कुणी कल्पनाही करणार नाही. सात वर्षा पूर्वी एक महिला बेपत्ता झाली. सात वर्षापूर्वीपासून ही महिला मुंबईच्या रस्त्यावरून भटकत होती. तिची स्मरणशक्ती गेली होती. आपण कोण आहोत? कुठून आलोय? हे सुद्धा ती विसरून गेली होती. पण एक दिवस अचानक तिने एक शब्द ऐकला आणि तिची तिची स्मरणशक्ती परत आली. तिचं नशीब बदललं आणि तिची आणि तिच्या मुलीची भेट झाली. एखाद्या सिनेमातील पटकथेसारखी ही कथा वाटेल. पण ही सिनेमातील कथा नाही, तर हे एक सत्य आहे.
कस्तुरी पाटील असं या 50 वर्षीय महिलेचं नाव आहे. ती रायगड जिल्ह्यातील पाली येथे भटकत होती. अत्यंत दयनीय अवस्थेत ती फिरत होती. तिची स्मरणशक्ती गेली होती. भीख मागून ती जगत होती. कचऱ्यातील अन्न शोधून खात होती. काही स्थानिकांनी या महिलेला पाहिलं आणि ‘सोशल अँड इवेंजेलिकल एसोसिएशन फॉर लव’ (SEAL) या संस्थेला तिची माहिती दिली. सील कंपनी पनवेलच्या वांगणी येथील सामाजिक संस्था आहे. बेघर लोकांना मदत करण्याचं काम ही संस्था करते. कस्तुरीला या ठिकाणी आणण्यात आलं. हळूहळू तिची परिस्थिती सुधारू लागली.
एक दिवस अचानक
कस्तुरीला भूतकाळ आठवत नव्हता. पण काही महिन्यापूर्वी तिने अचानक बादामी हा शब्द उच्चारला. सीलचे सदस्य बिजू सॅम्यूअल आणि त्यांच्या टीमचं या शब्दाकडे लक्ष गेलं. बादामी हे कर्नाटकमधील बागलकोट जिल्ह्यातील महत्त्वाचं शहर आहे, हे त्यांना माहीत होतं. त्यांनी या माहितीच्या आधारे तात्काळ बादामी पोलीस ठाण्याशी संपर्क करून त्यांना कस्तुरीचे फोटो पाठवले.
तिची आशाच सोडली
बादामी पोलिसांनी फोटो मिळताच शोध घेतला. तेव्हा सात वर्षापूर्वी कस्तुरीची मुलगी देवम्मा भिंगारी यांनी आई हरवल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी ही माहिती देवम्मालाही दिली. त्यामुळे देवम्माचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती लगेचच तिच्या आईला भेटण्यासाठी निघाली. तिच्यासाठी हा क्षण चमत्कारापेक्षाही मोठा होता. कारण तिने आई भेटण्याची आशाच सोडून दिली होती.
काय घडलं?
कस्तुरीच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं होतं. त्यामुळे तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. या धक्क्यामुळे तिने अखेर घरच सोडलं होतं. ती तिच्या बहिणीकडे राहू लागली होती. पण नंतर ती तिथूनही निघाली अन् महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात भटकू लागली. ती कुठे आहे? कुठे नाही? याची कुणालाच काही पडली नव्हती. शिवाय कस्तुरीलाही तिचा भूतकाळ आठवत नव्हता.
आनंद पोटात मायेना
कस्तुरीच्या मुलीची सासू इरम्मा भिंगारी यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. माझी सून सतत आईच्या काळजीने चिंतीत होती. शेवटी ती मिळाली याचा आम्हाला आनंद आहे, असं इरम्मा म्हणाली. जेव्हा कस्तुरीने आपल्या मुलीला पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळत होते. तब्बल सात वर्षानंतर आपल्या कुटुंबीयांना भेटून ती भावूक झाली होती.
