Maharashtra Budget: छावा चित्रपटामुळे संभाजी महाराजांचा इतिहास सर्वत्र पोहचला, आता अर्थसंकल्पात महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा
Chhatrapati Sambhaji Maharaj Smarak: छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदानस्थळ असलेल्या मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ मौजे वढु बुद्रुक येथे संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचे काम सुरु असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Maharashtra Budget 2025: छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत आला. त्याचे पडसाद जनतेमध्ये उमटत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर हे ठिकाण छत्रपती संभाजी यांनी केलेल्या अतुलनीय शौर्यामुळे ओळखले जावू लागले. औरंगजेबाच्या सैनिकांनी राजे संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथील एका देवळात पकडले होते. त्या संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी ही घोषणा केली.
अजित पवार यांनी सांगितले की, छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी संभाजी महाराज यांनी जीवन समर्पित केले. त्यांनी दाखवलेले असीम शौर्य आणि धैर्य यामुळे सर्व युद्धांमध्ये त्यांना विजयश्री मिळाली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे जिथे आहेत, त्या ठिकाणामध्ये कोकणातील संगमेश्वर हे एक प्रमुख ठिकाण आहे. औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्थ केली. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
संभाजी महाराज यांच्या नावाने पुरस्कार
छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदानस्थळ असलेल्या मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ मौजे वढु बुद्रुक येथे संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचे काम सुरु असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत” पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णयही शासनाने नुकताच घेतला आहे.
3 ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा सन्मान दिन
मायमराठीस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 3 ऑक्टोबर, 2024 रोजी झालेल्या बैठकीत अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यातील जनतेच्या आणि जगभरातील मराठी भाषिकांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत अजित पवार म्हणाले की, यापुढे दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 3 ते 9 ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येईल.
मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर येथे अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषाविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार सुरु करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.
