Malegoan Blast : हा निकाल असाच लागेल… AIMIM ची पहिली प्रतिक्रिया, इम्तियाज जलील यांच्यासह मालेगावचे आमदार म्हणाले काय?
AIMIM Imtiaz Jaleel : 17 वर्षांनी मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आज 31 जुलै 2025 रोजी समोर आला. त्यात साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित यांच्यासह इतर आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यावर आता AIMIM ची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आज गुरुवारी, 31 जुलै 2025 रोजी लागला. NIA च्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्या कोर्टाने याप्रकरणात निकाल दिला. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, यांच्यासह 7 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या निकालावर हिंदू पक्षासह मुस्लीम संघटनांकडून प्रतिक्रिया उमटली आहे. हिंदू संघटनांनी आणि अनेक नेत्यांनी या निकालावर मत मांडले. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि मालेगावचे आमदार मौलाना मुक्ती मोहम्मद इस्माईल यांनी याप्रकरणी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
इम्तियाज जलील यांचा खडा सवाल
मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यावर एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोक चव्हाण यांच्या सरकारने त्यावेळी असे म्हटले का, की बॉम्बस्फोट होऊ द्या आम्ही रस्त्यावर चालणाऱ्या कोणत्याही लोकांना अटक करतो. त्यांनी 15-20 वर्षे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी घालवावी, असा सवाल जलील यांनी केला. हा अत्यंत गंभीर विषय आहे. आता महाराष्ट्र सरकार काय निर्णय करते हे पाहावे लागेल. त्यांनी काही केले नाही तर सर्वोच्च न्यायालयाने सुमोटा दाखल करून घ्यावी. मुंबई लोकल बॉम्बस्फोटात जसे राज्य सरकार सुप्रीम कोर्टात पोहचले होते. तसेच या प्रकरणातही कोणताही धर्म, जात न पाहता हे प्रकरण सुद्धा राज्य सरकारने रिव्ह्यूसाठी कोर्टात न्यावे अशी मागणी त्यांनी केली.
हा निकाल असाच लागेल हे माहिती
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये निकाल असाच लागेल असा आम्हाला आधीच वाटत होतं, अशी प्रतिक्रिया मालेगावचे आमदार मौलाना मुक्ती मोहम्मद इस्माईल यांनी दिली. 2008 साली ज्या मोटरसायकलवर ठेवून बॉम्ब ब्लास्ट करण्यात आला ती मोटरसायकल साध्वी प्रज्ञासिंह यांच्या नावावर होती त्यानंतर एटीएस कडून तपास सुरू झाला आणि त्यामध्ये जनरल पुरोहित आणि असिमानंद यांचे देखील नाव समोर आले, असे ते म्हणाले.
तपासामध्ये एक लॅपटॉप देखील सापडला होता ज्यामध्ये देशभरात कुठे कुठे बॉम्बस्फोट केले जाणार आहेत याची माहिती होती त्यामध्ये मालेगावचे देखील नाव होते. जो लॅपटॉप सापडला होता त्यामध्ये जनरल पुरोहित यांनी तयार केलेली माहिती होती ती इतर कोणीही केलेली नव्हती त्या लोक त्या लॅपटॉप मध्ये कुठे कुठे बॉम्बस्फोट केले जा जाणार आहेत त्याची सर्व माहिती होती आणि मालेगावचे देखील नाव होते. हे एवढे पुरावे असतानाही निकाल असा येतो म्हणजे हा न्याय नाही असं आमचं म्हणणं आहे.
वरिष्ठ न्यायालयात दाद मागू
17 वर्षानंतर जर असा निकाल येत असेल तर मालेगाव वासियांसाठी ही दुःखाची गोष्ट आहे या निकालाच्या विरोधात आम्ही वरच्या न्यायालयात अपील करु. या बॉम्बस्फोटामधील जे पाच जण फरार झाले आहेत ते जर सापडले असते तर आताचे लोक निर्दोष झाले नसते. हे निर्दोष सुटले असले तरी बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे. त्यामुळे सरकारने या बॉम्ब ब्लास्टमध्ये असलेल्या लोकांचा तपास करून त्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी आमदारांनी केली.
