
सर्व मतभेद दूर सारत दोन ठाकरे 5 जुलै रोजी एकाच मंचावर आले. मराठीच्या मुद्यावर त्यांनी एकला चलो रे ऐवजी ‘आम्ही दोघे भाऊ एक होऊ’ असे संकेत दिले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी दोन्ही खेम्यातील नेत्यांनी एकत्रिकरणाचा सूर आळवला आहे. दस्तूरखुद्द शरद पवार यांनी अगोदर विरोध पण नंतर अनुकूल संकेत दिले आहेत. आता अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्यांनी पुन्हा वातावरण ढवळले आहे.
शरद पवार यांनी काय दिले संकेत?
28 जून 2025 रोजी कोल्हापूरात माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले होते. मनसे आणि शिवसेना एकाच मंचावर आल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला होता. राजकारणात मतभेद विसरून एकत्र येऊन चांगले काम करणे कधीही चांगलेच. त्यामुळे सगळे मतभेद विसरून आम्ही एकत्र येत असू तर ते चांगलेच आहे असे स्पष्ट संकेत पवारांनी त्यावेळी दिले होते. सगळे मतभेद विसरून चांगले काम केले तर वाईट वाटायचे काम नाही असे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर त्यांनी भाष्य केले होते.
भाजपाशी बोलावे लागेल
तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची वेळ आल्यास भाजपशी बोलावे लागले असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची वेळ जर आली तर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी बोलावे लागले असे मोठे वक्तव्य तटकरे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याविषयीची चर्चा सुरू झाली. त्यावरही तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सध्या सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा मुद्दा अजून दूर दिसत आहे. माझ्यापर्यंत तरी अशी काही चर्चा आली नाही असे तटकरे म्हणाले. तर मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा तटकरे यांच्या मताला दुजोरा दिला आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात भाजप काय भूमिका घेतो हे अद्याप समोर आलेले नाही. पण निदान चर्चा होत आहे. दोन्ही बाजूची नेते मंडळी भूमिका आणि मतं मांडत असल्याचे दिसून येते.