बांगलादेशी घुसखोरांच्या शोधात मनसेची धाड, बोरीवलीत झोपडपट्ट्यांत शोध मोहीम

बोरीवली पूर्व चिकुवाडी येथे बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेने आज आंदोलन केलं. येथे अनेक दिवसांपासून काही बांग्लादेशी महिला आणि पुरुष राहात असल्याचा स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांचा दावा होता

बांगलादेशी घुसखोरांच्या शोधात मनसेची धाड, बोरीवलीत झोपडपट्ट्यांत शोध मोहीम

मुंबई : बोरीवली पूर्व चिकुवाडी येथे बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेने आज आंदोलन केलं. येथे अनेक दिवसांपासून काही बांग्लादेशी महिला आणि पुरुष राहात असल्याचा स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांचा दावा होता (MNS Agitation Against Bangladeshi). त्यावरुन मनसेने आज थेट चिकुवाडी परिसर गाठत आंदोलन केलं. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चिकुवाडीतील झोपडपट्टी परिसरात शोध मोहीम राबवत लोकांची चौकशी केली. त्यांची कागदपत्रही तपासली. गेल्या काही दिवसांपातून या परिसरात बांगलादेशी लोक राहात असल्याचा दावा मनसेने केला. त्यांचा पेहराव आणि बोली भाषा बांगलादेशींसारखी असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे (MNS Bangladeshi Search Campaign).

तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या पत्र्याचा शेडमध्ये जवळपास 50 कुटुंब राहात असल्याचा दावा मनसेने केला. मनसेच्या पदाधिकाऱ्य़ांनी गेले तीन दिवस या लोकांवर पाळत ठेवली होती. त्यांच्याबाबत माहिती मिळवली होती. त्यानंतर आज त्यांनी या परिसरात आंदोलन केलं.

आंदोलनादरम्यान स्थानिक बोरीवली पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बांगलादेशी घुसघोर राहात असल्याचा दावा मनसेने ज्या वस्तीवर केला त्या वस्तीत राहणाऱ्या लोकांकडे आधारकार्ड आणि मतदार ओळखपत्र आढळले. पण, त्यांची मजूर म्हणून स्थानिक पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद नाही. तर कामाच्या शोधात कोलकाता, ओदिशामधून मुंबईत आल्याचा इथल्या लोकांचा आहे. मोलमजुरी करून दिवसाकाठी त्यांना 350 ते 400 रुपये मजुरी मिळते. पोलिसांना यात काही बालमजूरही आढळले.

या सर्व लोकांचा तपशील पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. तसेच, त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. ज्या ठेकेदाराने या लोकांना इथे काम दिलं, त्याला पोलिसांनी घटनास्थळाहून ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे.

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेचा मोर्चा

गेल्या 9 फेब्रुवारीला मुंबईतील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेने भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेही सहभागी झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो मनसैनिक या मोर्चात सहभागी होण्यासाठी आले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI