काँग्रेसमधील बडे नेते भाजपमध्ये येणार का?; अशोक चव्हाण यांनी एका वाक्यात सांगितलं
Ashok Chavan Speech After Inter in BJP : अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश होताच अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली. पक्षांतराचा निर्णय का घेतला? यावरही अशोक चव्हाण बोलले. शिवाय काँग्रेसमधील बडे नेते भाजपमध्ये येणार का? या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी देऊन टाकलं.
विनायक डावरूंग, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 12 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजप पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये करताच अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली. भाजपमध्ये प्रवेश का केला? काँग्रेसचे बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार का? यावरही अशोक चव्हाण यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. मी कुणालाही निमंत्रित आमंत्रित केलेलं नाही. देवेंद्र फडणवीस बाकीचं पाहतील, असं अशोक चव्हाण म्हणाले. शेतकऱ्यांचे तीन कायदे रद्द केले. जनतेची भावना समजून त्यांनी हा निर्णय घेतला. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा सोडवण्यात मोदी सक्षम आहेत, असं अशोक चव्हाण म्हणाले.
आदर्श घोटाळा, आरोप अन् चव्हाणांचं उत्तर
आदर्श घोटाळा प्रकरणी अशोक चव्हाण यांच्यावर वारंवार गंभीर आरोप झाले. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या आरोपांचं काय होणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. आदर्श घोटाळ्याचा प्रश्न उशिरा आला. पहिलाच विचारायला हवं. हायकोर्टात आमच्या बाजूने निकाल लागला आहे. तो राजकीय अपघात होता. कोर्टात प्रकरण चालू आहे. चिंतेचा विषय वाटत नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.
हा निर्णय सोपा नव्हता- चव्हाण
पक्षांतराचा निर्णय घेणं सोपं नसल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. पक्ष सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. खूप विचार करावा लागला. महाराष्ट्राच्या हितासाठी, जिल्ह्याच्या हितासाठी आणि देशाच्या हितासाठी निर्णय घेतला. एका दिवसात निर्णय घेतला नाही, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
पक्षांतराचा निर्णय वैयक्तिक – अशोक चव्हाण
मला पक्षाने खूप काही दिलं. मान्य आहे. नाकारत आहे. पण मीही पक्षासाठी खूप काही दिलं आहे. योगदान दिलं आहे. ते कुणी नाकारू शकत नाही. पण अचानक तुम्ही जर माझ्या पाठी काही करत असाल तर ते योग्य नाही. मी पार्टीला डॅमेज केलं नाही. मी फक्त वैयक्तिक निर्णय घेतला. माझं योगदान काय हे राष्ट्रीय नेतृत्व जाणून आहे, असं अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हणाले.