तुम्हाला पूजा शर्माचा व्हिडीओ कॉल तर नाही येत? सावधान, मुंबईत सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश !

सायबर गुन्हेगार नेहमी गुन्हा करण्याची पद्धत बदलत असतात. मात्र गेल्या काही महिन्यात एक वेगळाच गुन्हा चर्चेत आहे.

तुम्हाला पूजा शर्माचा व्हिडीओ कॉल तर नाही येत? सावधान, मुंबईत सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश !

मुंबई : सायबर गुन्हेगार नेहमी गुन्हा करण्याची पद्धत बदलत असतात. मात्र गेल्या काही महिन्यात एक वेगळाच गुन्हा चर्चेत आहे. त्यामुळे अनेकांच्या डोक्याला मनस्ताप सहन करावा लागतोय. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या एका सेक्सटोर्शन रॅकेटचा पर्दाफाश करून एकूण तिघांना अटक केलीय. या प्रकरणात एका बड्या राजकीय नेत्याला आरोपींनी टार्गेट केल्यानंतर सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा झालाय (Mumbai Police burst Sextortion racket on the name of Pooja Sharma Facebook).

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या प्रकरणात तिघांना राजस्थान, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमधून अटक केलीय. तिघेही आरोपी आठवी आणि दहावीचे शिक्षण घेतलेले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिलीय. धक्कादायक म्हणजे हे आरोपी समाजात प्रतिष्ठीत आणि उच्चभ्रू लोकांना टार्गेट करतात. यामध्ये आयएएस, आयपीएस, आमदार, खासदार आणि अनेक महत्वाच्या लोकांचा समावेश असतो.

सुंदर मुलीचा फोटो ठेवून एक बनावट अकाऊंट

सुरुवातीला सोशल मीडियावर एका सुंदर मुलीचा फोटो ठेवून एक बनावट अकाऊंट उघडण्यात येतं. त्याद्वारे या प्रतिष्ठीत लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते आणि संबंध वाढवले जातात. या प्रकरणात पूजा शर्मा या फेसबुकवरील अकाऊंटच्या नावाने लोकांना बळी पाडलं जात होतं. त्यामुळे पूजा शर्मा या नावाची तब्बल 151 फेसबुक अकाऊंट आणि काही टेलिग्राम चॅनेल्सही बॅन करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबईचे सहपोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे यांनी दिलीय.

‘व्हिडिओ कॉल करुन अश्लील व्हिडीओ क्लिप्स दाखवण्याचे प्रकार’

काही दिवस सोशल मीडियावर बोलणं झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला अचानक एक दिवस व्हिडिओ कॉल केला जातो आणि अश्लील व्हिडीओ क्लिप्स दाखवल्या जातात. अनावधानाने समोरच्या व्यक्तिने तो व्हिडिओ पाहिल्यास त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्याद्वारे त्याला ब्लॅकमेल केलं जातं आणि खंडणीची मागणी केली जाते. खंडणी न जिल्यास तो व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकण्याची धमकी दिली जाते. बदनामी टाळण्यासाठी बळी पडलेली व्यक्ती आरोपींना पैसे देतात. अशाप्रकारे हजारो लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे.

बड्या राजकीय नेत्याच्या तक्रारीनंतर रॅकेटचा खुलासा

मुंबईत अशाप्रकारचे चार ते पाच गुन्हे दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांच्या तपासाला वेग आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका बड्या राजकीय नेत्याच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा खुलासा झालाय. अटक करण्यात आलेले आरोपी हे कमी शिकलेले असूनही कॉलसेंटरच्या माध्यमातून हे रॅकेट चालवत होते. त्यामुळे सोशल मीडियावर वावरताना खूप काळजी घ्या. शिवाय अनोळखी व्यक्तीकडून फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास त्यावर हजारदा विचार करूनच ती स्वीकारा, असं आवाहन पोलिसांनी केलंय.

हेही वाचा :

PMOच्या नावाने फसवणूक करणाऱ्या आणि सेक्सटॉर्शन रॅकेटचा पर्दाफाश, मुंबई पोलिसांची कामगिरी

तुमच्याकडील नोटा बनावट नाहीत ना? घरात नोटांचा छापखाना, मुंबईत 35 वर्षीय तरुणाला अटक

तब्बल 1800 किलो गांजा जप्त, ड्रग्ज तस्करीचा छडा लागण्याची शक्यता

व्हिडीओ पाहा :

Mumbai Police burst Sextortion racket on the name of Pooja Sharma Facebook

Published On - 5:55 pm, Mon, 22 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI