परमबीर सिंग आणि वाझेही जनतेचे सेवकच होते; एनसीबीच्या समीर वानखेडेंवर नवाब मलिक यांचा पलटवार

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप फेटाळताना एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी आम्ही जनतेचे सेवक आहोत, असं म्हटलं होतं. त्याला मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (nawab malik reply to sameer wankhede over his statement)

परमबीर सिंग आणि वाझेही जनतेचे सेवकच होते; एनसीबीच्या समीर वानखेडेंवर नवाब मलिक यांचा पलटवार
nawab malik

मुंबई: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप फेटाळताना एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी आम्ही जनतेचे सेवक आहोत, असं म्हटलं होतं. त्याला मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. परमीबर सिंग आणि सचिन वाझेही जनतेचे सेवक होते, असा पलटवार नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा पलटवार केला आहे. परमबीरसिंग देखील जनतेचा सेवक होता. शर्मापण जनतेचे सेवक होते. वाझेही जनतेचे सेवक होते. परंतु देशसेवा न करता हे दुसरे धंदे करत होते. हा व्यक्तीदेखील त्यातील आहे. हळूहळू याचा सगळा खुलासा करणार असल्याचा गौप्यस्फोट मलिक यांनी केला आहे.

भाजप नेत्याच्या मेहुण्याला का सोडले?

क्रुझवरील कारवाईमध्ये 10 लोकांना पकडलं होते, मात्र त्यापैकी 2 लोकांना सोडले असल्याचे समोर आले आहे. जे दोघे सोडण्यात आले त्यामध्ये भाजपच्या एका नेत्याचा मेहुणा असून याबाबतचा भांडाफोड उद्याच्या पत्रकार परिषदेत करणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्या दोन लोकांना NCB कार्यालयात आणण्यात आले होते आणि काही तासांनी त्यांना सोडण्यात आले आहे. हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. सगळा प्रकार समोर येईल म्हणून त्यांना सोडण्यात आले आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे, असेही ते म्हणाले.

बाहेरचे लोक प्रकरण हाताळत आहेत

भाजपाचा तो हायप्रोफाईल नेता असून त्यानेच सगळं गॉसिप केले आहे. पहिल्यांदा म्हटले की, यामध्ये राजकीय व्यक्ती आहे. त्यानंतर मग हा पॉलिटिकल कनेक्शन असणारा माणूस सुटलाच कसा? असा सवाल करतानाच NCB ला याचं उत्तर द्यावंच लागेल, असंही ते म्हणाले. काही बाहेरचे हायप्रोफाईल लोकं हे सगळं प्रकरण हँडल करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

अधिकारी अंदाजे उत्तर कसे देऊ शकतो?

भाजपचा कोण नेता आहे त्याचं नाव उद्या घोषित करणार असल्याचे सांगतानाच NCB चे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी मीडियाला बाईट देताना 8 ते 10 लोकांना पकडले आहे असे मीडिया बाईटमध्ये सांगितले होते. खरे तर या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणारा एक अधिकारी अंदाजे उत्तर कसे काय देऊ शकतो, असा सवालही त्यांनी केला आहे.

पोलखोल करत राहणार

कलाकारांकडून यांनी पैसे घेतले आहेत. दोन ग्रॅम, चार ग्रॅमसाठी पैसे घेतले. त्यांच्यापेक्षा आमच्या राज्यसरकारच्या नार्कोटिक्स विभागाने काल दिवसभरात मोठ्या कारवाया केल्या. त्यामध्ये 20 किलो ड्रग्ज पकडले आहेत. त्यांची कामे आमचा विभाग करतो आहे. जसजसे पुरावे हातात लागतील तसतशी यांची पोलखोल करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

कोर्टात दाद मागणार

अजित दादांच्या कंपन्यांवर आयकर विभागाची कारवाई होते आहे. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, ते या प्रकरणात अगोदर खुलासे मागू शकले असते. परंतु त्यांनी तसं न करता केवळ बदनामी करण्याचा प्रकार केला आहे. अशा प्रकारच्या कारवाई विरोधात कोर्टात जाणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडी सरकारचे नेते कुणाला घाबरणार नाहीत. महाराष्ट्राची जनता सगळं पाहत आहेत. भ्रष्टाचार मुक्त करणे म्हणजे भाजपच्या गंगेत डुबक्या मारणे असं आहे का? आता जे भाजपमध्ये गेले त्यांनी भाजपच्या गंगेत डुबकी मारली आहे. भाजपच्या काही आजी – माजी मंत्र्यांनी बऱ्याच बँका बुडवल्या आहेत. त्यांची प्रकरणे देखील आम्ही बाहेर काढणार आहोत. नुसते आम्ही आरोप करत बसत नाही. पुराव्यासकट आम्ही आरोप करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

Cruise Drug Case | आर्यन खान न्यायालयीन कोठडीत, तुरुंगात जाणार की ‘मन्नत’वर? सकाळी फैसला

31 वर्षांपासून कारखाना मालकांकडून सामूहिक बलात्कार, विवाहितेची पोलिसात तक्रार

Maharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी

(nawab malik reply to sameer wankhede over his statement)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI