NIA ला छाप्यात मिळाले पिस्तुल, एअरगन, मॅगझिन, तलवारी, हमास देशाचे झेंडे अन्…
Pune ISIS modul NIA Raid | भिवंडीतल्या पडघा गावात एकाच वेळी एनआयएने केलेल्या कारवाईत १५ जणांना अटक करण्यात आली. घाटकोपर बॉम्बस्फोटातील आरोपी साकिब नाचण यालाही बेड्या ठोकण्यात आल्यात. साकीब नाचणचा मुलगा शामिल नाचण आणि भाऊ आकीब नाचण यांना अटक करण्यात आली होती.

कृष्णा सोनारवाडकर, मुंबई | 10 डिसेंबर 2023 : एनआयएकडून आयसीस मॉड्यूलशी सबंधित महाराष्ट्रात मोठं ऑपरेशन राबवण्यात आलं. महाराष्ट्र आणि कर्नाटकात मिळून एकूण ४४ ठिकाणी हे सर्च ऑपरेशन करण्यात आलं मात्र छापेमारी करण्यात आलेली जवळपास ४३ ठिकाण ही महाराष्ट्रातली होती विशेष म्हणजे या संपूर्ण कारवाईत मुंबईलगत असणाऱ्या ‘पडघा-बोरिवली’ गावात एनआयएने केलेल्या कारवाईने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलंय. भिवंडीतल्या पडघा गावात एकाच वेळी एनआयएने केलेल्या कारवाईत १५ जणांना अटक करण्यात आलीय ज्यामध्ये आयसीस मॉड्यूलचा महाराष्ट्रातला नेता आणि मुख्य आरोपी साकिब नाचण यालाही बेड्या ठोकण्यात आल्यात.
कारवाईत काय काय सापडलं
एनआयए भिवंडीमधील पडघा बोरिवली गावात तसेच ठाणे शहर, पुणे, मीरा भाईंदर आणि अंधेरीतील कार्गो एयरपोर्ट परिसरात छापेमारी केलीय. या कारवाईत ६८ लाखांची रोख रक्कम, १ पिस्तुल, २ एअरगन, १० मॅगझिन, ८ तलवारी, हमास देशाचे ५१ झेंडे, ३८ मोबाईल फोन आणि २ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. मागच्या काही दिवसात पडघा गावाशेजारी असणाऱ्या बोरीवली गावात आयसीसशी सबंधित काही हालचाली तपासयंत्रणांच्या निदर्शनास आल्या होत्या. पुण्यातील कोंढवा परिसरात दहशतवादी प्रकरण समोर आल्यानंतर त्याचे धागेदोरे पडघा गावात सापडले होते. याच प्रकरणात साकीब नाचणचा मुलगा शामिल नाचण आणि भाऊ आकीब नाचण यांना अटक करण्यात आली होती मात्र या सगळ्यांचा नेता असणाऱ्या साकीब नाचणला अटक करत एनआयएने हे मोठ ऑपरेशन यशस्वी केलंय.
कसं पार पडल ऑपरेशन
पडघा गावातील हालचाली पाहता आणि आयसीस मॉड्युलमध्ये काही तरुण सक्रिय होत असल्याचं एनआयएच्या तपासात समोर येताच या कारवाईची तयारी मागील काही दिवसापासून केली जात होती. पडघा बोरिवली हे मुस्लिम बहुल वस्तीचं ठिकाण असून मागिल काही वर्षातील तिथल्या घडामोडी पाहता हे ऑपरेशन गोपनीय पध्दतीने करणे मोठे आव्हान होते. यासाठी एनआयएने महाराष्ट्र पोलीस आणि एटीएसच्या मदत घेतली. ९ डिसेंबरच्या मध्यरात्री २ वाजता संपूर्ण बोरीवली गावाला महाराष्ट्र पोलिसांनी वेढा दिला. त्यानंतर एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसच पथक एकाच वेळी जवळपास ६० ते ७० गाड्या घेऊन गावात शिरल. एकाच वेळी मध्यरात्री झालेल्या अश्या छापेमारीमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली मात्र गावच्या सभोवताली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असल्याने ही कारवाई सुरूच ठेवण्यात आली होती. एनआयए दिलेल्या सशयितांची ओळख पटवण्यात महाराष्ट्र पोलीस आणि एटीएस मदत करत होते. त्यानुसार साकिब नाचण आणि इतर १४ जणांना एनआयएने ताब्यात घेतलं आणि सर्वांना घेऊन दिल्ली गाठली. ऑपरेशन गोपनीय पद्धतीने करावयाचे ठरले असल्याने याची माहिती कोणालाही देण्यात आली नव्हती.
पडघा – बोरीवलीत कारवाई का ?
एनआयच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार घाटकोपर मुलुंड बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साकीब नाचण हा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा सक्रिय झाला होता. आधी सीमी या दहशतवादी संघटनेशी काम करणारा साकिब नाचण यावेळी आयसीस मोड्युलशी जोडला गेला असल्याचं समोर आलं होत. साकीब नाचण स्वतःला आयसीस मॉड्यूलचा महाराष्ट्रातला नेता समजत होता शिवाय मुस्लिम तरुणांना आयसीस मॉड्यूलला जोडून त्याना ‘बयात’ (आयसीसशी एकनिष्ठ राहण्याची शपथ) घ्यायला लावत असे. काही मुस्लिम तरुणांना पडघा बोरीवली परिसरात वास्तव्यास येण्यास प्रवृत्त करत शरिया कायद्याचे पालन करत येत्या काळात देशविघातक कृत्यासाठी काम करण्याची शिकवण देत असे. या आयसीस मॉड्यूलचे हैंडलर हे परदेशातून हे सगळं मॉनिटर करत असल्याचेही तपासात समोर आलंय. विशेष म्हणजे पडघा बोरिवली हे ‘मुक्तक्षेत्र’ आणि अल शाम धरती बनवण्याचे साकीब नाचणचे स्वप्न होते. एनआयएने ही सगळी कारवाई करुन महाराष्ट्रातील आयसीस मॉड्यूल पुन्हा एकदा मोडीत काढण्याचा प्रयत्न केलाय. आधी पीएफआय या दहशतवादी संघटनेला देशातून संपवल्यानंतर आता आयसीस मोड्युलचा नायनाट करण्याच्या एनआयएचे ध्येय आहे.
