दीड वर्ष उलटूनही नियुक्ती नाही, बीएमसीचा गलथान कारभार

दीड वर्ष उलटूनही नियुक्ती नाही, बीएमसीचा गलथान कारभार

मुंबई : मुंबई महापालिकेचा आणखी एक गलथान कारभार समोर आला आहे. दीड वर्षापूर्वी केलेल्या भरतीमधील उत्तीर्ण उमेदवारांना अजूनही पालिकेकडून नियुक्ती आदेश देण्यात आले नाहीत. ही भरती महापालिकेच्या चिटणीस कार्यालयामार्फत कनिष्ट लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक आणि टंकलेखन (संगणक) या पदासाठी घेण्यात आली होती.
महापालिकेतर्फे घेण्यात आलेल्या दोन्ही पदांच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना 20 मार्च 2017 च्या  पत्रानुसार कनिष्ट लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक या पदावर हजर राहण्यासाठी 01 एप्रिल 2017 ची तारीख देण्यात आली होती. मात्र 1 एप्रिलला निवड झालेल्या उमेदवारांचे मुळ कागदपत्र तपासणी करुन, वैद्यकीय तपासणी आणि चारित्र्य पडताळणी करण्यात आली होती.
या पदाच्या भरतीसंदर्भात संपूर्ण कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण झालेली असताना आज जवळपास दीड वर्ष होऊनही अजून एकाही उमेदवाराला नियुक्ती आदेश दिले नाहीत. यासंदर्भात महापालिका चिटणीसांच्या आस्थापना कार्यालयात वारंवार दूरध्वनीद्वारे आणि प्रत्यक्ष भेटीदरम्यान विचारणा केली असता, लिपिक पदाच्या भरतीच्या अनुषंगाने चौकशी चालू असल्यामुळे उपायुक्त यांनी कनिष्ट लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक या पदाच्या भरतीची तात्पुरती स्थगिती दिल्याचे सांगितले.
कनिष्ट लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक या पदाच्या भरतीसंदर्भात नियमानुसार सर्व कार्यवाही पुर्ण झालेली असताना या भरतीची लिपिक पदाच्या भरतीसोबत संबंध जोडून आम्हाला नियुक्ती आदेश देण्यासाठी विलंब करणे हा एक प्रकारचा आमच्यावर अन्याय आहे. जवळपास दीड वर्ष होऊनही अद्याप आम्हाला नियुक्ती आदेश दिले नाहीत. तसेच उपायुक्त सा प्र व अतिरिक्त महापालिका आयुक्त यांना भेटण्यासाठी गेलो असता त्यांचे पीए आम्हाला भेटू देत नाहीत. आम्हाला सतत बाहेर गावावरुन येऊन पाठपुरावा करणे शक्य होत नसल्याची खंत यावेळी उमेदवारांनी व्यक्त केली.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI