एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर फसलंच होतं… देवेंद्र फडणवीस धावून आले अन्… पडद्यामागे नेमकं काय घडलं? सहाव्या खासदाराने…
Devendra Fadnavis on Operation Tiger: ऑपरेशन टायगरविषयी आता एकामागून एक सुरस खुलासे समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे मिशन फसलंच होतं, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावून आले अन... पुढचे महाभारत महाराष्ट्राला माहिती आहे. पडद्यामागे घडलं काय?

Devendra Fadnavis on Operation Tiger: ऑपरेशन टायगरमधील एक एक पदर आता उलगडू लागला आहे. या मिशनमधील काही खुलाशांनी हे ऑपरेशन वाटतं तितकं सोपं नव्हतं असे समोर आले आहे. विशेष म्हणजे या खासदारांना शिंदे शिवसेनेत जायचे नव्हते. तर कमळ हाती घ्यायचे होते, असा खुलासा समोर येत आहे. सूत्रांनी याविषयीची माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही मोहिम फसणारच होती, पण त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावून आले आणि पुढे काय घडलं हे सर्व राज्यानं पाहिले. सहाही खासदारांनी शिंदे सेनेत जाहीर प्रवेश घेतला. पण नेमकं पडद्यामागे काय घडलं? काय आहे ती रंजक माहिती?
तर ऑपरेशन टायगर फसलंच असतं…
ऑपरेशन टायगरची चर्चा ही 2024 मधील लोकसभा निकालानंतरच सुरूवात झाली होती. पण आता लोकसभेतील काही अडलेल्या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात फोडाफोडी करण्यात येत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. राज्यात या महिन्याच्या सुरुवातीपासूनच ऑपरेशन टायगरची सुरुवात झाली. उद्धव ठाकरे यांनी बोलावविलेल्या बैठकीला सर्व खासदार हजर झाले होते. कोणी ऑनलाईन हजर होते. तर कोणी मातोश्रीवर उपस्थित होते. पण अवघ्या चार दिवसानंतरच खासदार फुटले.
या सहा खासदारांपैकी बहुतांश खासदार हे भाजपमध्ये जाण्यास इच्छुक होते. त्यांना शिंदे सेनेत जायचे नव्हते. फुटायचेच आहे तर मग धनुष्यबाण का हातात घ्यायचा, त्यापेक्षा कमळ का नको असा सवाल या खासदारांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या सर्व खासदारांनी शिवसेनेत जावे यावर ठाम होते. दिल्लीत त्यांनी याविषयी बोलणी केली होती. दिल्लीतील भाजप श्रेष्ठींशी यशस्वी बोलणी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरला हिरवा कंदिल देण्यात आला.
सहाव्या खासदाराने वाढवले टेन्शन
ऑपरेशन टायगर टप्प्यात आले असतानाच सहाव्या खासदाराने शिंदे सेना आणि भाजपचे टेन्शन वाढवले. बंडाचा झेंडा हाती घेतलाच आहे, तर आता भाजपमध्येच प्रवेश द्या असा या सहाव्या खासदाराचा आग्रह होता अशी माहिती सूत्रांनी दिली. हा खासदार त्यासाठी अडून बसल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर या खासदाराचे मन वळवण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सहावा खासदार सोबत यावा यासाठी फडणवीस यांनी यशस्वी शिष्टाई केली. त्यांनी याकामी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी याविषयीचे संकेतही पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी दिली होती. ऑपरेशन यशस्वी आणि बॉडी सदृढ अशा शब्दात त्यांनी ऑपरेशन यशस्वी झाल्याचे संकेत दिले होते. ऑपरेशन टायगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी भूमिका निभावल्याचे आता उघड झाले आहे.
