पूर्वेश सरनाईकांची ईडी चौकशीला दांडी, गैरहजेरीचं कारण…

डॉक्टरांनी आराम करायचा सल्ला दिल्यामुळे चौकशीसाठी येऊ शकत नाही, असं पत्र पूर्वेश सरनाईक यांनी ईडीला दिलं

पूर्वेश सरनाईकांची ईडी चौकशीला दांडी, गैरहजेरीचं कारण...

मुंबई : शिवसेना नेते प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचे धाकटे सुपुत्र पूर्वेश सरनाईक (Purvesh Sarnaik) ईडी कार्यालयात गैरहजर राहणार आहेत. आजारी असल्यामुळे चौकशीला हजर राहू शकणार नसल्याचं पत्र पूर्वेश सरनाईक यांनी दिलं आहे. चार दिवसांपूर्वी प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक (Vihang Sarnaik) यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. (Purvesh Sarnaik absence for ED inquiry)

पूर्वेश सरनाईक यांना 9 डिसेंबर रोजी ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. यामध्ये 14 डिसेंबर म्हणजे आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. टॉप्स सिक्युरिटी गैरव्यवहाराबाबत ही चौकशी करण्यात येत आहे. तसेच यात आणखी काही परदेशी व्यवहारही झाले आहेत, याचीही ईडीकडून चौकशी केली जात आहे. मोठ्या मुलापाठोपाठ धाकट्या मुलामागेही ईडी चौकशी लागल्यामुळे सरनाईकांची डोकेदुखी वाढली होती.

गैरहजेरीचं कारण काय?

दरम्यान, आपल्याला ताप आणि खोकला आहे. डॉक्टरांनी आपल्याला आराम करायचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आपण आज चौकशीसाठी येऊ शकत नाही, असं पत्र पूर्वेश सरनाईक यांनी आज ईडीच्या अधिकाऱ्यांना दिलं आहे.

ईडीला दोन क्रेडीट कार्ड सापडले असून ते दोन्ही परदेशी असल्याचे सांगितले जात आहेत. या दोन्ही क्रेडीट कार्डची एंट्री भारतात केली जात नाही. या क्रेडीट कार्डच्या खात्यात किती पैसे आहेत, किती व्यवहार झाले आहेत, याबाबत ईडीकडून चौकशी केली जाणार आहे.

सरनाईकांची सहा तास चौकशी

ईडीच्या अधिकाऱ्यांकडून गुरुवारी (10 डिसेंबर) प्रताप सरनाईक यांची चौकशीही करण्यात आली. यावेळी तब्बल सहा तास त्यांची चौकशी चालली. या चौकशीत त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. (Purvesh Sarnaik absence for ED inquiry)

सरनाईक यांना कोणते प्रश्न विचारले?

प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात पोहोचल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी सुरु केली. यावेळी त्यांनी टॉप्स सिक्युरिटीच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत विचारण्यात आले. तसेच, त्यांना कौटुंबिक माहितीही विचारण्यात आली. तुमच्या कुटुंबात कोण-कोण आहे? ते काय करतात? असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. तसेच, त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासाबाबतही सरनाईक यांना विचारण्यात आल्याची माहिती आहे.

सरनाईक कुटुंबाला अटकेपासून संरक्षण

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ईडीने अनेकवेळा समन्स बजावले होते. मात्र, दोघेही ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने प्रताप सरनाईक यांना अटकेपासून संरक्षण दिलेले आहे. कोर्टाने आपल्या आदेशात प्रताप सरनाईक यांची तसेच त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करण्याचे अधिकार ईडीला दिलेले आहेत. मात्र, सरानईक यांना अटक करता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशानंतर प्रताप सरनाईक गुरुवारी (10 डिसेंबर) ईडीसमोर हजर झाले.

संबंधित बातम्या :

प्रताप सरनाईकांना आणखी एक धक्का, पूर्वेश सरनाईक ईडीच्या रडारवर

(Purvesh Sarnaik absence for ED inquiry)

Published On - 12:30 pm, Mon, 14 December 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI