मोठी बातमी! राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी सुरक्षा वाढवली, कारण काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील 'शिवतीर्थ' निवासस्थानी अचानकपणे सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ही वाढ उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर ड्रोन घिरट्या घालत असल्याची घटना उघडकीस आल्यानंतर झाली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाबाहेर अचानकपणे सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही सुरक्षा वाढवण्यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र काल शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानाबाहेर ड्रोन घिरट्या घालत असल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आता राज ठाकरेंच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आल्याचे बोललं जात आहे.
शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर सद्यस्थिती काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर अचानकपणे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. निवासस्थानाच्या दोन्ही गेटच्या परिसरात स्थानिक पोलिसांनी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सध्या या परिसरात पोलिसांचे वाहनदेखील तैनात करण्यात आले आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः शिवतीर्थ परिसराचा आणि सुरक्षेचा आढावा घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानतंर ही सुरक्षा वाढवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
मातोश्रीबाहेर ड्रोनच्या घिरट्या
दरम्यान काल उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर ड्रोन घिरट्या घालत असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणावरुन ठाकरे गटाकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. संवेदनशील ठिकाणी ड्रोन उडवणे हे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असून यामागे टेहळणीचा किंवा घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या घटनेनंतर एमएमआरडीएने (MMRDA) पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी परवानगी घेऊन हा ड्रोन उडवल्याचे स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिले होते.
The drone surveillance of our house today is a shameful incident, yet doesn’t shock us, with the kind of surveillance state that we live in.
The drone hovered at our window level till we started video recording it, and then the drone went erratically up and away, when the drone…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 9, 2025
खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षेत वाढ
मातोश्री बाहेरील संशयास्पद ड्रोनच्या हालचालींमुळे मुंबईतील सर्वच व्हीव्हीआयपी (VVIP) निवासस्थानांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानावरील सुरक्षा वाढवण्यात आली असावे, असे बोललं जात आहे. शिवतीर्थ या निवासस्थानी वाढवण्यात आलेली सुरक्षा हा केवळ खबरदारीचा उपाय आहे की त्यामागे आणखी काही कारण आहे, याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
