अदृश्य शत्रूविरुद्ध महायुद्ध, राहुल गांधींच्या सूचना मोदींनी ऐकायला हव्या होत्या : बाळासाहेब थोरात

याचा आर्थिक परिणाम खूप मोठा आहे. आधीच मंदीची लाट, उद्योग व्यवसाय बंद पडत होते, बेरोजगारी वाढत होती, यात कोरोनामुळे आर्थिक संकटात पुन्हा वाढ झाली आहे.

अदृश्य शत्रूविरुद्ध महायुद्ध, राहुल गांधींच्या सूचना मोदींनी ऐकायला हव्या होत्या : बाळासाहेब थोरात

मुंबई : कोरोनाचं संकट हे एखाद्या महायुद्धासारखं (Balasaheb Thorat Exclusive) आहे. यामध्ये अदृश्य शत्रूशी आपण लढत आहोत, याचा प्रसार थांबवणे, हे महत्त्वाचं आहे, असं राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या एक्स्क्ल्युझिव्ह मुलाखतीत सांगितलं. तसेच, यामुळे एक मोठं आर्थिक संटक हे देशापुढे आणि महाराष्ट्रापुढे आहे, असंही त्यांनी सांगितलं. शिवाय, कोरोनाला संपवण्यासाठी सरकार (Balasaheb Thorat Exclusive) कशा पद्धतीने अविरत काम करत आहे हेही त्यांनी स्पष्ट केलं.

कोरोनाचं संकट हे संपूर्ण मानवतेपुढील संकट आहे , हे एखाद्या महायुद्धासारखं आहे. यामध्ये शत्रू दिसत नाही, अदृष्य शत्रूसोबतची लढाई आहे. संपूर्ण जगात सुरु आहे. महाराष्ट्रातही याचा सामना आपण करत आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं पहिलं काम म्हणजे कोरोनाबाधितांचा शोध घेणं, त्यांच्यावर उपचार करणे, कुणालाही कोरोनाची लागण होऊ न देणं, याचा प्रसार थांबवणे, हे पहिलं काम आहे”, असं त्यांनी सांगितलं.

“हे संकट लवकर संपवायचं असेल, तर याचा संसर्ग होऊ न देणं, ज्यांना संसर्ग झाला आहे, त्यांना वेगळं ठेवणं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपली काळजी घ्यायची आहे. आपली काळजी घेणं, आपल्या कुटुंबाची काळजी घेणं आणि समाजाची काळजी घेण महत्त्वाचं. त्यामुळे जेवढा आपण लॉकडाऊन पाळू, एकमेकांशी संपर्क टाळू, तितकं यश लवकर मिळेल. जर आपण तसं करु शकलो नाही, संयम ठेवू शकलो नाही, तर हे संकट आणखी वाढत जाणार ही वस्तूस्थिती आहे. म्हणून या संकटाचं आणखी मोठं स्वरुप होण्याच्या आत त्याला संपवायचं असेल, तर ज्या काही सूचना डब्ल्यूएचओने दिल्या आहेत, भारत सरकार देत आहे, महाराष्ट्र सरकार देत आहेत त्या सूचना पाळा, संयम पाळा. आपण आपल्या घरातच राहायचं आहे. अडचण तर आहे, कठीण काळ आहे, संकट आहे. पण, ते संपवायचं असेल, तर हे जे काही निर्देश आहेत ते पाळावे लागणार आहेत”, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.

“तीन प्रकारांमध्ये अती गंभीर स्वरुप धारण केलेले काही भाग आहेत. काही मध्यम आहेत, तर काही ठिकाणी अजूनही संसर्ग पोहोचलेला नाही. याबाबत शासकीय पातळीवर निर्णय घेतले जातील की कुणाला लॉकाजडाऊन रिलीज केलं जावं आणि रिलीज केलं तरी त्यांच्या सीमा सील ठेवाव्या की नाही, याबाबत निर्णय होणार आहे. अशा प्रकारचे निर्णय पुढच्या काळामध्ये होऊ शकतात. पण अजून ते झालेलं नाही, अजूनही आपल्याकडे लॉकडाऊन कायम आहे”, असं त्यांनी सांगितलं.

राहुल गांधीच्या सल्ल्याकडे केंद्राचं दुर्लक्ष : बाळासाहेब थोरात

“12 फेब्रुवारीलाच राहुल गांधी यांनी सांगितलं होतं की, आपल्यावर कोरोनाचं संकट आलं आहे आणि यामुळे आर्थिक संकटही उद्भवणार आहे. त्या पद्धतीने सर्व घडत गेलं. त्यांनी सांगितल्यानंतर मात्र काळजी घेतली गेली नाही, तरी राज्य सरकारने याबाबत खूप लवकर निर्णय घेतला. पहिली केस आढळल्यानंतर लगेच विधानसभा स्थगित केली, लगेच लॉकडाऊन लावलं. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे तिथे मोठ्याप्रमाणात परदेशी प्रवासी येणं सहाजिक होतं, म्हणून त्याचा संसर्ग वाढत गेला आहे”, असं (Balasaheb Thorat Exclusive) ते म्हणाले.

उत्पन्न नाही, खर्च मात्र सुरुच : बाळासाहेब थोरात

“याचा आर्थिक परिणाम खूप मोठा आहे. आधीच मंदीची लाट, उद्योग व्यवसाय बंद पडत होते, बेरोजगारी वाढत होती, यात कोरोनामुळे आर्थिक संकटात पुन्हा वाढ झाली आहे. राज्य सरकारची सध्याची परिस्थिती अशी झाली आहे की, उत्पन्न म्हणून काही नवीन पैसे नाहीत, खर्च मात्र सुरुच आहेत. यासर्व परिस्थितीत केंद्राकडून आमच्या सहाजिकच अपेक्षा आहेत. आमच्या जीएसटीचा परतावा आहे तो मिळाला पाहिजे, यासर्व संकटात मदत झाली पाहिजे, ही अपेक्षा आहे”, असंही बाळासाहेब थोरातांनी म्हटलं.

“पहिलं तर कोरोनाचं संकट संपवणे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याकरता जे करावं लागेल ते करणे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यानंतर आर्थिक परिस्थितीवर विचार करुन त्याला सामोरे जाणं, त्यामध्ये काय काय निर्णय घ्यावे लागतील ते आज सांगणे कठीण आहे. पण मोठं आर्थिक संटक हे देशापुढे आणि महाराष्ट्रापुढे आहे आणि जगापुढेही हिच परिस्थिती आहे”, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

नागरिकांनी काही दिवस अडचणीत काढले, तर संकट लवकर संपेल : बाळासाहेब थोरात

“नागरिकांना संयम पाळावा लागेल, काही ठिकाण जिथे गर्दी होतेच ती बंद करणे गरजेचं झालं आहे. साधारणत: मार्केट कमिटी जिथे भाजीपाल्यासाठी गर्दी होत होती, तिथे आपण कडक निर्बंध घालत आहोत. नागरिकांनी काही दिवस अडचणीत काढून जर आपण हा लॉकडाऊन चांगला पाळला तर हे संकट लवकर संपणार आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे, संयम पाळला पाहिजे. एकामेकांच्या संपर्कात नाही आलं पाहिजे”, असं आवाहन बाळासाहेब थोरात यांनी नागरिकांना केलं आहे.

“ज्या ठिकणी परिस्थिती गंभीर आहे, त्यांचा वेगळा विचार करावा लागणार आहे. त्यांचा लॉकडाऊन आपोआपच वाढणार, त्यांना जीवनावश्यक सुविधा पुरवण्याची काळजी घ्यावी लागेल, परंतू लॉकडाऊनचा काळ पाळणार आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी ते झोन निश्चित केले जातात, त्या झोनमध्ये जास्त कडक लॉकडाऊन पाळला जातो, तिथे नवा संसर्ग होऊ नये याची काळजी घेऊ, ज्यांना संसर्ग झाला त्यांच्यावर उपचार केले जातात, त्याच्यातून शून्यावर आपल्याला जायचं आहे. जिथे संसर्ग असेल तिथे काळजी घ्यावी लागेल. जास्त कडक व्हावं लागेल ही वस्तूस्थिती आहे”, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

“रेड झोनमध्ये जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. लॉकडाऊन पाळावा लागणार आहे. आपण जिथे आहे तिथे थांबणे, कुणाला लक्षणं दिसली तर स्वत:हून समोर येऊन सांगणे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जिथे रेड झोन आहे तिथे ही काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या सर्वांना शिस्त पाळावी लागणार आहे.”

“पीपीई किट्स डॉक्टरांसाठीसुद्धा आलेल्या आहेत. ज्या रुग्णालयांना सील करण्यात आलं आहे, तिथे हे सर्व आढळून आलं नव्हतं. तेथे कोरोनाचे रुग्ण आहेत हे त्यांना माहित नव्हते म्हणून तिथल्या रुग्णांना आणि स्टाफला याचा संसर्ग झाला. त्यामुळे आता पीपीई किटचा वापर करुनच पुढचा काळ आपल्याला काढवा लागेल. त्याला दुसरा पर्याय नाही.”

अधिकारी, कर्मचारी जनतेच्या मदतीसाठी सतत काम करत आहेत : बाळासाहेब थोरात

“महाराष्ट्र सरकार म्हणून खूप पहिल्यापासून आपण काळजी घेतली आहे. केंद्र सरकारचा लॉकडाऊन 25 मार्चला आला. त्यापूर्वी आपण निर्णय घेऊन काळजी घेण्यास सुरुवात केली होती. मुख्यमंत्री स्वत: याबाबत मॉनिटरींग करत आहेत. सतत कैाम करत आहेत, सर्वांच्या संपर्कात आहेत, आमच्या सर्वांशी ते नियमित संपर्कात आहेत. अनेक विषयांवर आमची चर्चा होते. अधिकारी आणि आम्ही सर्व एकत्र बसून पुन्हा त्यावर चर्चा करतो, आवश्यक निर्णय घेतो. जनतेच्या सहकार्याची अपेक्षा कारण हे आम्ही कोणाकरता करतोय, जनतेकरिताच करतोय. गर्दीचा भाग, झोपडपट्टीचा भाग आहे तिथे आम्हाला काळजी वाटत असते, तिथे जास्त मदत करुन, कशी पद्धतीने त्यांची मानसिकता सांभाळून त्यांची मदत करता येईल यावर निर्णय घेत आहोत. महानगरपालिका त्यामध्ये काम करत आहे. प्रत्येक अधिकारी, कर्मचारी जनतेच्या मदतीसाठी सतत काम करत आहे (Balasaheb Thorat Exclusive )”, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोननुसार अहवाल मागवले, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत प्रत्येक जिल्ह्याचा फैसला

‘कोरोना’ग्रस्त पोलिसाशी संपर्क, मंत्री जितेंद्र आव्हाड सेल्फ क्वारंटाईन

जो शिशों के घरो मे रहते है… जयंत पाटील-चंद्रकांतदादांच्या वादात विश्वजित कदमांची उडी

‘कारगिल युद्धात अख्खा देश जवानांसोबत होता, आता आम्ही सर्व जवान आशा वर्कर्ससोबत’

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI