संजय निरुपमांना पक्ष नेतृत्त्वाचा दणका, मतदारसंघ बदलून देण्यास विरोध

संजय निरुपमांना पक्ष नेतृत्त्वाचा दणका, मतदारसंघ बदलून देण्यास विरोध

मुंबई : काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना पक्ष नेतृत्त्वाने चांगलाच दणका दिलाय. निरूपम यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाऐवजी उत्तर मुंबई मतदारसंघातून लढावं लागणार आहे. निरूपम यांनी उत्तर मुंबईतून निवडणूक लढवावी, अशी सूचना निवड मंडळ समितीने केली आहे. यामुळे संजय निरुपम यांची चांगलीच अडचण झाली आहे.

काँग्रेसचे दिवंगत नेते गुरूदास कामत यांच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून निरुपम इच्छुक होते. निरुपमांना काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावरुन हटवावं, अशीही मागणी मुंबईतील काँग्रेसच्या एका गटाने केली होती. पण आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी तूर्तास निरुपमांनाच अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आलंय.

निरुपम दुसऱ्या मतदारसंघासाठी इच्छुक असले तरी मुंबई काँग्रेस अध्यक्षाने मतदारसंघ बदलला तर चुकीचा संदेश जाईल, असा सूर बैठकीत निघाला. निवड मंडळ समितीच्या भूमिकेने निरुपम यांची अडचण झाली. मुंबईतल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ वगळता इतर चार मतदारसंघात काँग्रेसमध्ये उमेदवारीवर घासाघीस होणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय.

प्रिया दत्त यांच्या मतदारसंघात बाबा सिद्दीकींच्याही नावाचा विचार सुरु असल्याची काँग्रेसमधील सूत्रांची माहिती आहे. दक्षिण मध्य मतदारसंघात एकनाथ गायकवाडांसह भालचंद्र मुनगेकर यांची शिफारस दिल्लीकडे होणार असल्याचं बोललं जातंय. गुरूदास कामत यांच्या मतदारसंघात कृपाशंकर सिंग यांना निवडणूक लढवण्यास काही नेत्यांनी विरोध दर्शवल्याची माहिती आहे.

संजय निरुपम यांनी 2014 ला ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवली, तिथेच परत ते निवडणूक लढणार असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. भाजपचे गोपाल शेट्टी हे या मतदारसंघातले तगडे उमेदवार आहेत. त्यामुळे निरुपमांनी दुसऱ्या मतदारसंघाची चाचपणी सुरु केली होती. पण त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं नाही. 2014 च्या निवडणुकीत गोपाल शेट्टींविरोधात लढलेल्या निरुपमांचा दारुण पराभव झाला होता. गोपाल शेट्टींना 6 लाख 64 हजार 04 म्हणजे एकूण 70 टक्के मतं पडली होती, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या निरुपमांना 2 लाख 17 हजार 422 मतं मिळाली होती.

काही नावं जवळपास निश्चित

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या संसदीय मंडळाची मंगळवारी बैठक झाली. यात राज्यातील 26 नावांवर चर्चा झाली. प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या प्रस्तावावर उमेदवार कोण असावेत यावर चर्चा करण्यात आली, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. काही नावं जवळपास निश्चित करण्यात आली आहेत.

काँग्रेसने या बैठकीत 26 लोकसभा जागांचा आढावा घेतला, त्यात काही उमेदवार जवळपास निश्चित असून दिल्लीत नावे पाठवणार आहेत.

सोलापूर – सुशीलकुमार शिंदे यांचं नाव जिल्हा कमिटीने दिलंय.

यवतमाळ वाशिम – माणिकराव ठाकरे यांच्या नावाची शिफारस

वर्धा – चारूलत्ता टोंकस

दक्षिण मुंबई – मिलींद देवरा

काही मतदारसंघात जिल्हा काँग्रेस कमिटीने जास्त नावं दिली असून त्याचा निर्णय दिल्लीत घेतला जाईल, असं अशोक चव्हाण म्हणाले.

नागपूर – विलास मुत्तेमवार किंवा नाना पटोले

चंद्रपूर – देवतळे किंवा आशिष देशमुख

शिर्डी – भाऊसाहेब कांबळे

नंदुरबार – के सी पाडवी

नागपूर – गुडदे पाटील यांच्या नावावर चर्चा

(प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील आढावा पाहण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या नावावर क्लिक करा)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI