वाशिम-यवतमाळ लोकसभा : पाचव्यांदा निवडून येण्यासाठी भावना गवळींचा मार्ग खडतर

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

वाशिम : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यातल्या 48 मतदारसंघांचा आढावा घेत आहे. शिवसेना-भाजपची युती होणार की हे पक्ष स्वबळावर लढणार या बाबतही अद्यापही सस्पेन्स कायम आहे. अशातच वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचं वातावरण ऐन थंडीत तापलंय. सलग चार निवडणुकांपासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शिवसेनेच्या भावना गवळी करत आहेत. स्वाभाविकच याही वेळी शिवसेनेकडून त्याच उमेदवारीच्या प्रबळ […]

वाशिम-यवतमाळ लोकसभा : पाचव्यांदा निवडून येण्यासाठी भावना गवळींचा मार्ग खडतर

वाशिम : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यातल्या 48 मतदारसंघांचा आढावा घेत आहे. शिवसेना-भाजपची युती होणार की हे पक्ष स्वबळावर लढणार या बाबतही अद्यापही सस्पेन्स कायम आहे. अशातच वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचं वातावरण ऐन थंडीत तापलंय. सलग चार निवडणुकांपासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शिवसेनेच्या भावना गवळी करत आहेत. स्वाभाविकच याही वेळी शिवसेनेकडून त्याच उमेदवारीच्या प्रबळ दावेदार आहेत. पण यावेळी युती झाली नाही तर त्यांना त्यांच्याच मित्र पक्ष भाजपकडून कडवे आव्हान असेल. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीकडून या मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे.

काँग्रेससाठी ही जागा सुटली तर पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशिवाय पक्षाकडे सध्या तरी दुसरं नाव नाही. माणिकराव ठाकरेही जोरकसपणे कामाला लागले आहेत. म्हणून माणिकरावच काँग्रेसचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. युती झाली नाही आणि काँग्रेसकडून माणिकरावांना उमेदवारी दिली तर भावना गवळींना ही निवडणूक 2014 पेक्षाही आव्हानात्मक राहील. माणिकराव आणि गवळी कुणबी-मराठा असल्याने या समाजाच्या मताचीही विभागणी होऊ शकते.

गत निवडणुकीत खासदार गवळींना मोदी लाटेचा फायदा झाला. त्यावेळी गवळींना संजय राठोड यांची भक्कम साथ होती. आता मात्र या दोघांमध्ये नाराजीचे सूर उमटत असल्यामुळे त्याचा फटका गवळींना बसण्याची शक्यता आहे. गवळींचे होमग्राऊंड असलेल्या वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री राठोडच आहेत. वाशिममध्येही खासदारांना धारातीर्थी पाडण्यासाठी पक्षांतर्गत गवळी विरोधाचा सुरुंग पेरला आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये यवतमाळ जिल्ह्यात भाऊंना ताईची सावली नकोय. जोपर्यंत ताईंचे दिल्लीचे स्थान बळकट आहे. तोपर्यंत राठोड गटाची एक-एक वीट खचविण्याचे काम ताई गट करणारच याची जाणीव राठोड यांना नसेल तर नवलच आहे.

पोहरादेवी येथील नंगारा महोत्सवाच्या निमित्ताने पालकमंत्री संजय राठोड यांनी केलेले शक्तिप्रदर्शन हा सध्या मतदारसंघात चर्चेचा विषय बनलाय. ते विधानसभा सोडून आता लोकसभेची निवडणूक लढतील अशी चर्चा आता दबक्या आवाजात होऊ लागली आहे. दुसरीकडे मात्र शिवसेना पक्षाच्या विद्यमान खासदार भावना गवळी सध्या वाशिम-यवतमाळ मतदारसंघाचे नेतृत्त्व करत असून शिवसेनेकडून त्यांची उमेदवारी जवळपास पक्की मानली जात आहे. दुसरीकडे एक पंचवार्षिक सत्तेबाहेर असल्याने काँग्रेसमधील गटबाजीवर बऱ्यापैकी राख चढली आहे. सत्तेकरिता समोर जाण्याच्या तयारीत असल्याने गटबाजीची फुंकर मारण्याचे धाडस सध्यातरी कुठलाही गट करणार नाही. आपण माणिकरावांना विरोध केला तर उद्या केळापूर विधानसभा क्षेत्र आणि राळेगाव विधानसभा क्षेत्रात माणिकराव गट निखारे लागण्याची भीती मोघे-पुरके गटालाही आहे.

सत्तेची सवय जडलेल्या काँग्रेसच्या दोन्ही गटांना 2019 मध्ये पराभवाचे चटके सोसायचे नाहीत. तेव्हा संघर्ष नकोच या भूमिकेत 2019 मध्ये काँग्रेसचे दोन्ही गट राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. माणिकराव ठाकरे आणि भावना गवळी यांच्यासाठी वाशिम-यवतमाळ लोकसभा निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. पराभूत उमेदवार राजकीय संन्यासाचा मानकरी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजून निवडणुकीच्या रणधुमाळीला उसंत असल्याने आपली फळी मजबूत करण्यासाठी दोन्ही नेते मतदारसंघात जनसंपर्कामध्ये व्यस्त आहेत.

वाशिम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ आणि प्रमुख राजकीय नेते

वाशिम विधानसभा

भाजप- आमदार लखन मलिक

काँग्रेस -सुरेश इंगळे

भारिप -विजय मनवर

शिवसेना -निलेश पेंढारकर

वाशिम विधानसभा राजकीय गटतट आणि सामाजिक समीकरणे

विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे .अडीच लाखाच्या जवळपास मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात 22 टक्के मराठा, 11 टक्के मुस्लीम, 13 टक्के दलित, 7 टक्के माळी, 4 टक्के धनगर आणि इतर मतदारांचे तीन टक्के प्रमाण आहे. या मतदारसंघात सतत तीन वेळा भाजपने विजय मिळवलाय. हिंदू दलित आणि बौद्ध असे मतांचे ध्रुवीकरण होत असल्याने काँग्रेसने आतापर्यंत बौद्ध समाजाचाच उमेदवार दिला. त्यामुळे भाजपचा विजय सुकर झाला. यावेळी मात्र भारिपने या मतदारसंघात चांगली पकड निर्माण केली असून काँग्रेसचा परंपरागत मतदार असलेल्या मुस्लीम आणि दलित मतांवर भारिपचा प्रभाव असल्याने यावेळी ही निवडणूक भारिप विरुद्ध भाजप अशी होण्याची शक्यता आहे.

आगामी निवडणुकीचे संभाव्य चित्र

या मतदारसंघात वाशिम आणि मंगरुळपीर हे दोन तालुके येतात. यामध्ये मंगरुळपीर नगरपालिका भारिपच्या ताब्यात आहे. तर वाशिम नगरपालिकेत केवळ 47 टक्के मताने भारिपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीत भारिप भाजप आणि काँग्रेस असा तिरंगी सामना रंगण्याची शक्यता आहे..

रिसोड विधानसभा

काँग्रेस -आमदार अमित झनक

भाजप- विजय जाधव

भारिप -प्रशांत गोळे

शिवसेना -विश्वनाथ सानप

राष्ट्रवादी काँग्रेस -बाबाराव खडसे

रिसोड विधानसभा राजकीय गटतट आणि सामाजिक समीकरणे

रिसोड विधानसभा मतदारसंघ कायम काँग्रेसच्या पाठिशी राहिला आहे. मोदी लाटेतही या मतदार संघातून काँग्रेसचे अमित झनक यांनी विजय मिळवला होता. या मतदारसंघात मराठा समाजाचे 55 टक्के , तर मुस्लीम आणि दलीत समाजाचे प्रत्येकी 11 टक्के मतदान आहे. या मतदारसंघात कायम जातीय समीकरणावर निवडणूक झाली आहे. इथे वंजारी समाजाचं मतदानही 16 टक्क्यांच्या वर आहे.

आगामी निवडणुकीचे संभाव्य चित्र

या मतदारसंघात यावेळी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत होण्याऐवजी चौरंगी लढतीचे चित्र समोर येत आहे. विद्यमान आमदार अमित झनक यांचे कट्टर समर्थक तथा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सुधीर पाटील गोळे यांचा चिरंजीव प्रशांत गोळे यांनी भारिपचा झेंडा हातात घेतल्याने मराठा मतदानात फूट होऊन शिवसेनेचे विश्वनाथ सानप हे लढतीत येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाबाराव खडसे हेच उमेदवार असणार असून आघाडी झाली नाही तर, राष्ट्रवादीही मराठा मतदानालाच सेंध लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे 5 टक्के आदिवासी आणि 12 टक्क्यांच्यावर वंजारी मते आणि शिवसेनेच्या पक्षाची मते ग्राह्य धरल्यास शिवसेना लढतीत येण्याची शक्यता आहे.

कारंजा विधानसभा

भाजप- आमदार राजेंद्र पाटणी

काँग्रेस -दिलीप भोजराज

भारिप -युसूफ पुजानी

शिवसेना -प्रकाश डहाके

राष्ट्रवादी काँग्रेस -चंद्रकांत ठाकरे

कारंजा विधानसभा राजकीय गटतट आणि सामाजिक समीकरणे

कारंजा विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. राजेंद्र पाटणी येथून प्रतिनिधित्व करतात. या मतदारसंघात मराठा 40 टक्के, मुस्लीम आणि दलित प्रत्येकी 10 टक्के मतदान आहे. या मतदार संघातील मानोरा कारंजा तालुक्यात बंजारा समाजाचेही प्राबल्य आहे. एकूण मतदानापैकी तब्बल 18 टक्के मतदान बंजारा समाजाचे आहे.

आगामी निवडणुकीचे संभाव्य चित्र

विधानसभेला यावेळी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश घेतलेले प्रकाश डहाके, भारिपचे युसूफ पुंजानी असा तिरंगी सामना रंगण्याची शक्यता आहे. दलित आणि मुस्लीम मतदार भारिपकडे गेल्याने काँग्रेसचा स्पेस येथून कमी झाला आहे.

वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघ

शिवसेना- खासदार भावना गवळी

काँग्रेस -शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे

भारिप – युसूफ पुजानी

राष्ट्रवादी काँग्रेस – सुभाष ठाकरे

भाजप – संजय देशमुख

वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून 1999 पासून सतत चार वेळा शिवसेनेच्या भावना गवळी यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. मात्र यावेळी त्यांच्या विरोधात वातावरण दिसतंय. आघाडीचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नसल्यामुळे उमेदवार कोण मिळतो यावर आगामी 2019 च्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यवतमाळ मधील चार आणि वाशिममधील दोन मतदारसंघाचा समावेश आहे.

यवतमाळ – मदन येरावार, भाजप

राळेगाव – प्रशांत उईके, भाजप

पुसद – मनोहर नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस

दारव्हा – संजय राठोड, शिवसेना

कारंजा – राजेंद्र पाटणी, भाजप

वाशिम – लखन मलिक, भाजप

यंदाच्या निवडणुकीतील प्रश्न आणि प्रचाराचा मुद्दा

2014 ला मोदी लाटेत यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांनी सर्व अंदाज मोडित काढीत 93 हजार 816 मताधिक्याने विजय संपादित केला. त्यांना चार लाख 77 हजार 905 मते मिळाली होती. काँग्रेसचे शिवाजीराव मोघे यांचा पराभव करत त्या चौथ्यांदा लोकसभेत पोहोचल्याय

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात मराठा, बंजारा मतदार जास्त आहेत. त्यामुळे भावना गवळी मराठा असल्यामुळे आघाडीने बंजारा उमेदवार दिल्यास निवडणूक चुरशीची होऊ शकते. त्यातच युती झाली नाहीतर भाजपकडून चर्चेत असलेलं नाव माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांना उमेदवारी दिल्यास निवडणूक तिरंगी होणार आहे.

मतदार संघात बहुतांश शेतकरी आहेत. कपाशी आणि सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. यंदा कपाशीचे बोंड अळीने नुकसान झाले तर सोयाबीनला भाव मिळत नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यावर शेतकरी नाराज आहेत. जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक वसाहत आहे. मात्र पुरेशा सुविधा नसल्यामुळे प्रक्रिया उद्योग नाहीत. प्रमुख समस्या रोजगाराची आहे. खरीप हंगाम संपला की जिल्ह्यातील गावच्या गाव खाली होऊन स्थलांतर होत आहे.

ग्रामीण भागात अजूनही भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. 1999 पासून खासदार असलेल्या भावना गवळी यांनी एक महत्त्वाचं काम म्हणजे पूर्णा ते अकोला मिटरगेजचे रूपांतर सह ब्रॉडगेज करून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. रस्ते विकासाची कामे गतिमान असले तरी प्रधानमंत्री शहरी आवास योजना थंडबस्त्यात आहे. भावना गवळी 2019 लोकसभा निवडणुकीत पाचव्यांदा खासदार होणार का याकडे लक्ष लागलंय.

संबंधित बातम्या :

हातकणंगले लोकसभा : 2014 ला एनडीए, 2019 ला राजू शेट्टींच्या खांद्यावर यूपीएचा झेंडा?

पालघर लोकसभा : पुन्हा एकदा वनगांच्या मुलाविरोधात भाजपचा उमेदवार? 

परभणी लोकसभा : अंतर्गत नाराजीने शिवसेनेला बालेकिल्ल्यातच भगदाड

कोल्हापूर लोकसभा: विरोधक कुणीही असो, लढत मुन्ना विरुद्ध बंटीच!

रायगड लोकसभा : तटकरेंच्या घराणेशाहीला कंटाळलेले नेतेच राष्ट्रवादीला दगा देणार?

हिंगोली लोकसभा : मोदी लाटेतही निवडून येणाऱ्या राजीव सातवांचा मार्ग खडतर

नागपूर लोकसभा: संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी, गडकरींसमोरील आव्हानं काय?

उस्मानाबाद लोकसभा : राष्ट्रवादी जिव्हारी लागलेल्या पराभवाचा बदला घेणार?

माढा लोकसभा : मोदी लाटेतही टिकलेले मोहिते-पाटील पुन्हा गड राखणार?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI